विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राणाघाट,पोटविभाग.-बंगाल, नडिया जिल्ह्याचा दक्षिणेकडील पोटविभाग. क्षेत्रफळ ४२७ चौरस मैल. हा नदीच्या मुखाजवळील प्रदेश असून ह्याच्या नैर्ऋत्येस भागीरथी नदी आहे. येथें जंगल व दलदलीच्या जमिनी पुष्कळ असल्यामुळें येथील हवा रोगट आहे. ह्या पोटविभागांत राणाघाट (मुख्य ठिकाण), शांतिपुर, चाकदह आणि बिरनगर ही चार शहरें आणि ५६८ खेडीं आहेत.
शहर.-पोटविभगचें मुख्य ठिकाण. हें चुरणी नदीकांठीं आहे. हें ईस्टर्न बेंगाल स्टेट रेल्वेवर मुख्य स्टेशन आहे. या ठिकाणीं १८६४ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली. शहरांत नेहमींच्या कचेर्या आणि एक लहान तुरुंग आहे. राणाघाट हें व्यापारी ठिकाण आहे. या ठिकाणी बरेच दवाखानें आहेत.