विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राघुगड - मध्यहिंदुस्थान एजन्सीमधील एक संस्थान हें ग्वाल्हेरच्या रेसिडेन्सीमध्यें आहे. हें संस्थान माळव्यामधील खीचवाडा जिल्ह्यांतील गुनाच्या (देश) नैर्ऋत्येला सरासरी १७ मैलांवर वसलेलें आहे. १६७७ त लालसिंग खीची यानें बांधलेल्या राघुगड किल्ल्यावरून शहराचें नांव पडलें. यांत टेंकडया फार आहेत. तरी दर्यांमधील जमीन फार सुपीक आहे. पश्चिमेस पार्वती नदी वाहातें. हें संस्थान जरी लहान आहे तरी इतिहासदृष्टया फार महत्त्वाचें आहे. या ठिकाणीं खाची चव्हाण हें घराणें फार प्रसिद्ध होऊन गेलें. राघुगडचे सरदार व महादजी शिंदे यांच्यामध्यें फार भांडणें होत असत. येथील हवा समशीतोष्ण आहे. पाऊण्स सरासरी ३० इंच पडतो. लोकसंख्या सुमारें वीस हजार. रांगडी भाषा सर्व ठिकाणीं बोलतात. राघुगड ही राजधानी आहे. ह्या ठिकाणीं एक शाळा व इस्पितळ आहे.