विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
यूरोपखंड - पृथ्वीगोलाच्या भूपृष्ठाचे जे मुख्य खंड केले आहेत त्यापैकी हें सर्वांत लहान आहे. यूरोपला आशियाचें द्वीपकल्प म्हणण्याचा भूगोलशास्त्राचा परिपाठ पडलेला आहे व तो एका दृष्टीनें खराहि आहे. परंतु दुसर्या दृष्टीनें (म्हणजे हवामान वगैरेंच्या) विचार केला असतां या खंडाचा पृथकपणा इतिहासपरंपरेनें आणि त्यामुळें झालेल्या लोकसंख्येच्या विभागणीनें स्पष्टपणें सिद्ध होतो. यूरोप आणि आशिया हीं दोन्ही खंडें जमिनीनें जोडलेलीं असल्यामुळें त्यांच्यामधील मर्यादा स्पष्ट कशी आंखावी आणि यूरोप या नांवाखालीं किती भाग घ्यावा व आशिया या नांवाखालीं किती भाग घ्यावा ह्या गोष्टी निश्चयानें ठरवितां येत नाहींत. परंतु एकंदर बाह्यस्वरूप आणि हवामान यांवरून शेवटीं असें ठरविण्यांत आलें कीं, ज्याला आपण यूरोप म्हणतों तो भाग एकमेकांशीं अगदीं निकट संबंध असलेल्या व कमी जास्त प्रमाणांत दाट वस्तीच्या देशांचा बनलेला असून तो पूर्वेकडे ओसाड किंवा पातळ वस्तीच्या प्रदेशानें आशियाखंडांतील देशांपासून वेगळा केलेला आहे. याच ओसाड प्रदेशांतून या दोहोंमधील मर्यादा पूर्वीपासून पाडण्यांत आली आहे. पूर्वेकडे ओसाड प्रदेश व बाकींच्या तिन्ही बाजूंनीं समुद्र असलेल्या या (यूरोप) खंडांतील लोकांचा इतिहास व यांची संस्कृति तत्त्वत: सारखीच आहे.
मर्यादा.- यूरोपच्या मर्यादांविषयीं असून एकवाक्यता झालेली नाहीं. काहींच्या मतें कॉकेशस पर्वत ही आग्नेय मर्यादा आहे व कांहींच्या मतें अझोव्ह समुद्र आणि कस्पियन समुद्र यांच्यावरील टोंकांपासून मॅनिच खोर्याची कॉकेंशस पर्वताला समांतर गेलेली रेषा ही आग्नेय मर्यादर हीच याचप्रमाणें पूर्वेकडीलहि निरनिराळ्या मर्यादा दिलेल्या आहेत. व्यावहारिक दृष्टया कोणतीहि मर्यादा ठरविली तरी हवामान, प्राणी आणि वनस्पती यांचा विचार करतांना ही मर्यादा उरली. पर्वतांच्या पलीकडे सैबेरियाच्या सरहद्दीपर्यंत वाढवावी लागेल.
विस्तार.-निरनिराळ्या मर्यादांमधील भागांचें चौरस मैलांत दिलेलें यूरोपचें क्षेत्रफळ येणेप्रमाणें:-यूरोपच्या सर्वांत लहान नैसर्गिक विस्तसराचें क्षेत्रफळ ३५७०००० चौरस मैल आहे. यांत अझोव्हचा समुद्र धरून व कास्पियन माळरान, आइसलंड, नोव्हाझेम्ला, स्पिट्सबर्जेन आणि बेअरबेट सोडून उरलचें शिखर आणि मॉनिच खोरें येथपर्यंतचा प्रदेश येतो. यांत उरल नदी आणि कास्पियन समुद्रापर्यंतचा कास्पियन माळरानाचा भाग सोडल्यास क्षेत्रफळ ३६८७७५० चौरस मैल होतें. मॉनिच खारें आणि कॉकेशस यांच्यामधील प्रदेश मिळविल्यावर ३७९०५०० चौरस मैल ; उरल पर्वतांच्या पूर्वेकडील प्रदेश, एम्बापर्यंतचा उरल नदीचा पूर्वेकडील कास्पियन माळरानाचा भाग व कॉकेशचा दक्षिण उतार मिळविल्यावर ३९८८५०० चौरस मैल; आइसलँड, नोव्हाझेम्ला, स्पिट्स बर्जेन आणि बेअर बेट मिळून ४०९३००० चौरस मैल होतो. यांत मार्मोराचा समद्र, कॅनेरी बेटें, मदिरा आणि अझोर्स यांच समावेश होत नाहीं.
ज्वालामुखी पर्वत आणि भूकंप.-आइसलंडमधील ज्वालमुखीपर्वतांशिवाय भूमध्यसमुद्रांत चार निरनिराळे ज्वालामुखी पर्वत आहेत: (१) इटलीच्या पश्चिम किनार्यावर, व्हेसुव्हियस (२) एटना सिसिली बेटांत, (३) लिपारी समुहांत स्ट्राँबोली व (४) आइसलंड बेटांत हेल्ला. अर्वाचनी काळीं झालेल्या स्फोटांपैकीं अतिशय भयंकर लिसबन (१७५५ सालीं) व कॅलेब्रिया (१७८३ सालीं) येथें झालेले होत. कॅलेब्रिया येथें त्यानंतर १८६५, १८७०, १९०५ आणि १९०८ या सालीं ज्वालामुखीचे स्फोट झालें.
