विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रॉबर्टस, फ्रेड्रिक स्ले (१८३२-१९१४) - प्रसिद्ध इंग्लिश सेनापति. हा हिंदुस्थानांत कानपूर येथें जन्मला. इंग्लंडमध्यें शिक्षण झाल्यानंतर बंगाल मधील तोफखान्यावर याला जागा मिळाली. १८५७ सालच्या बंडांत व त्यानंतर झालेल्या लढायांत यानें प्रामुख्यानें भाग घेतला व त्यामुळें याला अनेक सन्मानदर्शक पदव्या मिळाल्या. १८६७ सालीं तो बंगाल तुकडीचा असिस्टंट क्कार्टर मास्टर झाला व १८७२ सालीं डेप्युटी क्कार्टरमास्टर झाला. १८७८ साली अबट्टाबाद येथील रणक्षेत्रावरील सैन्याचें आधिपत्य त्याला देण्यांत आलें. कुरमवरील मोहिमेंतहि त्यानें आपलें शौर्य व चातुर्य प्रकट केलें; तसेंच काबूल, कंदाहार इत्यादि ठिकाणीं झालेल्या लढायांतहि त्यानें चांगली कामगिरी बजावली. अफगाण मोहिमेतील त्याच्या कामगिरीबद्दल त्याला अनेक पदव्या मिळाल्या व मद्रास येथील सैन्याचें आधिपत्य त्याला देण्यांत आलें. पुढें थोडक्याच काळानंतर तो हिंदुस्थानांतील सैन्याचा मुख्य सेनापति झाला. १८९५ सालीं त्याला फील्डमार्शल करण्यात आलें व आयर्लंडमधील इंग्लिश सेनेचें आधिपत्य त्याला देण्यांत आलें. बोअरयुद्धामध्येंहि त्यानें उत्कृष्ट कामगिरी बजावली; त्यामुळें पार्लमेंटनें त्याला एक लाख पौंडांचें बक्षीस दिलें. १९०५ सालीं नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यानें सक्तीच्या लष्करीशिक्षणाची चळवळ सुरू केली. १९१४ सालीं तो मरण पावला. त्यानें 'राइज ऑफ वेलिंग्टन' व 'फॉर्टी ईयर्स इन इंडिया' ही दोन पुस्तकें लिहिली आहेत.