विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
येवलें, तालुका.- मुंबई, नाशिक जिल्ह्यांतील एक तालुका. क्षेत्रफळ ४१० चौरस मैल. खेडयांची संख्या ११९ व लोकसंख्या (१९२१) ४८४०८ आहे. पावसाचें मान २३ इंच.येथील सर्व जमीन खडकाळ आहे. सभोंवतालच प्रदेश डोंगरी असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून ३१८२ फूट आहे. तालुक्याचें मुख्य शहर येवलें. हें दौंड मनमाड लाईन वर असून मनमाडपासून १३ मैलांवर आहे. लोकसंख्या सोळा हजार. १८५८ सालीं येथें म्यु. कमिटीची स्थापना झाली. येथें रेशीम व सुती कापड फार उत्तम प्रकारचें निघतें. रेशमाचे व सुती कापडाचे बरेच हातमाग असून सात आठ हजार लोकांचा त्यांवर उदरनिर्वाह चालतो. येवलें शहर वसविलें त्यावेळीं तें दिल्लीच्या बादशहाकडे होतें. मराठेशाहींत माधवराव पेशव्यांनीं विंचुरकरांनां जहागीर दिलेलें होतें.