उंचवटे.-यूरोपमधील सर्वांत जास्त उंचीचे पर्वत येणेप्रमाणें:-(१) स्विस आल्प्स-सर्वांत जास्त उंचीचें शिखर (सरासरी १५००० फूट), (२) सिएर्रा नेव्हाडा, पिरिनीज आणि एटना (सरासरी ११००० फूट;) (३) अपिनाइन, कोर्सिकन पर्वत, कार्पेथियन, बाल्कन आणि डेस्पोटोडाघ, (८००० पासून ९००० फूट); (४) ग्वाडर्रम, स्कॅंडिनोव्हियन आल्प्स, डिनेरिक आल्प्स, ग्रीक पर्वत, केव्हेनिस, (६००० पासून ८००० फूट); ओव्हर्ग्ने पर्वत, जुरा, रिएसेंजोबिर्ग, सार्डिनियामधील पर्वत, मेओर्का मिनोर्का, क्रिमिआ, ब्लॅफफारेस्ट, व्होसजेस, व स्काटिरा हायलँड (४००० ते ६००० फूट) एकंदर यूरोपची सरासरी उंची देण्याचा बर्याच भूगोलवेत्त्यांनीं प्रयत्न केला आहे त्यांपैकीं हिडेरिच यानें दिलेली उंची सर्वांत जास्त म्हणजे १२३० फूट आहे आणि हंबोल्ट यानें दिलेली सर्वांत कमी उंची म्हणजे ६७५ फूट आहे.
उंचवटयाचा सर्वांत विस्तीर्ण प्रदेश म्हणजे स्कॅंडिनेव्हियाचा होय. याशिवाय तुटक उंचवटयाचीं ठिकाणें पुष्कळ आहेत, उहारणार्थ आयसलंड, ब्रिटिश बेटें, उरल पर्वत वगैरे. आयबेरियन द्वीपकल्पापासून काळ्यासमुद्रापर्यंत गेलेला उंच प्रदेश अगदीं जोडलेला आहे. हा जर्मनीच्या मध्यांत उत्तरेकडे सरासरी उत्तार अक्षांश ५२० पर्यंत पसरलेला आहे.
नद्या.-यांचे तीन वर्ग करतां यतील:-(१) आर्टिक महासागरास मिळणार्या नद्या-पेचोरा, ड्वीना. या रशियांतून वहातात. (२) बाल्टिक समुद्रास मिळणार्या डयूना, व्हिस्च्युला व ओडर; या रशिया व जर्मनी या प्रदेशांतून वाहातात. (३) जर्मन समुद्रास मिळणार्या-एल्ब (आस्ट्रिया-जम्रनी), र्हाईन (जर्मनी-हालंड) व मास. र्हाईन ही फार उपयोगी व महत्त्वाची नदी आहे. (४) अटलांटिक महासागरास मिळणार्या-सेन, ल्वार व गारोन या फ्रान्स मधील; डयूरो, टेगस व ग्वाडियाना या स्पेन-पोर्तुगालमधील; व ग्वाडालक्किव्हर ही स्पेनमधून वहाते. (५) भूमध्यसमुद्रास मिळणार्या-एब्रो (स्पेन), रोन (फ्रान्स), पो (इटली). (६) काळ्या समुद्रास मिळणार्या -डान्यूब (ही जर्मनींत उगम पावून ५ देशांतून वहाते), निस्टर (रशिया), डॉन (रशिया). (७) कास्पियन समुद्रास मिळणार्या-व्होल्या व उरल व या रशियांतून वहातात.
सरावरें.-लाडोगा, ओनेगा, पेइपुस, वेनर व वेटर हीं बाल्टिक केंद्राभोंवतीं व जिनिव्हा, कॉन्स्टन्स आणि गार्ड हीं आल्प्सकेंद्राभोंवतीं आहेत. स्वीडनमध्यें बरींच सरोवरें आहेत.
भूस्तरवर्णन.-येथील भूस्तरशास्त्राचा इतिहास बर्याच अंशी पर्वतश्रेणीच्या घडामोडीचा इतिहास आहे. एक मोठी पर्वतांची रांग चार वेळ उद्भवली व तीच तीन वेळ नाहींशी झाली, या रांगेचा कांहीं भाग समुद्रांत गडप झाला, व कांहीं अजून वर दिसत आहे. या पर्वतश्रेणींपैकीं शेवटली, जून आल्प्स, कार्पेथियन, बाल्कन वगैरे नांवांनीं प्रसिद्ध आहे.
