विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रंगपुर, जिल्हा.- बंगाल, राजशाहीभागांतील जिल्हा. क्षेत्रफळ ३४९३ चौरस मैल. रंगपुर हें एक मोठें मैदान आहे. पूर्वेकडील सरहद्दीवरून ब्रह्मपुत्रा नदी वहात जाते. पश्चिमेस करतोया ही नदी वाहाते. कुचबिहारच्या सरहद्दीवरून धरला नदी वाहाते. याशिवाय यांत मनास व गुजरिया ह्या नद्या आहेत. जिल्ह्यांत दलदलीच्या जागा पुष्कळ आहेत. येथील जमीन मळीची व रेताड आहे. जंगल मुळींच नाहीं. सरासरी ८२ इंच पाऊस पडतो.
इतिहास:-कामरूप अथवा प्रागज्योतिष या प्राचीन हिंदु राज्याचें रंगपुर हें मुख्य ठाणें होतें असा महाभारतांत उल्लेख आहे. ह्याची राजधानी पूर्वेस होती परंतु राजा भगदत्त यानें रंगपुर येथें आपलें राहण्याचें ठिकाण केलें असें म्हणतात. १५ व्या शतकापूर्वी ह्या ठिकाणीं चार निरनिराळ्या वंशांनी राज्य केलें असें समजतें. यांपैकीं पहिला वंश पृथ्वीराजाचा असून याच्या जलपैगुरी जिल्ह्यांतील भितरगड राजधानीचे कांहीं भाग अजून आहेत. यानंतर पाल घराण्याचे चार राजे झाले. शेवटीं नीलध्वज, चक्रध्वज आणि नीलांबर या तीन राजांनीं राज्य केलें. नीलांबर हा फार पराक्रमी राजा होता. १४९८ मध्यें नीलांबर व गौरचा अफगाण राजा अल्लाउद्दीन हुसेन या दोघांमध्यें तंटा झाला. अल्लाउद्दिनानें त्याला लोखंउाच्या पिंजर्यांत कैद करून नेलें. परंतु येथें मुसुलमानांनीं आपली सत्ता बसविली नाहीं. नंतर येथें बेबंदशाही सुरू झाली. या वेळेस रंगपूर येथील एक रानटी जातीचा सरदार बिसवसिंग यानें आपलें घराणें स्थापन केले. हा वंश कुचबिहारमध्यें अझून आहे. रंगपुर जरी १५८४ त मोंगल राजास जोडलें गेलें तरी १६६१ पावेतों त्यांच्या पूर्ण ताब्यांत गेलें नाहीं. कुचबिहारच्या राजांनीं मुसुलमानांच्या हाताखालीं न जाण्याचा निश्चय केला, शेवटीं १७११ त या राजांनीं मुसुलमानांशीं तह केला. ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीनें स. १७६५ त बंगालची दिवाणी सत्ता मिळविली त्यावेळेस रंगपुर हा प्रांत नेपाळ, भूतान, आसाम, आणि कुचबिहार या सरहद्दीवरील एक प्रदेश होता, व यांत रंगामाती जिल्हा व जलपैगुरी जिल्ह्याचा बराचसा भाग होता. प्रथम इंग्रजसरकारनें मुसुलमानांप्रमाणेंच काळीची पद्धत सुरू ठेविली परंतु १७८३ त शेतकर्यांचें बंड झालें. तेव्हांपासून सरकारनें जमिनदारीपद्धति सुरू केली. या जिल्ह्याचा ब्रह्मपुत्रा नदीच्या पूर्वेकडील प्रदेश १८२२ त गोलपाडा जिल्ह्याचा भाग होता, तो स. १८२६ त आसाम प्रांताला जोडला गेला. उत्तरेकडील तीन परगणे जलपैगुरी जिल्ह्यांत आहेत आणि दक्षिणेकडील बराचसा भाग बोग्रा जिल्ह्यास जोडला गेला. कमातापुर येथील करतोया नदीच्या पूर्वतीरावर एका प्राचीन किल्ल्याचा पडका भाग आहे व हा किल्ला खेन राजांपैकीं शेवटचा व पराक्रमी राजा नीलांबर यानें बांधला असें म्हणतात. हिमालयाच्या दक्षिणेस कांहीं मैलांवर धर्मपाल शहराचे कांहीं अवशेष आहेत. जिल्ह्यांत रंगपुर व सैदपूर हीं दोन मोठीं शहरें आहेत. रंगपुर येथील जमीन सुपीक असल्यामुळें इतर जिल्ह्यांच्या मानानें यांतील वस्ती दाट आहे. १९२१ सालीं लोकसंख्या २५०७८५४ होती. येथें शेंकडा ६४ मुसुलमान आणि शेंकडा ३६ हिंदु आहेत. येथें रंगपुरी किंवा राजबन्सी भाषा बोलतात.
शेतकी व व्यापार:-हा जिल्हा तंबाखूविषयीं फार प्रसिद्ध आहे. पश्चिमेकडील लाल मातीच्या भागांत तांदूळ आणि ऊंस होतो. येथील तांदूळ, ताग, मोहरी आणि तंबाखू हीं मुख्य पिकें आहेत. या ठिकाणीं सुती कापड, सतरंज्या, पोतीं आणि रेशीम विणतात. याशिवाय येथें पितळेचीं आणि कांशांची भांडी तयार करतात. बहुतेक सर्व व्यापार आगगाडयांनीच होत असतो. दोमार, दरबानी, सैदपुर आणि रंगपूर शहर या ठिकाणाहून ताग बाहेरगांवी पाठवितात. तंबाखू मुख्यत्वेंकरून ब्रह्मदेशांत पाठवितात. येथें बहुतेक इंग्रज, मारवाडी आणि शाहा लोक व्यापार करतात. रंगपुर खेरीजकरून इतर ठिकाणांची व्यवस्था जिल्हाबोर्ड पाहत असतें. येथें खाजगी व सार्वजनिक शिक्षणसंस्था एकंदर हजारांवर आहेत. रंगपुर शहरांतील धंदेशाळा ही मुख्य शिक्षणसंस्था आहे. जिल्ह्यांत २५ वर धर्मार्थ दवाखाने आहेत.
शहर.-रंगपुर जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. हें राजा भगदत्ताचें राहाण्याचें ठिकाण होतें अशी दंतकथा आहे. हें शहर अफगाण राजा अल्लाउद्दीन हुसेन यानें हस्तगत करून १४९३-१५१९ पावेतों या शहरावर राज्य केलें. येथील हवा फार वाईट आहे. येथें १८९७ त मोठा भूकंप झाला होता. त्यावेळेस बहुतेक सर्व इमारती पडल्या व बरेंच नुकसान झालें. या ठिकाणीं स. १८६९त म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथील तुरुंगांत तेल काढणें, दोर्या व दोर तयार करणें, बांबूचें व वेताचें काम, सुतारकाम, तांदूळ सडणें, गहूं आणि कडधान्य भरडणें वगेरे कामें होतात. येथें एक हायस्कूल आहे. १८८९ त बेली गोविंदलाल नांवाची धंदेशिक्षणाची शाळा स्थापन झाली असून ती सिबपूर इंजिनियरिंग कॉलेजास जोडलेली आहे.