विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रबडी - एक गुराखी जात. यांची हिंदुस्थानांत सुमारें ३ लाख वस्ती आहे; पैकीं सर्वांत जास्त राजपुताना व मुंबई इलाखा यांत आहे, यांनां भोपे, मोघेरायकस, विशोत्तर व सिनाई (कच्छप्रांतांत) हीं नांवें असून मुंबई इलाख्यांत यांची संख्या (१९२१) १३०००० आहे. मुख्यत्वेंकरून ही जात कच्छ, काठेवाड, पालनपूर व अहमदाबाद येथें आढळते. पूर्वी ही जात धारवाड व सिंधप्रांतांत व नंतर बलुचिस्तान येथें रानटी लोकांप्रमाणें कळप करून रहात असून पुढें हिनें गुजराथेंत प्रवेश केला. हे हिंगलाज देवीची पूजा व यात्रा करतात. त्यांची कुलदेवी जोधपूर संस्थानांत सिकोत्रा येथें आहे. आपण रजपूत कुलापासून उत्पन्न झालों असें रबडी म्हणवितात. ते गुराख्यांचा धंदा करतात; बकर्याची लोंकर व लोणी विकतात. त्यांच्यांत मामेबहिणीशीं लग्न करतात. परंतु आतेबहीण अथवा मावसबहीण लग्न करण्यास अयोग्य ठरते. जातींतली सर्व लग्नें एकाच ठराविक दिवशीं होतात. सुरतखेरीज करून इतर ठिकाणीं यांच्यांत पुनर्विवाह होतात. पुनर्विवाहाबद्दल जातभाई जबरदस्त कर वसूल करतात. या लोकांत विधवेनें दिराशीं लग्न करण्याला कांहींच हरकत नसून घटस्फोटहि प्रचलित आहे. रबडी लोक मातांची पूजा करतात. शिवाय, पाबू, यक्ष, क्षेत्रपाल वगैरे देवताहि पुजतात. त्यांचे उपाध्याय औदीच, सोमपुरे व राजगोंड ब्राह्मण असतात. हे पंचायतीमार्फत तंटयाचा निकाल लावून घेतात.