विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राजपिपला संस्थान - मुंबई, रेवाकांठा पोलिटिकल एजन्सींतील संस्थान. क्षेत्रफळ १५१७ चौ. मैल. ह्याच्या उत्तरेस नर्मदा व रेवाकांठयांतील मेवासी जहागिर्या; पूर्वेस खानदेश जिल्ह्याच्या मेवासि जहागिरी; दक्षिणेस सुरत जिल्हा व बडोदें संस्थान; आणि पश्चिमेस भडोच जिल्हा आहे. संस्थानचा भाग सातपुडा पर्वताच्या राजपिपला टेंकडयांनीं व्यापलेला आहे. नर्मदा व करझम या दोन मुख्य नद्या आहेत. पश्चिम बाजूखेरीकरून संस्थानच्या सर्व भागांत जंगल असून त्यांत सागाची व खैरांची पुष्कळ झाडें आहेत. येथील हवा रोगट आहे. पाऊस सुमारें ४५ इंच पडतो. परमार जातीचा उज्जनीचा रजपूत राजा सैदावत याचा मुलगा चोकाराणा हा राजपिपला घराण्याचा मुळ पुरुष होता. याच्या मुलीनें गोहळ जातीच्या मोख राजाशीं लगन केलें. तिला मोखराज पासून दोन मुलगे झाले. पहिल्यानें भावनगर वसविलें व दुसरा बापाच्या गादीवर बसला. अहमदनगरच्या मुसुलमान राजांनीं ह्यापूर्वीच १००० पायदळ व ३०० घोडेस्वार पुरवावे असा संस्थानच्या राजापासून करार करून घेतला होता आणि हा करारनामा अकबर गुजराथ घेईपावेतों अमलांत होता. अकबरानें या संस्थानावर ३५५५० रुपये खंडणी बसविली. ही खंडणी १७०७ पावेतों दिली जात होती. मुसुलमानांच्या अंमलानंतर दमाजी गायकवाउानें आठराव्या शतकाच्या शेवटीं संस्थानच्या चार सुपीक पोटविभागांपैकी अर्धा भाग घेतला. परंतु हा भाग गायकवाडापासून दरवर्षास ४०००० रुपये खंडणी देण्याच्या करारानें घेतला; ही रक्कम पुढें ९२००० रुपयेपर्यंत वाढविली गेली. पुढें संस्थानिक व गायकवाड यांत नेहमीं तंटे चालत असल्यामुळें इंग्रजसरकारनें संस्थानच्या कारभारांत ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली. १८८४ सालीं संस्थानांतील गैरव्यवस्थेमुळैं इंग्रजसरकारनें नेमिलेला अंमलदार व संस्थानचा राजा या दोघांच्या हातांत येथील राज्यकारभार दिला. १८८७ पासून १८९७ पावतों येथील राज्यकारभार इंग्रजसरकारच्या अंमलदाराकडे होता. पुढे तो संस्थानिकाकडे देण्यांत आला. सध्यांचे महाराणा विजयसिंह के. सी. आ. ई. हे स. १९१५ त गादीवर बसलें. यांनां १३ तोफांच्या सलामीचा मान आहे. हे राजधानी नांदोड येथें रहातात. संस्थानची लोकसंख्या (१९२१) १६८४२५ आहे. येथील कापूस हें मुख्य पीक असून शिवाय ज्वारी, बाजरी आणि कोद्रु हीं पिके होतात. आणि वायव्येकडील जमिनींत तूर, एरंडी, कापूस, हरभरा, बाजरी आणि भाताचें पिक होतें.
संस्थानचा २/३ भाग जंगलानें व्यापलेला आहे. यांत ४०९ चौरस मैल जंगल राखीव आहे. भडोच शहरापासून १४ मैलांवर रतनपूर खेडयाच्या जवळच्या टेंकडयांच्या पायथ्याशीं कारनेलियन नांवाच्या खाणी आहेत. या ठिकाणीं लोखंड व 'अकीक' दगड सांपडतात. हे दगड भिंतींतील जडावाच्या कामाकरितां खंबायतला पाठवितात. संस्थानांत भिल्ल लोक वेळूच्या कामटयाच्या चटया व टोपल्या करतात. येथून मव्हा व तीळ बाहेरगांवी पाठवितात आणि संस्थानांतील सर्व कापूस मुंबईस पाठवितात. नांदोड व अंक्लेश्वर यांच्यामध्यें आगगाडी सुरू झाली आहे. राज्यव्यवस्थेकरितां संस्थानांत निरनिराळे परगणें केले आहेत; प्रत्येक परगणा ठाणेदाराच्या हाताखाली आहे. नांदोड येथें एक म्युनिसिपालिटी आहे. संस्थानांत एक हायस्कूल व ८० वर प्राथमिक शाळा आहेत; यांपैकी पांच मुलींकरितां आहेत. संस्थानांत एक इस्पितळ व पांच दवाखानें आहेत. नांदोड येथें एक गुरांचा दवाखाना आहे.