विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रंगकाम - धाग्यावर रंग चढवून तो पक्का बसविण्याच्या कलेस रंगकाम म्हणतात. ह्या कलेचा उगम हिंदुस्थान, इराण व चीन या देशांत होऊन त्या ठिकाणीं ती बरीच प्रगल्भ दशेस पोहोंचली होती. हळू हळू ह्या कलेचा शिरकाव ईजिप्तमध्येंहि झाला व जसजशीं व्यापारी दळणवळणचीं साधनें वाढत चाललीं तसतसा हिचा प्रसार यूरोपमधील ग्रीस व रोम या राष्ट्रांमधून सर्व पाश्चात्त्य राष्ट्रांत झाला. प्रथम रंगद्रव्यें झाडपाल्यांच्या व फळांच्या रसांपासून तयार करीत असत, पण १९ व्या शतकाचा निम्मा भाग लोटल्यावर कर्बडांबरापासूनहि तीं कृत्रिमरीत्या तयार करतां येतात हें प्रयोगानें सिद्व झालें व त्यामुळें बरेच रंग प्रचारांत येऊन ही कला पाश्चात्त्य देशांतच वाढीस लागली. अलीकडे तर वनस्पतींपासून मिळणारे नीळ, मंजिष्ट वगैरे रंगहि रासायनिकरित्या तयार करतां येऊं लागले आहेत.
कोणताहि रंग धाग्यावर चढवितांना धाग्याचा व त्या रंगद्रव्याचा पूर्ण मिलाफ होऊन त्यावर तो रंग टिकेल कसा याबद्दल खबरदारी घेतली पाहिजे. साधारणत: लोंकर लवकर रंगविली जाते, रेशमास रंगविण्यास थोडा अधिक वेळ लागतो व कापसास रंगविण्यास तर सर्वांत जास्त वेळ लागतो. रंगवितांना दिसून येणारे हे फरक वस्तूच्या व रंगांच्या रासायनिक रचनेवर अवलंबून असले पाहिजेत. निरनिराळ्या प्रकारच्या धाग्यावर निरनिराळे रंग देतांनां निरनिराळ्या क्रिया कराव्या लागतात. आपण या क्रियेवरूनच रंगाचें वर्गीकरण करून ते धाग्यावर कसे चढवितात या स्थूलमानानें विचार करूं.
(१) अम्लिक रंग, (२) अनाम्लिक रंग, (३) रंगबंधकरविरहित रंग (डिरेक्ट कलर), (४) प्रगट रंग (डिव्हेलप्ड कलर:), (५) रंगबंधकरयुक्त रंग, (६) इतर रंग, (७) खनिज रंग. आतां आपण यांचा विचार करूं.
अम्लीकरंग.- हे रंग त्यांत असणार्या नायट्रो किंवा गंधनिकाम्ल मूलकाच्या योगानें अम्लीक झालेले असून धाग्यावर चढवितांना ह्या रंगांच्या द्रावणामध्यें थोडेसें अम्लहि टाकतात. हे रंग अनाम्लिक धातूंच्या क्षारस्वरूपांत असल्यामुळें त्यांवर ह्या अम्लाची क्रिया होऊन अम्लयुकत रंग वेगळा होऊन नंतर धाग्यावर चढतो. नीळ सत्व, प्रशियन ब्ल्यू, गुलाब निलीन, परुषाम्ल (पिक्रिक अॅसिड) वगैरे रंग ह्याच वर्गांत येतात. ह्या वर्गांतील कांहीं रंगांवर प्रकाशाची क्रिया होऊन ते कोमेजत जातात तर कांहीं बरेच गडद रीतीनें बसतात. लोंकर, रेशीम कातडीं वगैरे रंगविण्याकडे यांचा उपयोग होतो.
