विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रणजितसिंग - पंजाबांतील शीख लोकांचा राजा. याचा जन्म १७८० च्या सुमारास झाला. अब्दालीनें पंजाब जिंकला होता, पण तो मेल्यावर अफगाणांत तंटे माजल्यानें शीखांनीं पंजाब पुन्हां आपल्या ताब्यांत घेतला आणि लहान लहान स्वतंत्र राज्यें स्थापिलीं. पुढें त्यांच्यांतहि तंटे सुरू झालें. तेव्हा चतरसिंग नांवाच्या एका राजानें ही सर्व राज्यें एक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा पुत्र महासिंग, यानें त्या सर्व राजांचें एक मंडळ बनविलें; त्याचा मुलगा रणजितसिंग. बाप वारल्यावर हा गादीवर आला. तेव्हां याचें वय १३ वर्षांचें होतें. यानें शौर्यानें व मुत्सद्दीगिरीनें सर्व शीख राजांचें आधिपत्य आपल्याकडे (वयाच्या १९ व्या वर्षी) घेतलें (१७९९) आणि काबूलच्या झमानशहाकडून लाहोर घेऊन स्वत:स राजा पदवी मिळविली व १८०२ सालीं अमृतसर जिंकलें. तथापि सतलजच्या शीख संस्थानांनी याचें वर्चस्व कबूल केलें नाहीं. तिकडे यमुनेपर्यंत आपला राज्यविस्तार व्हावा अशी याची फार इच्छा होती. म्हणून रणजितनें १८०६ सालीं लुधियाना घेतलें. पुढें नाभा व पतियाळा या दोन संस्थानांतील तंटयाचा फायदा घेऊन रणजितनें सतलज पुन्हां ओलांडली व सरहिंदप्रांतांतून खंडणी गोळा केली (१८०७). तेव्हां त्या संस्थानांनीं इंग्रजांची मदत मागितली. पण इंग्रजांनांहि रणजितची भीति वाटत होती. त्यावेळीं लॉर्ड मिंटो (पहिला) हा गव्हर्नर जनरल होता. त्यानें मेट्काफ यास पाठवून रणजितशीं तह केला (१८०९). या तहानें रणजिताची सरहद्द सतलज ठरली व इंग्रजांनीं लुधियाना येथें आपलें लष्कर ठेविलें. यमुनेपासून सतलजपर्यंतचा प्रांत या तहामुळें इंग्रजांच्या वर्चस्वाखालीं आला. रणजितनें हा तह शेवटपर्यंत पाळला. त्यामुळें इंग्रज लोक याला आपला जिवलग दोस्त म्हणत. रणजितनें १८२३ सालीं पेशावरप्रांत जिंकला होता. अफगाणिस्तानांतील १८३६-३७ च्या धामधुमींत इंग्रज व रणजित हे काबूलकडे आपला हात शिरकविण्याचा प्रयत्न करीत होते. रणजितकडे असलेला पेशावरप्रांत काबूलचा अमीर दोस्तमहंमद हा इंग्रजांजवळ मागत होता; त्यास या कामीं रशिया व इराण यांनीं मदत केली. रणजितला इंग्रज त्यावेळीं भीत होते, म्हणून त्यांनीं पेशावर दोस्तमहंमदास देण्याबद्दल रणजिताला आग्रह केला नाहीं. शेवटीं शहासुजा (अब्दालीचा पणतू)शीं इंग्रज व रणजित यांनीं तह केला. या तहानें पेशावरप्रांत व सिंधूनदीवरील सर्व मुलुख रणजितच्या हातीं आला (जून १८३७). या नंतर या दोघांनीं दोस्तमहंमदाचा पराभव करून शहासुजास काबूलच्या गादीवर बसविलें. यानंतर दोन वर्षांनीं रणजित वारला (२७ जून १८३९). यानें ४० वर्षे अव्याहत श्रम करून शीखांत लष्करी सामर्थ्य उत्पन्न करून त्याचें राष्ट्र उत्तम भरभराटीस आणलें. हा वारला असतां इंग्रजांच्या दिल्ली, आग्रा, अलाहाबाद व इतर मुख्य मुख्य लष्करी छावण्यांमधून याच्या बयाच्या संख्येइतक्या (५९) तोफा (त्याच्या सन्मानार्थ) सोडण्यांत आल्या होत्या. त्याच्या राण्यांपैकीं चवघीजणी व सात नाटकशाळा या सती गेल्या. त्याच्या मागून त्याचा वडील पुत्र खरकसिंग हा राजा झाला. रणजितला पंजाबचा सिंह म्हणत. याचें राज्य पेशावरपासून सतलज पर्यंत पसरलें होतें; तसेंच काश्मीरदेशहि त्याच्या ताब्यांत होता. हा एका डोळ्यानें आंधळा होता. शेवटीं शेवटीं त्याला दारूचें व विषयसेवनाचें व्यसन लागलें. त्यामुळें त्याला १८३४ सालीं अर्धांगवायूचा झटका आला. त्यांतून बरा झाल्यावर पुन्हां १८३८ सालीं (या वर्षीच गव्हर्नर जनरल आक्लंडची व त्याची भेट झालीं) दुसरा झटका आला. यामुळें तो पुढें जास्तच अशक्त होत गेला आणि त्याच्या शेवटच्या (मरणाच्या) वर्षांत त्याचा पूर्वीसारखा दरारा राज्यांत राहिला नाहीं. रणजित फार शूर, मुत्सद्दी व युद्धशास्त्रांतील जाणता होता. त्याच्याबद्दल सर लेपेल ग्रिफीन म्हणतो, ''रणजितनें आपलें राज्य लष्करी दरार्यावर व शिस्तीवर स्थापन केलें; त्याचा राज्यकारभारहि व्यवस्थित होता. परंतु त्याच्या मागें हे गुण कोणाच्याच अंगीं नसल्यानें, त्याचा एकटयाचा पाठिंबा गेल्याबरोबर, सहा वर्षांत शिखांचें राज्य ढांसळून पडलें.'' रणजितच्या पूर्वी शिखात शिलेदारी लष्कर असून थोडेसें पायदळ असे व तोफखाना तर मुळींच नव्हता. रणजितनें या शीखखालसा (सैनिक) मध्यें उत्तम पायदळ, सुव्यवस्थित घोडदळ व चांगला तोफखाना यांची भर घातली. त्याचें बहुतेक सर्व लष्करी अंमलदार इटालियन अथवा फ्रेंच असत. वेंचुरा, अर्लाड व अॅव्हिटेबिले हे तीन सेनापती वर प्रसिद्ध नेपोलियनच्या हाताखालीं शिक्षण घेतलेले होते. सन १८४५ मध्यें ८८६६२ (पैकीं ५३७५६ पायदळ) शीख सैन्य असून, त्यांत ४८४ तोफा व ३०८ उंटावरील जेजाला होत्या. [प्रबील; काये; स्मिथ; कनिंगहॅम]-