हवामान.-यूरोपचें हवामान ठरविणार्या कांहीं गोष्टी आहेत. या म्हटल्या म्हणजे खंडाची उत्तरसरहद्द आर्टिक सर्कलमध्यें आहे; खंडाचीं अगदीं दक्षिण टोकें १३ १/२० किंवा ट्रॉपिक ऑफ कॅन्सर (कर्कवृत्ता)च्या उत्तरेकडे जास्त जवळ आहेत; आशियाच्या जमिनीचा पृष्ठभाग पूर्वेकडे सरासरी ३००० मैलांपर्यंत आलेला आहे; पश्चिमेस उत्तर अटलांटिक समुद्राचा भाग आहे; पश्चिम यूरोपांतील हवा नैर्ऋत्त्येकडून येणारी आहे; आणि उंच प्रदेशाची रचना अशी आहे कीं, पश्चिमेकडून वारा नेहमीं पूर्वेकडे फार दूरपर्यंत वहात असतो. यांतील पहिल्या दोन गोष्टींचा हवामानावर म्हणण्यासारखा परिणाम होत नाहीं बाकींच्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या गोष्टींनीं यूरोपचें हवामान विशिष्ट प्रकारचें केलें आहे व त्यामुळेंच यूरोप हें निराळें खंड गणण्यांत आलें आहे.
पाऊस.-इंग्लिश लेक डिस्ट्रिक्टमधील स्टे व डाल्मेशियन किनार्यावरील क्रिकव्हाईस या दोन ठिकाणीं यूरोपमध्यें सर्वांत जास्त पाऊस किती पडला यांची नोंद असते. स्टेमधील माहितीप्रमाणें १८८१-१८९० या सालांत सरासरी १७७ इंच पाऊस पडला व क्रिकव्हाईस येथील माहितीप्रमाणें १८९१-१९०० सालांत १७९ इंच पाऊस पडला. शरदऋतूंत यूरोपचा दक्षिण आणि पश्चिम किनारा, इटलीद्वीपकल्प, पश्चिमभूमध्यसमुद्रांतील बेटें, बाल्कन द्वीपकल्पाचा नैर्ऋत्यभाग, साओनेर्हान खोरें, बोथनियाच्या आखाताच्या दोन्ही बाजूंचा भाग, या ठिकाणीं पावसाचें प्रमाण जास्त असतें. आइसलंड, स्कॉटलंड, आयर्लंड, फ्रान्स आणि आयबेरियन द्वीपकल्प यांचा अगदीं पश्चिमकिनारा, भूमध्यसमुद्राचा बराच भाग (विशेषेंकरून आग्नेय) या ठिकाणीं हिंवाळ्यांत फार पाऊस पडतो. भूमध्यसमुद्राच्या या भागांत व यूरोपच्या आग्नेय भागांत उन्हाळ्यांत पावसाची फार उणीव असते. याचा परिणाम असा होतो कीं भूमध्यसमुद्राच्या भोंवतालचा भाग त्याच अक्षांशावरील पूर्व आशियाच्या व उत्तरअमेरिकेच्या पर्व भागांपेक्षां-दोहोंची जमीन व दोहोंचें बाह्यरूप सारखें असूनहि-फारच कमी सुपीक आहे.
उष्णता.-६०० अंशाच्या समांतर रेषेच्या दक्षिणेस पश्चिमयूरोपांतील असा एकहि सखल भाग नाहीं वीं जेथें दैनिक सरासरी उष्णता एक महिनाभर थिजण्याच्या बिंदूपर्यंत किंवा खालीं असते. उत्तर अक्षांश ५०० अंशाच्या समांतर प्रदेशांत इतक्या कमी प्रमाणाचें हवामान पहिल्यानें झपाटयानें व नंतर हळू हळू पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढतें.
शेतकीं.-येथील मुख्य पिकें म्हणजे गहूं आणि राय हीं होत. बहुतेक सर्व देशांतून गहूं पिकतो; त्यांतल्या त्यांत फ्रान्स व रशिया या देशांत जास्त पिकतो. राय धान्याचें पीक होणारे मुख्य देश:-आस्ट्रिया, हंगेरी, बेल्जम, डेनमार्क, फ्रान्स, जर्मनी, नेदर्लेंड, रशिया, स्पेन, स्वीडन हे होत. गहूं व राय या दोन मुख्य धान्यांशिवाय निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या प्रकारचें पीक होतें तें येणेप्रमाणें:-ओट आयर्लंड, ग्रेटब्रिटन, फिनलंड, डेन्मार्क, श्लेस्विग-होल्स्टेन: बार्ली-येरोपखंडाच्या अगदीं उत्तर आणि दक्षिण भागांत; मका-आयबेरियन द्वीपकल्प, फ्रान्स इटली; मिलेट-यूरोपच्या आग्नेय भागांत; बटाटे-यूरोपच्या पश्चिम, उत्तर आणि मध्यभागांत; मसुर-जर्मनी व फ्रान्सदेशांत; बीटकंद (साखरेचे)-फ्रान्स, बेल्जम, जर्मनी, बोहेमिया, आणि रशिया देशांत; ताग-रशिया, आयर्लंड, बेल्जम, हॉलंड या देशांत; वाक-दक्षिण आणि मध्ययूरोप, व रशिया देशांत; द्राक्षें-स्काँडिनेव्हिया देशांत; ऑलिव्ह-इटली, स्पेन, ग्रीस, पोर्तुगाल, तुर्कस्तान, आणि ऑस्ट्रिया देशांत; तंबाखू-पश्चिम, दक्षिण आणि मध्ययुरोप भागांत; हॉप-इंग्लंड, आस्ट्रिया, जर्मनी आणि बेल्जम देशांत. धान्याशिवाय चेस्टनट, नारिंगे, महाळुंग, बदाम, डाळिंब, अंजीर, करोब आणि निरनिराळ्या प्रकारच्या ताडांच्या झाडांचीहि लागवड होते.
