विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रॅव्हेना - इटली. रॅव्हेनाप्रांताच्या राजधानीचें शहर. १९२१ सालीं शहराची लोकसंख्या ७१८७७ होती. दारू आणि शेतकीचीं आउतें येथें तयार होतात. कॉर्सिनी कालव्यानें हें समुद्रास जोडलें गेलें आहे. येथें महत्त्वाचीं तेरा प्रार्थनामंदिरें आहेत. थियोडोरानें आपल्या कारकीर्दीत येथें एक भव्य राजवाडा आणि पेंलाझोडिटिऑडोरीक नांवाची एक उंच भिंत बांधली. या भिंतीच्या बाहेर थियोडोरची दशकोनाकृति समाधि आहे. सेन्ट फ्रॅन्सिस्को मंदिराजवळ डाँटेची समाधि आहे. येथें एक प्रदार्थसंग्रहालयहि आहे.
हें शहर थेसोलियन लोकांनीं वसविलें. पुढें तें रोमन लोकांच्या ताब्यांत गेलें; बंदराचें ठिकाण झाल्यापासून या शहरास विशेष महत्तव आलें. आल्प्समधील इमारतीचें लांकूड येथून परदेशीं जात असे. या शहरांतून कालवे नेलेले असल्यामुळें ठिकठिकाणीं पूल आणि नावा आढळतात. १५०९ सालापासून बरींच वर्षेपर्यंत हें पोपच्या ताब्यांत होतें. १८५९ सालीं हें शहर इटली देशाचा एक भाग बनलें.