विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रत्नागिरी, जिल्हा.-मुंबई इलाख्याच्या दक्षिण भागांतील जिल्हा. याचें क्षेत्रफळ ३९९८ चौरस मैल आहे. उत्तरेस जंजिरा संस्थान व कुलाबा जिल्हा; पूर्वेस सातारा जिल्हा व कोल्हापूर संस्थान; दक्षिणेस सावंतवाडी संस्थान व गोव्याचा प्रांत आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. जिल्ह्यांतील जमीन खडकाळ आहे. उंच टेंकडयांमधून पुष्कळ नद्या वहातात. या नद्यांच्या तीरावर मुख्य बंदरें आणि सुपीक जमिनी आहेत. जिल्ह्याच्या पूर्वेस पश्चिमघाटाच्या पर्वताची ओळ आहे. ह्या घाटाच्या टेंकडयांत पुष्कळ खिंडी आहेत; त्यामुळें रत्नागिरी जिल्हा आणि दख्खन ह्यांच्यामधील व्यापार सुलभ झाला आहे. जिल्ह्यांत सरोवरें मुळींच नाहींत. परंतु धामापुर, वराड, मालवणमधील पेंदुर, आणि चिपळूण तालुक्यामधील चिपळूण येथें तळीं आहेत. पश्चिमघाट व समुद्र ह्यांत बरेच झरे आहेत. व हे जिल्ह्याच्या उत्तरेस व दक्षिणेस पसरलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यांत नारळांचीं झाडें पुष्कळ आहेत. याशिवाय साग, किजळ, बांबू आणि काजू हीं झाडें बरींच आहेत. जिल्ह्यांतील हवा सर्वसाधारण आरोग्यकारक आहे. त्यांतल्यात्यांत दापोली हें उत्तम व आरोग्यकारक ठिकाण आहे. रत्नागिरी येथें सरासरी १०० इंच पाऊस पडतो.
इतिहास:-रत्नागिरि आणि कोल येथें बौद्धांच्या वेळचीं लेणीं आहेत त्यांवरून येथें प्राचीन बौद्ध वर्चस्व होतेसें दिसतें. नंतर रत्नागिरि हें एकामागून एक पुष्कळ हिंदु घराण्यांच्या ताब्यांतून गेलें; त्यांपैकीं चालुकय घराणें सर्वांत प्रबळ होतें. १३१२ सालीं रत्नागिरीवर मुसुलमानांनीं हल्ला केला. आणि दाभोळ येथें वस्ती करून राहिले. पुढें १४७० सालीं बहामनी राजांनीं विशाळगड आणि गोवा हस्तगत करून रत्नागिरीच्या बाकी राहिलेल्या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. १५०० सालीं सावित्री नदीच्या दक्षिणेचा कोंकणचा सर्व भाग विजापूरकरांच्या ताब्यांत आला. पुढें पोर्तुगीज लोकांचा अंमल हळू हळू कमी होऊं लागला. नंतर मराठे लोकांची सत्ता वाढूं लागली. शेवटीं शिवाजीनें विजापूरच्या सैन्याचा पराभव करून तो आपल्या मराठे लोकांसह रत्नागिरी येथें येऊन राहिला. त्यानें पोर्तुगीज व सिद्दी लोकांनां जिंकलें होतें. नंतर कांहीं वर्षे जिल्ह्याचा कांहीं भाग सिद्दी लोकांच्या ताब्यांत होता. मराठयांनीं कान्होजी आंग्र्यास आरमाराचा मुख्य अधिकारी नेमून रत्नागिरीचा कांहीं भाग त्यास राहण्यास दिला. १७४५ सालीं कान्होजीचा पुत्र तुहाजी यानें बाणकोट व सावंतवाडी यांमधील प्रदेश हस्तगत करून पेशव्यांची सर्व जहाजें लुटलीं. १७५५ सालीं इंग्रज आणि पेशवे यांनी सुवर्णदुर्ग येथील किल्ले उध्वस्त केले. आणि १७५६ सालीं तुळाजी आंग्र्याच्या आरमाराचा नाश करून विजयदुर्ग घेतलें ('आंग्रे' पहा). तहांत बाणकोट व नऊ खेडीं इंग्रजांनां मिळालीं. पुढें मालवण व वेंगुर्ले हीं कोल्हापूरकर व सावंतवाडीकर यांकडून इंग्रजांनां मिळालीं.
