विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रक्तपित्त रोग - या रोगामध्यें रक्तांतील घटकद्रव्यांत फेरफार होऊन त्यामुळें तें रक्त शरीरांत त्वचेखालीं ठिकठिकाणीं फुटल्यामुळें लाल डाग अंगावर उठणें, हिरडया काळसर होऊन त्यांत शैथिल्य येणें, अति अशक्तपणा, पांढुरता हीं लक्षणें असतात. रोग होण्याचीं कारणें:-हा रोग स्त्री-पुरुष यांनां कोणत्याहि वयांत सारख्याच प्रमाणांत होतो व त्यास कारण आहारामध्यें ताजा भाजीपाला व फळफळावळ यांचा अभाव होय. शरीराच्या पोषणास आवश्याक असें जीवनसत्त्व उष्णतेनें व भाज्या वाळवून फार दिवसांच्या शिळ्या झाल्यानें नष्ट होतें.
लक्षणें.- हीं अत्यंत सावकाश दिसूं लागतात. रोगी अंमळ सुस्त, फिकट, अशक्त, कंटाळलेला असून शरीरांत आज येथें दुखतें तर उद्या दुसरीकडे कंबरेंत दुखतें अशी कुरकुर करूं लागतो. नंतर सुमारें आठदहा दिवसांनीं पायावर व इतर जागीं केंसाच्या मूळाभोवतीं रक्त फुटल्यामुळें बनलेले लाल, किंवा लालसर लहान डाग, कधीं पिंगट रंगाचे दिसतात. दुसरें लक्षण म्हणजे पोटरीच्या वरील अथवा दंडाच्या खालील बेचकळींत किंवा जबडयाच्या खालील खळगीच्या कोपर्यांत व पायाच्या नळीवर मोठया टणक व लाल अशा गांठी उत्पन्न होतात; तिसरें ठराविक लक्षण म्हणजे वर सांगितलेला हिरडयांतील बदल होय. त्या खूप फुगून सुजतात, व दातांच्या कवळीपासून सुटून काळ्यानिळ्या, अति दुसर्या आणि जरा धक्का लागल्याबरोबर चळचळा रक्त निघणार्या अशा होतात. व म्हणून दांतहि हळूं लागतात. या सर्व लक्षणांमुळें रोगी निस्तेज व फिकट दिसतो व थोडया श्रमानें त्यास धांप लागते. पायावर सूज येते. जास्त भयंकर रोगामध्यें उदर, आंतडीं किंवा फुफ्फुसें यावाटेंहि रक्तस्त्राव होतो. फुफ्फुसदाह, फुफ्फुसकोथ, रक्तमयहृदयावरण अगर फुफ्फुसावरणदाह; प्लीहा वाढणें, लघवींतून अलब्यूमिन जाणें यांपैकीं एखादा आगंतुक रोग या रोग्याला होण्याचा संभव असतो. पुष्कळ आठवडयांनीं अथवा महिन्यांनी रक्तनाश, ग्लानि यामुळें मृत्यु यतो. अगर घेरी, बेशुद्धि, फुफ्फुसरोग, रक्तजमूर्च्छा, फुफ्फुसावरण अगर हृदयावरण दाह या कारणांनी एकाएकी रोग्यास मृत्यु येतो.
बालरक्तपित्तारोग.-हा दोन वर्षांच्या आंतील मुलांनां होतो व याबरोबर अस्थिमार्दव या बालरोगाचें साहचर्य बहुधां असतें. मोठया माणसांच्या रोगांत वया भेदांत फरक असतो. हा रोग होण्याचें कारण दूध फार वेळ उकळल्यानें ताज्या दुधांतील आवश्याक जीवनसत्व नष्ट होऊन किंवा भाल्टमिश्रित व इतर बाजारचीं बालकाचीं अन्नेंच मुलांनां विशेष पाजून ताजें दूध कमी करणें हें होय. हा रोग झालेलीं मुलें रोड होत नाहींत पण चालण्यांत मंद असून कोणी बळें चालविलीं तर तें त्यांस सहन न होऊन ती रडतात. कारण त्यांचीं मृदू कोवळीं हाडें दुखतात. मुलास उचलून घेण्यासाठी कोणी हात पुढें केला कीं मूल भयानें किंचाळतें; व सदा मांडया वर करून लुल्याप्रमाणें अंथरूणात पडून रहाणें त्यास आवडतें. अस्थि अगदी दुखरें होतात. पायावर अंमळ सूज असते. दंतोद्भव असल्यास हिरडया सुजतात, घुणघुणा फुटणें, रक्तामिश्रित लघवी, फिकट चेहरा हीं रांगाचीं लक्षणें असतात.
उपचार.-हे मुख्यत: आहारांत फरक करणें यासंबंधीं असणार हें स्पष्टच आहे. महणून रोग्यानें ताजा व विपुल भाजीपाला व फळफळावळ पचनशक्तीप्रमाणें खाण्यांत आणावा हें इष्ट आहे. बटाटे, कोबी, पालेभाज्या, सालीट व धर्मास आडकाठी नसल्यास एकदां दिवसांतून थोडे ताजें मांस हें खाण्यांत यावें. तोंड आलें असेल तर ताजें दूध, मांसार्क मांसकषाय, अंडी यांचे सेवन करावें, हिरडया सुधारण्यासाठीं तुरटीयुकत बाभूळ अगर बकुळाच्या सालीच्या काढयाच्या गुळण्या कराव्या व इतर बारीक दुखण्यासाठीं निरनिराळीं त्यावरचीं ओषधें घ्यावीं.
आयुर्वेदीय.-नाक, तोंड, शिश्न व गुदद्वार वगैरे छिद्रांतून एकाएकीं व वरच्यावर रक्त पडणें यास रक्तपित्त म्हणतात. कुपित झालेलें उर्ध्वगामी रक्तपित्त नाक, डोळे, कान व तोंड या चार मार्गांनी बाहेर पडतें. अधोगामी रक्तपित्त शिश्न, योनि व गुद या मार्गांनी बाहेर पडतें. आणि उभयगामी रक्तपित्ता संपूर्ण रोमरंध्रांतून तसेंच वर सांगितलेल्या सर्व मार्गांनीं बाहेर येतें. उर्ध्वगामी रक्तपित्तावर कडु व तुरट हे रस, नागरमोथ, चंदन, पित्तपाडा, वाळा व काळा वाळा, हीं औषधें घालून कढविलेलें पाणी व उपास हे शामक उपाय आहेत. अधोगामी रक्तपित्तास बृंहण करणारा मधुर रस हितकर आहे. ऊर्ध्वगामी रक्तपित्तांत प्रथम सातूचें तरवणी व अधोगामी रक्तपित्तांत प्रथम पेया द्यावी. रक्ताच्या गांठी पडत असल्यास पारव्यावी शीट (विष्ठा) मधांतून चाटवावी. ज्याच्या शरीरांतून अतिशय रक्त निघून गेलें असेल त्यानें जांगल प्राण्याचें रक्त मध घालून प्यावें. किंवा बकर्याचें यकृत् पित्तासुद्धां कच्चें खावें. ज्वरचिकित्सेंत पित्ताज्वरावर जे काढे सांगितले आहेत त्यांचाहि उपयोग करावा.