विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रविवर्मा -(१८४८-१९०६) एक हिंदी चित्रकार. जात क्षत्रिय. लहानपणींच यास भिंतीवर चित्रें काढावयाची संवय लागली; १३व्या वर्षी याचीं चित्रें पाहून त्रावणकोर सरकारनें यास आश्रय दिला; पुढेंहि हा 'आईल पेन्टिंग' चीं चित्रें काढूं लागला, व या कलेंत स्वावलंबनानें प्राविण्य मिळविलें. पौर्वात्य कल्पना पाश्चात्त्य पद्धतीनें हा उत्तम प्रकारें प्रगट करी; ह्यबद्दल लॉर्ड कर्झननें देखील याची फार प्रशंसा केली आहे. याच्या चित्रांस फार मागण्या येत असल्यामुळें यानें आपला एक छापखाना काढला. पण तो याच्या मृत्यूनंतर चालला नाहीं. बडोदें व म्हैसूर येथील राजवाडयांत यांची जीं चित्रें आहेत तीं पहावयास दूरदूरचे लोक येतात. आपल्या लोकांत चित्रकलेची जागृति करण्याचें महत्त्वाचें कार्य रविवर्म्यानें केलें आहे.