जंगल.-जेव्हा आर्यलोक यूरोपखंडांत येऊ लागले त्या वेळीं बराच जमिनीचा भाग जंगलानें व्यापलेला असला पाहिजे. त्यानंतर लोकांची वसाहत होत जाऊन ती दिवसेंदिवस वाढूं लागली व जंगलानें व्यापलेला बराच प्रदेश हळू हळू लागवडीखालीं येऊं लागला. कांहीं भागांत तर जंगल इतकें उध्वस्त करण्यांत आलें कीं त्यामुळें उंच प्रदेश अगदीं उघडे पडून देशांतील हवेवर व पाण्याच्या पुरवठयावर वाईट परिणाम होऊं लागला. यामुळें कांहीं देशांत जंगल न तोडण्याविषयीं कायदे करण्यांत येऊन पुन्हां वाढविण्यास सुरवात केली. अजून यूरोपांत एकंदरीनें पाहिलें असतां बरेंच जंगल व दोन तीन देशांनां इमारती लांकूड, टरपेंटाइन, डांबर, कोळसा, साल, सालींच्या आंतील लवचीक तंतू आणि पालाश (पोटयाश-लांकडापासून निझाणारा सज्जीखार) या जिनसांचें फार उत्पन्न मिळतें.
पाळीव जनावरें.-यूरोपच्या बहुतेक सर्व देशांत घोडयांची निपज करण्याचा फार महत्त्वाचा धंदा आहे व कांहीं ठिकाणीं (उ. रशिया, फ्रान्स, हंगेरी आणि स्पेन) या धंद्याला सरकारकडून चांगलीच मदत मिळते. पूर्व आणि दक्षिण यूरोपांतील फार उपयोगी असें वहाणारें जनावर म्हण्जो बैल होय. म्हशी दक्षिणयूरोपांत विशेषेंकरून खालच्या डान्यूब आणि दाक्षिण इटलीच्या प्रदेशांत निपजतात. मेंढरें हीं आर्थिकदृष्टया बहुतेक सर्व यूरोपखंडाला उपयोगी अशीं जनावरें आहेत. सर्व डोंगराळ प्रदेशांत विशेषेंकरून स्पेन, इटली आणि जर्मनी या ठिकाणीं बकरी जास्त आढळतात. डुकरें पाळण्याची चाल सर्व यूरोपभर आहे परंतु या धंद्याला सर्व्हियाइतकें दुसरीकडे कोठेंच महत्तव दिलें जात नाहीं. तथापि डुकरांची निपज करण्यांत व त्यांची व्यवस्था ठेवण्यांत फ्रान्स देश यूरोपांत पहिला आहे. याशिवाय रेशमाचे किडे, मधमाशा आणि कॅंथेरिस (हिच्या पासून पलिस्तर तयार करतात) नांवाचे किडेहि पाळतात.
खनिज पदार्थ.-येथील सर्वांत जास्त महत्त्वाचे खनिज पदार्थ म्हणजे कोळसा जास्त होतो त्यांचा उत्पन्नाच्या मानानें क्रम येणेप्रमाणें-:युनायटेड किंग्डम, जर्मनी, फ्रन्स, बेल्जम. १८९५ पर्यंत युनायटेड किंग्डममध्यें सर्वांत जास्त अशुद्ध लोखंड निघत असे पण उत्पन्नाच्या मानानें क्रम हल्लींचा असा आहे:-जर्मन कस्टम्स युनियन, युनायटेड किंग्डम, स्पेन, फ्रान्स, रशिया, स्वीडन, ऑस्ट्रिया-हंगेरी आणि बेल्जम.
लेखंड व कोळसा यांच्या खालोखाल इतर खनिज पदार्थ व धातू कोणकोणत्या देशांत व किती प्रमाणांत सांपडतात याचें कोष्टक असें: (आंकडे १९०६ मधील आहेत.)
