विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राजगड-(१) राजपुतान्यांत अलवार संस्थानांतील राजगड जिल्ह्याच्या तहशिलीचें मुख्य ठिकाण. हें राजपुताना-माळवा रेल्वेवर रायगड स्टेशनच्या सरासरी एक मैल दक्षिणेस आणि अलवार शहराच्या २२ मैल दक्षिणेस आहे. अलवार संस्थान स्थापन करणारा प्रतापसिंग यानें १७६७ सालीं हें वसविलें. शहरांत पुष्कळ सुंदर इमारती आहेत; त्यांतल्यात्यांत किल्ल्यांतील राजवाडा व तेथील गिलाव्यावर काढलेली चित्रें फार प्रेक्षणीय आहे. महाराव राजा बेनीसिंग यांनी शहरासभोंवतीं भिंत बांधिली व खंदक खोदला. पूर्वेकडे अर्ध्या मैलावर जुन्या राजगड शहराचा काही पडका भाग आहे. हें शहर बडागुजर या रजपूत घराण्यांतील राजा बाघसिंग यानें दुसर्या शतकाच्या मध्यांत वसविलें आणि जवळच असलेला बाघोला तलाव यानेंच खोदला असें म्हणतात. ह्या तलावाच्या बांधावर जनरल कनिंगहेंम यास मनुष्यांच्या आकाराच्या तीन जैन मूर्ती व उत्तम रीतीनें बसविलेल्या देवळाच्या दरवाज्याच्या दोन बाजू सांपडल्या. नवीन शहर घडण्याच्या वेळेस या वस्तू उकरून काढल्या होत्या असें म्हणतात. पश्चिमेस १८ मैलांवर असलेल्या टेंकडयांच्या रांगेवर बडागुजर राजांची जुनी राजधानी पारनगर आहे व ही नीळकंठ महादेवाच्या देवालयाबद्दल प्रसिद्ध असून यात्रेची प्रसिद्ध जागा आहे. बडागुजर राजा अजयपाल यानें हें देवालय बांधलें असें म्हणतात, व गणपतीच्या मूर्तीखालीं लिहिलेल्या लेखामध्यें ९५३ सालीं हें बांधिलें आहे असा उल्लेख आहे. जवळच्या एका पडक्या देवळांत १३ फूट, ९ इंच उंचीचा एक मोठा पुतळा आहे.
(२) राजपुतान्यांतील बिकानेर संस्थानच्या रोणीनिझामतमधील रायगड तहशिलीचें मुख्य ठिकाण. हें बिकानेर शहराच्या पूर्व व ईशान्य यांमध्यें १३५ मैलांवर वसलेलें आहे. महाराजा गजसिंग यानें १७६६ सालीं हें शहर वसविलें व याचा मुलगा राजसिंग याच्या नांवावरून शहराला राजगड हें नांव पडलें. येथें इंग्रजी-मराठी शाळा, एक पोस्ट ऑफिस व एक दवाखाना आहे. राजगड तहशिलींत शेंकडा ३६ वर जाट लोक रहात असून त्यांपैकी बहुतेक पुनीया जातीचे असल्यामुळें या प्रदेशास पुनीया परगणा म्हणत असत.