विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राधास्वामीपंथ - पाश्चात्त्य संस्कृतीच्या सहवासानें १९ व्या शतकाच्या सुरवातीपासून जे अनेक पंथ निघाले त्यापैकी हा एक आहे. हा वैष्णवपंथ असून कबीराशीं याचें सादृश्य आहे. १८६१ सालीं शिवदयाळ साहेब नांवाच्या एका वैष्णव साधूनें हा पंथ उत्तरहिंदुस्थानांत काढिला. शिवदयाळ आपल्याला संतसद्गुरू म्हणवून घेई व आपली व आपल्या पत्नीची प्रतिमा ध्यानाच्या वेळी समोर धरण्याकरितां आपल्या भक्तांनां देई. ध्यान, प्राणायाम, योगनिद्रा वगेरे गोष्टी तो शिष्यांनां शिकवी. त्यानें 'सारवचन' नांवाची दोन हिंदी पुस्तकें लिहिली आहेत. याचा पट्टशिष्य रायबंहादुर शाळिग्रामसाहेब हे संयुक्तप्रांतांच्या पोष्टमास्तर जनरलच्या हुद्यापर्यंत चढले होते. गुरूच्या मृत्यूनंतर (१८७८) हे रायबहादुर पंथीयांचे दुसरे गुरू झाले. त्यांनी पंथाची नीट घटना करून तिला चांगलें रूप् दिलें. 'प्रेमवाणी' व 'प्रेमपत्र' (६ भाग) हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. १९०२ सालानंतर या पंथांत दोन पक्ष झाले. एक गुरू मानूं लागला व दुसरा मानीनासा झाला.
या पंथांत गुरुभक्तीचें फारच स्तोम आहे. गुरु हाच देव मानून केवळ त्याचीची उपासना करावी लागते. त्यामुळें या पंथांत कांहीं अनीतिकारक प्रकार होतात. भक्त गुरुच्या शीरापासून निघालेले घाणेरडे पदार्थ खातात इतकेंच नव्हे तर तो मेल्यावर त्याची राख पाण्यांत कालवून पितात. गुरुसमाधिस्थानाला 'गुरुद्वार' म्हणतात. हे एकेश्वरी पंथाचे आहेत. बहुधां कबीराची वचनें गातात व इतर कोणत्याहि हिंदु देवालयांत जात नाहींत. या पंथांत सर्व जातीचे व धर्माचे लोक घेण्यांत येतात. राधास्वामी हें नांव या पंथाला व पहिल्या गुरूला देण्यांत येत असलें तरी राधावल्लभी पंथाप्रमाणें यांत राधाकृष्ण-भक्ति नाहीं हें विशेष आहे. [फरकुहर-राधासोआमीज (ए. रि. ए. पु. १०);ग्रिस्वोल्ड-दि राधास्वामी सेक्ट; राधा-स्वामीमठ-प्रकाश, इ.]