अनाम्लिकरंग.-हे रंग म्हणजे सेंद्रिय अनाम्लिक मूलकांचे क्षार असून त्यांच्यांतील रंग चढविण्याची क्रिया त्यांच्या अनाम्लिक (बेसिक) भानावर अवलंबून असते. ह्या वर्गांतील रंगावर अम्लाची क्रिया केल्यास द्राव्य रंग-क्षार मिळतात. लोंकर व रेशीम यांवर हे रंग तसेच चढले जातात पण कापूस मात्र रंगबंधकरानें माखल्याशिवाय रंगला जात नाहीं. ह्याकरतां कापूस प्रथमत: तनाम्लांत (टॅनिक-ऍसिड) बुडवून तें अम्ल त्या ठिकाणीं स्थिर रहाण्याकरितां तो विपाकक्षार (टार्टर एमिटिक) नांवाच्या क्षार-द्रावणांत धुतल्यास, त्यामुळें तनाम्ल तनित रूपानें धाग्यावर चढतें. ह्या तनितांत रंगद्रव्य आकर्षून घेण्याची शक्ति असल्यामुळें धाग्यावर रंग चढला जातो. तागहि अशच रीतीनें रंगबंधकरयुक्त करून नंतर रंगवितात. कर्बडामरापासून निघणारे बरेच रंग ह्या वर्गांत येत असून ह्यांचा रंग चांगला बसतो व त्यास चकाकीहि बरीच असते.
रंग बंधकर विरहितरंग.-ह्या वर्गांतील रंग कापूस रंगबंधकविरहित असेल तरी सुद्धां रंगविला जातो. ह्या वर्गांत येणारे रंग गंधकित चतुरजीव रंगांसह मिळणार्या अनाल्मिक धातूचे क्षार असतात. ह्या रंगांच्या उकळणार्या द्रावणामध्यें कापूस नुसता बुडविल्यास त्यावर रंग चढविला जातो. ह्या रंगांच्या बाबतींत धाग्यास रंग चढण्याचें प्रमाण दावणामध्यें असलेल्या रंगाच्या तीव्रतेच्या (कान्सेन्ट्रेशन) व्युत्क्रम प्रमाणावर अवलंबून असल्यानें हे रंग देतांना त्यांच्या द्रावणांतील तीव्रतेकडे बरेंच लक्ष द्यावें लागतें. याच द्रावणांत थोडेसें दार्वम्ल टाकलें असतां लोंकर व रेशीम लवकर रंगविली जातात. हळद वगेरे वनस्पतिजन्य रंग व कांगोरेड्सारखे कृत्रिम रंग याच वर्गांत येतात, ह्याच वर्गांतील गंधकिद रंग, त्यांचें द्रावण अनाम्लिक केल्याशिवाय धाग्यावर चढण्यास उपयुक्त नसतात. ह्या रंगाच्या योगानें फक्त वनस्पतिजन्य धागे रंगविले जाऊन त्यांवर हे रंग बरेच खुलून दिसतात.
प्रगटरंग.-ह्या वर्गांत बरेच अजीव रंग येत असून ते धाग्यावर प्रगट करतां येतात. प्राथमिक रंग ह्या वर्गांत येत असून त्यांत अम्रमूलक असल्यामुळें ते धाग्यावर चढवून नंतर जर त्यांवर ब्द्युजीवक्रिया केली व ते भानल किंवा अमिनाच्या द्रावणामध्यें ठेविले तर जें द्रावण वापरलें असेल त्याप्रमाणें धाग्यावर अजीवर रंग प्रगट होतात. ह्या वर्गांतील उद्-नत्रल (बेन्झो नायट्रॉल) रंगाच्या योगानें धागे रंगवून नंतर ते ब्द्युजीब द्रावणामध्यें ठेवल्यास चांगल्या रीतीनें प्रगट होतात.
