विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राजगिर (प्राचीन राजगृह-गिरिब्रज)-बिहार-ओरिसा, पाटणा जिल्ह्यांतील एक जुनें शहर. गिरीव्रज किंवा राजगृह ही मगध देशाची प्राचीन राजधानी होय. फाहिआन लिहितो कीं, गिरिव्रज हें नव्या राजगृहाच्या दक्षिणेस सुमारें पाऊण मैलावर पांच टेंकडयांमध्यें होतें. ह्युएनत्संगानें असेंच लिहिलें आहे. तो आणखी लिहितो कीं पांच टेंकडयां मिळून भोंवतालीं कोटाप्रमाणें होतें. रामायणांत गिरिव्रजाचें वर्णन असेंच आहे. जुनें राजगृह-ज्यास हल्लीं पुराण राजगिर म्हणतात, त्यास हें वर्णन सर्वांशीं लागू पडतें. महाभारतांत पांच टेंकडयांची नांवें वैहार, वराह, वृषभ, ऋषिगिरि, आणि वैत्यक अशीं आहेत. सांप्रत त्यांस बैभारगिरि, विपुलगिरि, रत्नागिरि, उदयगिरि, सोनगिरी हीं नावें आहेत. बैभार टेंकडीवर जैन लेख आहेत, त्यांत बैभार आणि व्यवहार अशीं नांवें आढळतात. बौद्ध लोकांची पहिली पंचवार्षिक सभा ख्रिस्तपूर्व ५४३ व्या वर्षी वेथारो पर्वतावर भरली होती, तो हाच होय. राजगड हें नांव रामायणांत नाहीं. परंतु महाभारतांत वनपर्वतांत (अ. ८४, श्लोक १०३) आलें आहे. अश्वमेधाच्या वेळीं अश्व राजगृहास गेला होता (अ. ८२ श्लोक २). गिरिव्रज येथें उष्णोदकाचे झरे सरस्वती ओढयाच्या दोहों बाजूंस आहेत. व बैभार टेंकडीजवळहि आहेत. याच्या ईशान्येस २॥ मैलांवर गृध्रकूट पर्वत होता. तो सांप्रतचा शैलगिरी होय. नवे राजगिर शहर जुन्या शहराच्या २/३ मैल उत्तरेस आहे.