विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रानडे, माधव गोविंद (१८४२-१९०१)-एक महाराष्ट्रीय विद्वान् व राजकारणी पुरुष. माधवरावजींच्या पूर्वजांचें अगदीं मूळचें गांव रत्नागिरी जिल्ह्यांतील पाचेरीरूडा ह्या नांवाचें असून त्यांच्या निपणजांनीं सरदार पटवर्धन यांच्या आश्रयानें पंडपुरानजीक करकंभ येथें येऊन कायमची वस्ती केली. रानडयांचे वडील गोविंद अमृत यानीं निफाड व कोल्हापूर येथें हुद्दयांची कामें केली. माधवरावांचा जन्म माघ शुद्ध ६ शके १७६३ (ता. १८।१।१८४२) रोजीं झाला. १८५१ ते १८५६ पर्यंत कोल्हापुरास होणारा विद्याभ्यास आटपून ते उच्च शिक्षणार्थ मुंबईस गेले. १८६४ मध्यें एम्. ए. च्या परीक्षेंत यशस्वी होऊन १८६६ त त्यांनी एल्. एल्. बी. ची परीक्षा दिली. १८७१ मध्यें ते अॅडव्होकेटच्या परीक्षेंत उत्तीर्ण झाले. विद्यार्थिदशेंत माधवरावांनीं बक्षिसें, शिष्यवृत्त्या मिळविल्या व ज्ञानार्जनाच्या कामीं जिवापाड मेहनत घेऊन आपली दृष्टि बिघडवून घेतली. कॉलेजांत असतांना ठराविक अभ्यासाशिवाय त्यांनीं कॉलेजांतील सर्व पुस्तकसंग्रह लक्षपूर्वक वाचून टाकला होता. माधवराव हे आमरण विद्यार्थीच होते असें म्हणावयास हरकत नाहीं.
स. १८६६ च्या मेपासून १८६७ च्या नोव्हेंबरपर्यंत पुण्यास माधवरावांनीं शाळाखात्यांतील अॅक्टिंग मराठी ट्रान्लेटरचें काम केलें. ह्याच मुदतींत ते अक्कलकोटास कांहीं दिवस कारभारी व कोल्हापुरास न्यायाधीश होते. स. १८६८ पासून १८७२ पर्यंत ते मुंबईस एलफिस्टन कॉलेजांत असिस्टंट प्रोफेसर होते. मध्यतंरी १८६९ मध्यें ते मुंबई हायकोर्टांत अॅसिस्टंट रिपोर्टर होते. १८७३ मध्यें त्यांनां पुण्यास फर्स्ट क्लास फर्स्ट ग्रेड सबजज्ज म्हणून नेमण्यांत आलें. १८७८ पासून त्यांची नाशिकच्या सदर अमीनच्या जागीं नेमणूक झाली. १८८१ पासून त्यांनां मुन्सफ कोर्टाची तपासणी करण्यास नेमलें. १८८४ पासून ते पुण्याच्या स्मॉल कॉज कोर्टाचे जज्ज झाले. ह्यानंतर त्यांची फायनॅन्स कमिटीवर कमिशनर म्हणून व शेवटीं १८९३ मध्यें मुंबईच्या हायकोर्ट जज्जाच्या जागीं नेमणूक करण्यांत आली. १८८७ सालीं त्यांनां सी. आय. ई. अशी पदवी मिळाली व सरकारकून त्यांची तीन वेळां कौन्सिलर म्हणून नेमणूक झाली होती. अशा रीतीनें अनेक हुद्यांची कामे करीत असतांना न्या. रानडे यांनीं मुंबईस ता. १६ जानेवारी १९०१ रोजी इहलोक सोडला.
न्या. रानडयांच्या अलौकिकत्वास त्यांची श्रेष्ठ बुद्धिमत्ता, त्यांचें अनेक हुद्यांची कामें करण्यांत दिसून येणारें कर्तृत्व व त्यांचा शेकडो रुपये पगार अशा गोष्टी सर्वस्वी कारणीभूत होऊं शकत नाहींत; कांहीं, विद्वान, संपत्तिामान व सरकारमान्य अशी माणसें या देशांत पुष्कळ आहेत. परंतु ज्या काळांत 'महाराष्ट्र देश एक थंड गोळा होऊन पडला होता' त्या काळांत माधवरावांनीं जिवापाड श्रम घेऊन त्या थंड गोळ्यास ऊब देण्याचे प्रयत्न केले. 'लोकसमाजामध्यें जागृति उत्पन्न करण्याचें गुरुत्व ज्यांकडे देतां येईल, असे लोक फारच विरळा आहेत. माधवरावजी हे अशा विभूतींपैकी एक होते' असे लो. टिळकांनीं लिहिलें आहे. टिळक-गोखले प्रभृति यच्चयावत् महाराष्ट्रीय राजकारणी धुरीण माधवरावांनां आपले गुरू समजत असत. महाराष्ट्रांतील राजकीय, सामाजिक, औद्योगिक, धार्मिक इत्यादि चळवळीचें न्या. रानडे हे आद्य पुरस्कर्ते होत. सरकारी नोकरी संभाहून ह्यांनी लोकांनां राजकारण शिकविलें.