सोनें | चांदी | पारा | कथील | |
किलोग्राम | किलोग्राम | मेट्रिक टन | मे. टन | |
ऑस्ट्रिया | १२६ | ३८९४० | ९१४९४ | ५४ |
जर्मन- साम्राज्य | १२१ | १७७१८३ | ..... | १३४ |
हंगेरी | ३७३८ | १३६४२ | ...... | ...... |
इटली | ..... | ....... | ८०६३८ | ...... |
नार्वे | ..... | ६३६७ | ....... | ...... |
पोर्तुगॉल | २९ | ....... | ....... | २२ |
रशिया | ८२०२ | ....... | ....... | ....... |
स्पेन | ....... | ....... | २६१८६ | ८६ |
युना. किंग्डम | ५८ | ४१६४ | ........ | ७२६८ |
(१किलोग्राम=२ १/५ पौंड; म्हणजे एक शेरापेक्षां किंचित जास्त.) |
तांबे | शिसें | मँगनीज | जस्त | |
मे. टन | मे. टन | मे. टन | मे. टन | |
ऑस्ट्रिया | २०२५५ | १९६८३ | १३४०२ | ३२०३७ |
बेल्जम | .... | १२१ | १२० | ३८५८ |
बोस्निया-हर्झेगोवीना | ७६५ | ..... | ७६५१ | ३१ |
फ्रान्स | २५४७ | ११७९५ | १११८९ | ५३४६६ |
जर्मन साम्राज्य | ७६८५२३ | १४०९१४ | ५२४८५ | ७०४५९० |
ग्रीस | ....... | ........ | १००४० | २६३५८ |
हंगेरी | १३३८ | ५६४ | १०८९५ | ....... |
इटली | १४७१३९ | ४०९४ | ५३०६० | १५५८२१ |
नॉर्वे | ३२२०३ | ....... | ....... | ३३०८ |
पोर्तुगाल | ३५२९८९ | ५११ | २२ | १२६७ |
रशिया | ....... | ....... | ........ | ९६६२ |
स्पेन | २८८८७७७ | २६३५१९ | ६२८२२ | १७०३८३ |
स्वीडन | १९६५५ | १९३८ | २६८० | ५२५५२ |
युना. किंग्डम | ७५९८ | ३२५८९ | २३१२७ | २३१९० |
याशिवाय फ्लातिन, निकल, अँटिमनी, बिस्मथ आणि बाक्साइट (अॅल्युमिनियम तयार करण्यासाठीं याचा उपयोग करतात), या धातूहि येथें सांपडतात. ज्या देशांत मीठ होतें ते उत्पन्नाच्या अनुक्रमानें पुढीलप्रमाणें आहेत:-जर्मनी, रशिया, फ्रान्स, स्पेन, इटली, ऑस्ट्रिया-हंगेरी, रुमानिया, आणि स्वित्झर्लंड, पोटॅश (सज्जीखार) तयार करण्याचा तर जर्मनीनें मक्ता घेतल्यासारखाच आहे. इटलीमध्यें गंधकाचें उत्पन्न सर्वांत जास्त होतें. बोरिक अॅसिड, संगमरवरी दगड, ऍसफाल्ट, पाटयांचा दगछ आणि कांचेची वाळू हे पदार्थहि कोठें कोठें सांपडतात.
व्यापार, धंदे आणि आगगाडया.-या तिन्हींचा एकदम विचार करतांना असें म्हणतां येईल कीं यूरोपमधील देशांनीं शेतकीच्या धंद्याकडे दुर्लक्ष करून व तो बुडवून इतर धंद्यांची व कारखान्यांची फार लवकर वाढ केली आहे. बहुतेक देशांची शेतीपासून उत्पन्न होणार्या मालाची आयात वाढत चालली आहे व शेतीशिवाय इतर धंद्यांत उत्पन्न होणार्या मालाचें प्रमाण सारखें वाढत असून प्रत्येक देश, जरी माल बाहेर पाठवूं शकत नसला तरी देशांतील सर्व बाजाराला यूरोप आपला माल पुरवूं लागला आहे. हा फेरबदल बर्याच अंशी दळणवळणाचीं साधनें वाढल्यानें व खुष्कीनें व समुद्रावरून मालाची नेआण करण्याच्या पद्धतींत बरीच सुधारणा झाल्यामुळें झाला आहे. अलीकडे जे तीन शोध लागले त्यांपासून कांहीं देशांनां इतरांपेक्षां जास्त फायदा होऊं लागला ते शोध म्हणजे (१) स्फुरितयुक्त अशुद्ध लोखंडापांसून लोखंडी विटा किंवा पोलाद तयार करण्याची १८७९ सालीं काढलेली थामस-पद्धति, (२) विद्युतशक्तीचा उपयोग करण्यासाठीं काढलेलीं सुधारलेलीं यंत्रें व (३) दगडी कोळशापेक्षां लिग्नाइटमध्यें ग्यास उत्पन्न करण्याची शक्ति जास्त असते हा शोध. त्यामुळें ज्या ठिकाणीं लिग्नाइट उत्पन्न होतें तेथें उघडपणें जास्त फायदा होतो.