रंगबंधकररंग.-ह्या वर्गांतील रंग कमजोर अम्लासारखे क्रिया देतात. त्यांचा मुख्य गुणधर्म प्राणिदाशीं अद्राव्य रंगयुक्त सांका देणें हा होय. ह्या सांक्यास लेक असें म्हणतात. हे रंग धागे रंगबंधकरयुकत केल्याशिवाय चढले जात नाहींत. हे रंगबंधकर रासायनिक क्षार असून ते धाग्यावर चढवून नंतर ते रंगद्रावणामध्यें घालून उकळले असतां रंगबंधकर स्थिर होत जाऊन त्यास रंग आकर्षून घेण्याची शक्ति येते व त्यामुळें रंग धाग्यावर चढतो. ही क्रिया धाग्यांच्या व क्षारांच्या गुणधर्मावर अवलंबून असते. हे क्षार बहुधां क्रुम, स्फट, वंग, ताम्र व लोह ह्यांचे असतात. कांहीं अम्लेंहि यांनां मदतनीस म्हणून योजितात. लोंकरीच्या बाबतींत योजिला जाणारा क्षार पालाश-द्वि-क्रुमित हा असून याच्या योगानें लोंकरीस मऊपणा येऊन तीवर निरनिराळीं रंगद्रव्यें चढविलीं जातात. ह्याच रीतीनें रेशीम रंगबंधकरयुक्त केल्यास हरकत नसते पण तें बहुधां कापसाप्रमाणें रंगबंधकरयुक्त करतात. रेशीम प्रथमत: निर्गुण स्थितींत असलेल्या क्रुमहरिद, लोहगंधकित वगैरेंच्या द्रावणांमध्यें भिजवून पाण्यांत खळबळतात व नंतर सिंधुसिकिताच्या थंड व पातळ द्रावणामध्यें बुडविल्यास रंगबंधकर सिकित रूपानें धाग्यावर चिकटतो. कापसाच्या बाबतींत ह्या रंगबंधकर चढविण्याच्या क्रिया पुष्कळच आहेत आणि त्यांच्या अंगी रेशीम व लोंकरीच्या अंगी असणारे धात्वीयक्षार विघटित करण्याचा गुणधर्म नसल्यामुळें त्या बर्याच गुंतागुंतीच्या आहेत. ह्यापैकीं एका क्रियेमध्यें कापूस प्रथमत: रक्त-तुर्की-तेला (टर्की रेड ऑईल) मध्यें भिजवून वाळवितात व नंतर स्फटहरिदासारख्या एखाद्या क्षाराच्या थंडद्रावणामध्यें थोडा वेळ ठेवून खडूमिश्रित पाण्यामध्यें बुडविल्यावर त्यास आलेला आम्लिकपणा नाहींसा होतो व त्यावर रंगबंधकर चिकटून बसून कापूस रंगविण्याच्या क्रियेस पात्र होतो. याशिवाय निरनिराळे रंग देण्याकरितां निरनिराळ्या रंगबंधकरांचा उपयोग करतात. एकाच रंगद्रव्यापासून निरनिराळ्या रंगांच्या छटा उत्पन्न करण्याकरितांहि वेगवेगळे रंगबंधकर उपयोगांत आणतात. ह्या वर्गांत वनस्पतिजन्य बरेच रंग येत असून यांत कृत्रिम रंगांचाहि भरणा खूप आहे.
मोठया प्रमाणांत रंग देतांनां कापूस व लोंकर यांवर यांत्रिक क्रिया करण्यापूर्वीच्या सुटया स्थितींत किंवा त्याचें सूत काढून रंगवितात. तें बहुधां रंगाच्या उकळणार्या द्रावणामध्यें ठेवून सारखे हलवितात व उष्णताहि हळू हळू वाढवितात.
पदार्थांमध्यें दिसून येणारे रंग त्यांच्या रासायनिक रचनेवर अवलंबून असल्यामुळें रंग घेण्याची क्रियाहि रासायनिकच असावी असें दिसतें. शिवाय धाग्यांचे गुणधर्म बदलल्यास त्यांच्या रंग घेण्याच्या क्रियेंतहि फरक होतो. ह्यावरूनहि वरील मतासच पुष्टि मिळते.