विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राजापूर, तालुका.-मुंबई. रत्नागिरी जिल्ह्याचा मध्य तालुका. क्षेत्रफळ ६१६ चौरसम मैल व लोकसंख्या सुमारें दीड लाख. तालुक्यांत राजापुर शहर (मुख्य ठिकाण) व १८१ खेडीं आहेत. अणस्कुर्या व काजिर्डा ह्या दोन खिंडी आहेत. तालुक्यांत दर वर्षास सरासरी १३१ इंच पाऊस पडतो. जयतापूर व राजापूर हीं बंदरें आहेत.
शहर.-राजापूर तालुक्याचें मुख्य ठिकाण. हें समुद्रापासून १५ मैल आणि रत्नागिरी शहरापासून ३० मैलांवर उत्तर अक्षांश १६० ३४' व पूर्वेरेखांश ७३० ३१' यांवर वसलेलें आहे. हें अगदीं जुनें व प्रेक्षणीय असें कोंकणांतील शहर आहे. येथील प्राचीन इंग्रज वखारीची दगडी इमारत हल्लीं सरकारी कचेरीच्या उपयोगांत आणतात. रत्नागिरी जिल्ह्याचे हे बंदर असून या ठिकाणीं अरबी लोकांच्या व्यापाराच्या नावा येतात. सदर्नमराठा रेल्वे सुरू झाल्यापासून या ठिकाणचा व्यापार कमी झाला आहे. आखाताच्या दक्षिण टोंकास एक दीपगृह आहे. येथें सन १८७६ त म्युनिसिपालिटी स्थापन झाली. जेव्हां हें स. १३१२ त मुसुलमानांनीं पाहिल्यानें जिंकलें तेव्हां हें जिल्ह्याचें मुख्य शहर होतें. शिवाजीनें हें १६६०-६१त आणि पुन्हां १६७०त जिंकलें व येथील इंग्रजी वखारी लुटल्या. स. १७१३ त राजापुर हें आंग्रे यांजकडे आलें व तयांपासून १७५६ त पेशव्यांनीं घेतले. राजापुर हें पेशव्यांच्या बाकीच्या मुलुखाबरोबर स. १८१८ त इंग्रजांच्या ताब्यांत गेलें. शहरापासून एक मैलावर एक ऊन पाण्याचा झरा आहे. या उन्हाळ्यापासून एक मैलावर दुसरा एक झरा आहे. तो कधीं कधीं वाहातो; त्यावेळी गंगा आली असे मानून लोक यात्रेला येतात. शहराच्या मध्यभागीं एक विठोबाचें देऊळ आहे. तेथें वर्षांतून दोन वेळा यात्रा भरते. येथें एक इंग्रजी हायस्कूल व संस्कृत पाठशाळा आहे.