दळणवळण, रस्ते.-या खंडाची रचना अशी आहे कीं रस्ता पूर्वेकडे जितका जास्त गेला असेल तितका विस्तारहि कमी कमी होत जातो. काळ्या समुद्रापासून पश्चिमेकडे जाण्याचा रस्ता सर्वांत सोपा आहे व बाल्टिक समुद्राकडे जाणारे दोन पर्वताच्या (कार्पेथियन) अगदीं पूर्वेकडून गेले आहेत. अगदीं पश्चिमेकडे जातांना पूर्वी आल्प्सपर्वत ओलांडण्यासाठीं घाटांतून जावे लागे. या घाटांतून रोमन लोकांनीं नंतर रस्ते केले. मध्यकालीं जिनोवापासून कान्स्टन्स सरोवराला जाणारा रस्ता मिलनवरून गेला होता व आणखी दोन रस्ते उरलावरून र्हाईन खोर्यांत व आगस्बर्गवरून बाल्टिक समुद्रांत गेले होते. मिनपासून आल्न्स पर्वताच्या उत्तरेस सरळ जाणारा सेंट गोथार्ड नांवाचा रस्ता १३ व्या शतकाच्या शेवटीं तयार करण्यांत आला. मौंट सेनिस घाट हा जिनोवापासून र्होन खोर्याच्या मध्यभागांत टयूरिनवरून सरळ जाण्याचा फार प्राचीन मार्ग आहे. त्यानंतर गाडयांचे व आगगाडयांचे बहुतेक सर्व रस्ते या पायघाटांवरूनच बांधण्यांत आले.
समुद्रांतील जलमार्ग:-आगगाडया झाल्यापासून बहुतेक सर्व देशांत अलमार्गानें मालाची ने-आण फार कमी होते. बाल्टिक समुद्रापासून काळ्या समुद्रापर्यंत (म्हणजे रिगापासून खेरसोनपर्यंत) कालवा बांधण्याचें घाटत होतें व ही गोष्ट प्रत्यक्ष होऊं शकतें किंवा नाहीं हें पहाण्यासाठीं १९०५ खालीं झारनें कमिशन नेमण्यासाठीं संमति देखील दिली होती. दुसरा कालवा 'डान्युबमेन' हा होय. हा डान्यूब नदीच्या मुखापासून र्हाइन नदीच्या मुखापर्यंत गेला आहे. परंतु हा फार लहान असल्यामुळें यांतून फारच थोडया मालाची ने-आण करतां येते. १९०१ सालीं मोराव्हामधून डान्युब व ओडर यांनां जोडण्यासाठीं व डॅन्युब व मोल्डाडएल्ब यांनां जोडण्यासाठीं कालवे बांधण्याचा ऑस्ट्रियानें कायदा केला व हें काम १९२४ सालीं संपवावयाचें असें ठरविलें होतें. सर्वांत मोठा जलमार्ग म्हणजे र्हाइनवरील होय. त्यानंतर म्यूल नदी देखील जलगमनास योग्य आहे. व्हिश्रुला आणि मेमेल हे यूरोपच्या पश्चिम भागांतील जलमार्ग आहेत. कील कालवा स. १८९५ त सुरू करण्यांत आला.
आगगाडया:-आगगाडयांच्या रस्त्यांची एक रुंद रांग उत्तर समुद्रापासून पूर्वेकडे गेलेली आहे. या रांगेंतील एक रस्ता अॅमस्टरडॅम आणि हॅनोहरवरून उत्तरेच्या बाजूनें जातो व दुसरा रस्ता दक्षिणेच्या बाजूनें कॅले, लीज, डयुसेल्डार्फवरून जातो. हे दोन्ही रस्ते पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे आहेत. र्हाइन खोर्यांत या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणार्या रांगेला दुसरी उत्तरेकडून जाणारी रांग आडवी ओलांडून जाते. पॅरिस हें पश्चिम यूरोपांत आगगाडयांच्या रस्त्यांचें केंद्र आहे. येथून दोन रस्ते इटलीमधील आगगाडयांनां जाऊन मिळतात व दुसरे दोन रस्ते पिरिनीज पर्वताच्या दोन्ही शेवटांनां वळसे देऊन स्पेनमधील आगगाडीच्या रस्त्यांनां जाऊन मिळतात. मध्ययूरोपांतील बर्लिन हें केंद्र पॅरिसहून जास्त मोठें आहे. येथून एक रस्ता लिप्झिग आणि म्यूनिचवरून जाऊन इटलीमधील रस्त्यांनां मिळतो, आणि दुसरा ड्रेरसमन आणि प्रागवरून व्हिएन्नाला जातो. व्हिएन्नाहून पुढें एक फांटा ट्रिस्टीला व दुसरा व्हेनिसला जातो. बर्लिनपासून ईशान्येकडे दोन फांटे जातात व हे दोन्ही प्रशियन सरहद्द ओलांडण्यापूर्वी इड्तकुटूनेन येथें एकमेकांस मिळतात व हा संयुक्त मार्ग पुढें सेंटपीटर्सबर्गपर्यंत जातो. बर्लिनपासून निघणार्या मार्गाचा एक फांटा थार्नपासून फुटतो व पुढें वार्सावरून मोस्कोला जातो. पूर्वयूरोपांतील मोस्को हें मुख्य केंद्र आहे. बर्लिनापासून एक मार्ग ब्रेस्ला, क्रॅको, आणि लेम्बर्गवरून ओडेस्साला जातो. लंडन आणि कान्स्टांन्टिनोपल यांच्या दरम्यान इन्टरनॅशनल स्लिपिंग कार कंपनीनें दोन मार्ग (आगगाडयांचे) बांधले आहेत.