पुराणावशेष:-रत्नागिरी जिल्ह्यांत एकंदर ३६५ किल्ले आहेत, त्यांपैकीं मंडनगड हा फार प्राचीन किल्ला आहे. येथील पुष्कळ किल्ले १२ व्या शतकाच्या शेवटीं पन्हाळाच्या भोजनराजानें बांधिले असें म्हणतात. चंडिकाबाई आणि संगमेश्वर अशीं दोन हिंदूंचीं प्रसिद्ध देवालयें या जिल्ह्यांत आहेत. दाभोळ येथें एक जुनी मशीद आहे. कोंकणच्या दक्षिण भागांत खारेपाटण येथें जैन लोकांचें एक देवालय आहे. मालवणजवळ सिंधुदुर्ग किल्ल्यांत शिवाजीची मूर्ति आहे. जिल्ह्याची १९२१ सालीं लोकसंख्या ११५४२४४ होती. जिल्ह्यांत मालवण, वेंगुर्ले, रत्नागिरी (मुख्य ठिकाण) आणि चिपळूण हीं मुख्य शहरें आहेत. शेंकडा ९९ लोक मराठी(व कोंकणी) भाषा बोलतात. यांत ब्राह्मण, वाणी, भाटे, सोनार, कुंभार, चांभार इत्यादि जाती आहेत.
शेतकी व व्यापार:-नद्यांच्या तीरांवर सुपीक जमिनी आढळतात परंतु ह्यांत गहूं व कापूस होत नाही. दक्षिण तालुक्यांत मुख्यत्तवेंकरून मालवण येथें तांदुळाचें मुख्य पीक होते. नारळ व सोनताग ह्यांची लागवड फार आहे. जिल्ह्यांत शेतकीचा मुख्य धंदा आहे. परंतु कांहीं शहरांत व खेडयांत लुगडी व घोंगडया तयार करतात. राजापूरगावीं गुलाल होतो. विजयदुर्ग, देवगड आणि जवळपासच्या खेडयांत शिंगांचे अलंकार करतात. जडावकामाबद्दल रत्नागिरी फार प्रसिद्ध आहे. बाणकोट, हर्णै, देवगड, दाभोळ, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, मालवण आणि वेंगुर्ले हीं व्यापाराचीं मुख्य ठिकाणें आहेत.
राज्यव्यवस्थेकरितां जिल्ह्याचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग केले आहेत. उत्तरभागांत चिपळुण, दापोली, खेड, संगमेश्वर व दक्षिण भागांत रत्नागिरी, राजापूर, देवगड, मालवण व वेंगुर्ले हे तालुके आहेत. या जिल्ह्यांत वेंगुर्ले, राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण येथें म्युनसिपालिटया आहेत, याशिवाय जिल्हा व तालुके यांच्या व्यवस्थेकरितां जिल्हा व तालुकाबोर्डे आहेत. जिल्ह्यांत एकंदर ३०० वर शिक्षणसंस्था आहेत.
तालुका.-क्षेत्रफळ ४१५ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) १४२००० यांत रत्नागिरी व जयगड हीं मोठीं गांवें आहेत. या तालुक्यांत अजमासें १५० गांवें असून वसूल २ लाख रुपयांपर्यंत असतो.
शहर.-हें मुंबईपासून १३६ मैल असून उत्तार अक्षांश १६० ५९' व पूर्व रेखांश ७३० १८' यांवर आहे. लोकसंख्या १९०१ सालीं १६०९४ होती. येथील धक्का बांधलेला नाहीं. बोटी फक्त भरतीच्या वेळीं किनार्यापर्यंत येऊं शकतात. येथील मुख्य व्यापार मासळीचा असून, तो जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत विशेष असतो. १८७६ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथें दोन हायस्कुलें व बर्याच मराठी शाळा आहेत. १८७९ सालीं येथें औद्योगिक शाळा स्थापन झाली. १८६७ सालीं येथें एक दीपगृह बांधलें. येथें किल्ला आहे. बकुल, सत्यशोधक व बलवंत अशीं तीन वर्तमानपत्रें येथें निघतात.