विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राणीबेन्नुर, तालुका.- मुंबई, धारवाड जिल्ह्याच्या आग्नेयीकडील तालुका. क्षेत्रफळ ४०५ चौरस मैल व लोकसंख्या ९७६४८. तालुक्यांत राणीबेन्नूर (मुख्य ठिकाण), ब्याड्गी व तुमिनकत्ति हीं तीन शहरें आणि ११६ खेडीं आहेत. येथील जमीन सपाट आहे. उत्तरेस एक लहान पर्वताची ओळ आणि पूर्वेस टेंकडयांचा जमाव आहे. सखल प्रदेशांत काळी आणि उंच व टेंकडाळ प्रदेशांत लाल जमीन आहे.
शहर.-राणीबेन्नूर तालुक्याचें मुख्य ठिकाण. हें मद्रास सदर्नमराठा रेल्वेवर स्टेशन आहे. येथें १८५८ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली. हें भरभराटीचें शहर असून रेशमी व सुती विणकरीबद्दल फार प्रसिद्ध आहे आणि ह्या ठिकाणीं कापसाचा मोठा व्यापार आहे. १८०० सालीं धोंडी वाघाचा पाठलाग करीत असतांना कर्नल वेलस्लीनें ह्या शहरावर हल्ला करून तें हस्तगत केलें होतें.