एका देशांतून दुसर्या देशांत जाण्यासाठीं आगगाडयांचे मार्ग बांधतांना पर्वतांचा व त्यांतल्यात्यांत आल्प्स पर्वतांचा तर फारच अडथळा येत असे. आल्प्स पर्वतावरून पहिला मार्ग १८४८-१८५४ मध्यें व्हिएन्नापासून अॅड्रिआटिक समुद्रापर्यंत बांधण्यांत आला. त्यानंतर १८७१ व १८८२ सालीं आणखी दोन मार्ग बांधले. अलीकडे (१९०६ सालीं) याच पर्वतावर सिम्लोन मार्ग तयार करण्यांत आला. कार्पेथियन पर्वतांवरूनहि बर्याच आगगाडया नेल्या आहेत व त्या बहुतेक ३००० फुटांच्या आंतील उंचीच्या घाटांवरून नेल्या आहेत.
एका देशांतून दुसर्या देशांत जाण्यासाठी आगगाडयांचे मार्ग बांधले गेल्यामुळें जलमार्गानें चालणार्या व्यापारास बराच धक्का बसला आहे. जास्त मौल्यवान व लवकर नासणारा माल हल्लीं पर्वतांतून देखील एकदम आगगाडीनें पाठवितां येतो त्यामुळें व्यापारी लोक आगगाडीनें माल नेण्याच्या भरीस नडत नाहींत.
मनववंशवर्णन.-यूरोपमधील लोक कोणत्या मानववंशाचे आहेत याची चौकशी हल्लीं यूरोपमध्यें बरीच जोरानें चालू आहे. हे लोक आर्यवंशाचे आहेत ही कल्पना तर आतां अगदीं नाहींशी झाली आहे इतकेंच नव्हे तर आर्य संस्कृतीचा या लोकांत प्रसार झाला किंवा नाहीं याविषयींहि वानवाच आहे. आर्यांच्या प्राचीन भाषांचा यूरोपच्या कोणत्यातरी भागांतून या लोकांत शिरकाव होऊन प्रसार झाला येवढें मात्र खास सांगतां येतें. या लोकांच्या एकंदर रंगरूपावरून मानवशास्त्रेवत्त्यांनीं असें ठरविलें आहे कीं हे मोठाल्या तीन प्रकारच्या वंशापासून उत्पन्न झालेले आहेत:(१) टयुटॉनिक-यांचें डोकें व यांचा चेहरा लांबट असतो, नांक अरुंद व गरुडासारखें असतें, अंगकाठी उंच असते, केंस फिक्कट व डोळे निळे असतात (२) अल्पाइन यांचें डोकें वाटोळें, चेहरा रुंद, नाक व रुंद व बोजड, उंची मध्यम, अंगकाठी सरळ, केंस फिकट चेस्टनट रंगाचें, आणि डोळे धुरकट पांढरे असतात. (३) मेडिटेरनिय-यांचें डोकें व चेहरा लांबट, नाक रुंद, उंची मध्यम, बांधा सडपातळ, केंस काळसर तपकिरी किंवा काळे आणि उोळे काळे असतात. टयुटानिक वंशाचे लोक वायव्य यूरोपांतच आढळतात व त्यांत केल्टिक भाषा बोलणार्यांचे कांहीं वग्र येतात. पिरिनीज पर्वताच्या दक्षिणेस, फ्रान्सच्या दक्षिण किनार्याला लागून दक्षिण इटलीमधें रहाणारे व आयबेरियन किंवा लिगुरियन या वंश नांवानें प्रसिद्ध असलेले लांबट डोक्याचे आणि हे लोक (टयुटानिक) पूर्वी एकच असावेत असें रिप्ले याचें मत आहे. अल्पाइनवंशाचे लोक या दोन्ही वंशांच्या लोकांच्या (टयुटानिक व मेडिटरेनियन) मध्यें आढळतात. यांचें ठिकाण आल्प्स पर्वत आहे. लॅटिन, ग्रीक, प्राचीन स्लॅव्होनिक, आणि हिब्रू या भाषा सोडल्या तरी अजून येथें साठ भाषा प्रचारांत आहेत. यूरोपांतील लोक व त्यांच्या भाषा यांविषयीं सविस्तर माहिती 'बुद्धोत्तर जग' या विभागाच्या १९ व्या प्रकरणांत आढळेल. यूरोपखंडांतील राष्ट्रांची माहिती त्यांच्या नांवाखालीं इतरत्र दिलेली आहे.
इतिहास.-यूरोपचा संक्षिप्त इतिहास 'बुद्धोत्तर जग' या विभागांत दिला आहे. विशेषेंकरून त्यांतील १,२,४-५, पासून महायुद्धापर्यंत हा इतिहास लांबविला आहे. महायुद्धानंतरची यूरोपची स्थिति थोडक्यांत दिली आहे.
