विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
यूथावस्था - मानवप्रगतीच्या इतिहासांत केव्हां तरी या अवस्थेचा काळ होता कीं काय याविषयीं निश्चित मत देतां येत नाहीं. समाजांत ज्या कालीं विवाहसंस्था व कुटुंबपद्धति विकास पावली नसून एखादा व्यक्तिसमूह एकत्र रहात असे व त्या व्यक्तिसमूहाचा एक अवयव एवढेंच त्यांतील स्त्रीपुरुषांचें परस्परांशीं नानें असें त्यावेळच्या समाजव्यवस्थेस यूथावस्था असें म्हणतां येईल. गाई बैल वगैरे प्राण्यांत ही व्यवस्था प्रामुख्यानें दृष्टीस पडते. कांहीं समाजशास्त्रवेत्ते म्हणतात कीं आज ज्याप्रमाणें कांहीं रानटी समाजांतून ही अवस्था दृष्टीस पडते त्याचप्रमाणें प्राचीन काळीं सरसकट अशी अवस्था अखिल मानवसमाजाची होती व या यूथावस्थेंतूनच एकपत्नीक कुटुंबाचा विकास झाला. दुसरे कांहीं असें प्रतिपादितात कीं, अगदीं प्रारंभींची एकपत्नीक विवाहावस्था टाकून देऊन मध्यंतरी समाजानें यूथावस्था अंगिकारिली होती. पण या दोन्हीहि उपपत्ती वेस्टरमार्कसारख्या संशोधक समाजशास्त्राज्ञास पटत नाहींत. कारण अगदीं रानटी लोकांत देखील एखादी विशिष्ट कुटुंबपद्धति असते. फक्त ती वरवर पहाणार्या प्रवाशांच्या नजरेस येत नाहीं इतकेंच. शिवाय मनुष्यप्राण्याचा ज्या खालच्या प्राण्यापासून विकास होत गेला त्या माकडासारख्या प्राण्यांतहि हा यूथावस्थाव्यवहार दिसून येत नाहीं. तेव्हां मनुष्यप्राणी हा एकेकाळीं कुटुंबविरहित असून अनीतिमूलक यूथावस्थेचा उपभोग घेत होता हें म्हणणें धाडसाचें होईल. ['कुटुंब' पहा]-