माधवरावजीनीं स्वदेशी चळवळीची कल्पना काढली व पुढें ती सार्वजनिक काकानीं प्रसृत केली. पुण्याची वसंतव्याख्यानमाला न्यायमूर्तीच्या प्रयत्नांमुळेंच नांवारूपास आली. सार्वजनिक सभेस रानडयांच्या साहचर्यानें स्थैर्य व योग्य वळण मिळालें. प्रार्थनासमाजाची प्रथम प्रतिष्ठा त्यांच्यामुळेंच वाढली, व सामाजिक परिषदसंस्थेस रानडयांमुळेंच महत्त्व आलें. न्या. रानडे समाजसुधारक होते. मुंबई इलाख्यांत पुनर्विवाहासंबंधानें चळवळ करण्यास कै. विष्णुशास्त्री पंडित यांस प्रवृत्त करण्यांत जे मुख्य होते त्यांमध्यें रानडे हे एक होते व पुनर्विवाहोत्तोजक संस्थेचा प्रसार करण्यांत त्यांनीं फार खटपट केली. पण स्वत: मात्र वेळ आली असतां पुनर्विवाह केला नाहीं असा त्यांच्यावर त्यांच्या प्रतिपक्षीयांचा आरोप असे. तथापि आपल्या प्राचीन संस्कृतीचा त्यांनां अभिमान होता. ते पक्के आस्तिक होते व भक्तिमार्ग त्यांना फार प्रिय होता. एकदेशीय राजकीय चळवळ अपुरी असून सामाजिक, औद्योगिक वगैरे चळवळी त्याबरोबरच केल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह असे.
रानडयांची मतें त्यांच्या ग्रंथामध्येंच पहावयास सांपडतात. आपले परिपक्व विचार त्यांनीं अनेक पुस्तकांत ग्रंथित केले आहेत. वक्तृत्वाबद्दल रानडयांची प्रसिद्धि आहे, त्याचप्रमाणे उष्कृष्ट ग्रंथकार म्हणूनहि त्यांचा फार लौकिक आहे. 'एसेज ऑन रिलिजस अँड सोशल रिफॉर्म' या ग्रंथांत एके ठिकाणीं त्यांनीं असें प्रतिपादन केलें आहे कीं, 'राजकीय स्वातंत्र्य नसेल तर सामाजिक सुधारणा व्यर्थ होय; उलट सामाजिक सुधारणेवांचून आजच्या काळांत राजकीय प्रगति होणार नाही.' आधुनिक सुधारणेस ऐतिहासिक परंपरा आहे असें ते म्हणत असत. संमतिवयाच्या कायद्याच्या वेळीं त्यांनीं अनेक श्रुतिस्मृतींचे आधार दाखविले होते. 'वसिष्ठ व विश्वामित्र' या निंबंधात सुधारणेला ऋषिप्रणीत मतांचा आधार आहे असें त्यांनीं दाखविलें. 'एसेज ऑन इंडियन एकॉनमिक्स' या ग्रंथांत इतिहासान्तर्गत दाखले सोडून भलत्याच गोष्टीचा मागें लागू नये, इतिहासालाच मार्गदर्शक करावें हें उचित होय असें त्यांनीं दाखविलें आहे. 'नेदरलंड्स, इंडिया अॅड दि कल्चर सिस्टिम' यांत ब्रिटिश इंडियन पद्धति व नेदरर्लंडची शासनपद्धति यांचा तौलनिक विचार केला आहे. 'दि फिलॉसफी ऑफ थीइझम', 'हिंदु प्रॉटेस्टँटिझम' व 'थीइस्ट कन्फेशन ऑफ फेथ' या निबंधांत आपली धार्मिक सुधारणा पूर्वपरंपरेला सोडून नाहीं हें त्यानीं दिग्दर्शित केलें आहे. 'राइज ऑफ दि मराठा पॉवर' या ग्रंथांत ग्रँटडफची विधानें कशीं चुकीचीं आहेत हें त्यानीं दाखविलें असून मराठयांचा उत्कर्ष कसा झाला व त्यांचें भवितव्य काय याची पूर्ण कल्पना दिली आहे. वरील सर्व ग्रंथ रानडयांच्या विद्वत्तेची, त्यांच्या मतांची व एकंदर चारित्र्याची साक्ष देऊं शकतात.
महाराष्टांत राजकीय संप्रदाय प्रथम रूजला असल्यामुळें कोत्या विचाराच्या व उतावळ्या लोकांकडून समाजसुधारणावादी रानड्यांची निदां केली जात असे व नव्या पिढीस रानड्यांचें खरें महत्त्व कळण्यास अडचण पडत असे. रानड्यांची बुद्धिमत्ता, त्याचें नैतिक चारित्र्य, व त्यांचा देशाभिमान यांबद्दल कोठेंच दुमत होणें शक्य नाहीं. त्यांच्यामध्यें धडाडी नव्हती असें म्हणतात, कारण त्यांचा स्वभाव थंड, धिम्मा व विचारप्रधान होता. प्रतिपक्षाशीं सामना करतांना त्यांची वागणूक सभ्यपणाची असे व प्रतिपक्षांतील चांगल्या लोकांची तारीफ करण्यांत किंवा त्यांच्या गुणांचें कौतुक करण्यांत त्यानां कधींहि कमीपणा वाटत नसे. निराशाभाव, साधेपणा, परोपकार, सहनशीलता, दीर्घ प्रयत्न हे त्यांच्यामध्यें गुण बसत होते. उत्कृष्ट लेखक, हुषार न्यायाधीश, विद्वान अर्थशास्त्री, मोठे इतिहासविशारद, उत्कृष्ट वक्ते व पहिल्या प्रतीचे मुत्सद्दी असे त्यांचें थोडक्यांत वर्णन करतां येईल. त्यांचें विस्तृत मराठी चरित्र रा. न. र. फाटक यानीं नुकतेंच प्रसिद्ध केलें आहे.