महायुद्धानंतर यूरोपमध्यें सर्व दृष्टींनीं महत्त्वाचे फेरफार घउून आले असें म्हणावयास हरकत नाहीं. महायुद्धानें यूरोपचा नकाशा बदलून टाकला. व्हर्सेलिस, सेंट जर्मन, ट्रियानॉन, न्यूइली व सेव्हर्स या तहांनीं पोर्तुगाल व स्पेन या दोन राष्ट्रांशिवाय इतर सर्व यूरोपमधील राष्ट्रांच्या प्रादेशिक मर्यादांमध्यें फेरफार घडून आले. पश्चिमयूरोपमध्यें महायुद्धानें जो महत्त्वाचा परिणाम घडवून आणला तो म्हणजे या भागांत फ्रान्सचें वर्चस्व निर्विवादपणें प्रस्थापित झालें हा होय. तसेंच फ्रान्सची प्रादेशिक सत्ता विस्तृत झाली. अलसेस-लोरेन प्रांत पुन्हां फ्रान्सच्या ताब्यांत आले. र्हाईन नदीच्या डाव्या तीरावरील वसार-व्हॅलीमधील जर्मनीचा मुलुख राष्ट्रसंघाला जबाबदार असलेल्या दोस्तराष्ट्रांच्या कमिशनच्या ताब्यांत पंधरा वर्षेपर्यंत आला. लक्झेंबर्ग जर्मनीपासून तुटक करण्यांत आलें. यूरोप व पालमेडी या प्रांतांमधील जर्मनीचा कांहीं मुलुख बेल्जमला मिळाला. पश्चिमयूरोपपेक्षांहि मध्ययूरोप व पूर्व यूरोप यांमध्यें फारच महत्त्वाचे गड्डे म्हणून नांवाजलेल्या राष्ट्रांत लोकशाही स्थापित होणें हा फारच मोठा फेरफार होय असें म्हणावयास हरकत नाहीं. महायुद्धापूर्वीच्या जर्मनीच्या ताब्यांतील मुलुखाचे लचके तोडण्यांत आले तरी जर्मन राष्ट्र हें पुन्हां अभेद्यच राहिलें. शांतता-परिषदेंतील वाटाघाटींत जर्मनी जेणेंकरून सांपत्तिाक व औद्योगिकदृष्टया हतबल होईल अशा प्रकारचे प्रयत्न करण्यांत आले व त्यांतच जर्मनींतील अं:तस्थ परिस्थिति बिघडल्यामुळें जर्मनीला यूरोपीय राजघराण्यांत प्रामुख्यानें भाग घेतां येईना. पांचव्या चार्लसपासून ऑस्ट्रियामध्यें हॅब्सबर्ग घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली होती ती महायुद्धानें लयाला जाऊन ऑस्ट्रियामध्यें महत्त्वाचें स्थित्यंतर घडून आलें. १५२६ सालापासून बोहेमिया हा ऑस्ट्रियाच्या ताब्यांत होता तो जाऊन त्याचें चेकोस्लोव्हेकिया हें स्वतंत्र राष्ट्र बनलें; व मोरेव्हिया, सायलेशियाचा कांहीं भाग, टेशेन, व रूथेनियन लोक ज्यामध्यें रहात असत तो हंगेरीचा भाग या नवीन राष्ट्रांत सामील करून घेण्यांत आला. सर्व्हिया, क्रोएशिया, डाल्मेशिया, कार्निओला इरूट्रि या प्रदेशांमधील ऑस्ट्रियाचा प्रदेश याचें एकीकरण होऊन त्याला जुगोस्लाव्हिया हें नवीन नांव दिलें. इटलीला ऑस्ट्रियांतील बराच भाग ट्रीस्ट, गोरीझिया, ट्रेंरटिनो, टिरोल, इत्यादि महत्त्वाचे प्रदेश मिळाले व त्यामुळें इटलीची प्रादेशिक मर्यादा वाढली. रुमानियाला बनाटचा कांहीं भाग, ट्रॅरन्स्लिल्व्हानिया, बेंसरेबिया इत्यादि भाग मिळाला. पोलंड हें स्वतंत्र राष्ट्र बनलें. डॅनिश शहर व त्या सभोंवतालचा प्रदेश राष्ट्रसंघाच्या संरक्षणाखालीं आला. लिथुआनिआ, रशिया व प्रशिया यांच्या कचाटयांतून सुटून स्वतंत्र झाला. १९१७ सालीं रशियांत राज्यक्रांति होऊन रशियन साम्राज्य विस्कळित झालें; पण दोन तीन वर्षांतच सोव्हिएट राज्यपद्धति अस्तित्वांत येऊन आतां सोव्हिएट समाजसत्तावादी लोकसत्ताक राज्याचा एक संघ स्थापण्यांत आला आहे. यांत रशिया, युक्रेन, श्वेतरशिया आणि ट्रान्सकॉकेशियन फेडरेशन, यांचा समावेश होतो.