विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राम - विष्णूचा सातवा अवतार. हा अयोध्येचा राजा दशरथ व कौसल्या यांचा पुत्र. याचा जन्म चैत्र शुद्ध ९ स झाला म्हणून तो दिवस मोठया सणाप्रमाणें हिंदुलोकांत पाळण्यांत येतो. दशरथाजवळून विश्वमित्रानें रामलक्ष्मणांनां यज्ञसंरक्षणार्थ नेलें, तेव्हां यानें ताटकेस व इतर राक्षसांनां मारलें. नंतर मिथिलेस जाऊन शंकराच्या धनुष्याचा भंग करून स्वयंवरांत सीता जिंकिली. शंकराचें धनुष्य मोडल्याबद्दल परशुराम लढण्यास आला असतां यानें त्याचा पराजय केला. पुढें दशरथ यास युवराजपद देणार होता. पण कैकेयीनें दशरथापासून पूर्वी मिळालेले दोन वर याच वेळी मागितले ('दशरथ' पहा) व यास वनवासाला पाठविलें. हा चवदा वर्षे लक्ष्मण व सीता यांसह वनवासास गेला. दंडकारण्यांत असतांना यानें खरदूषणादि अनेक राक्षस मारिलें. सीतेस रावणानें चोरून नेल्यामुळें, तिच्या शोधार्थ हिंडता हिंडता हनुमान, सुग्रीव इत्यादि वानरांशीं यानें सख्य केलें. सुग्रीवाच्या विनंतीवरून वालीचा वध केला व लंकेंत सीता आहे असें कळल्यावररून समुद्रास सेतु बांधून सैन्यासह लंकेंत गेला. रावणादि सर्व राक्षसांचा नाश करून व बिभीषणास लंका देऊन सीतेसह अयोध्येस आला. एकबाणी, एकवचनी, एकपत्नी म्हणून हा प्रसिद्ध होता. यानें अत्यंत नीतिमत्तेनें राज्य केलें. अकाली मरण, स्त्रियांनां वैधव्य, चोर, अग्नि इत्याकिांची भीति, दुष्काळ इत्यादि अनर्थ याच्या राज्यांत अगदीं बंद होते. यानें अश्वमेधादि अनेक यज्ञ केले. याच्या कथेवरच वाल्मिकीनें रामायण रचिलें आहे.
रामभक्तिसंप्रदाय जो आज आहे तो अर्वाचीन दिसतो. १३ व्या शतकांत आनंदतीर्थानें बदरिकाश्रमाहून एक राममूर्ति आणून तिची स्थापना केल्याची आख्यायिका आहे. हेमाद्रीनें रामनवमीच्या उत्सवाचें वर्णन केलें आहे. रामानुज, रामानंद वगैरे वैष्णवांनीं रामभक्तीचा प्रसार केला. रामानंदाचा, रामावत पंथ स्वतंत्र आहे. कील्हानें १६ व्या शतकांत दुसरा खाकी पंथ काढला ('खाकी' पहा). उत्तर हिंदुस्थानांत रामलीलेचा मोठा उत्सव आश्विन महिन्यांत होतो. सयाम, मलाया व इंडोनेशियांत सुद्धां रामभक्तीचा दांडगा प्रसार होता (ज्ञानकोश वि. १; विद्यासेवक, वर्ष पहिलें अं. १२). कृष्णभक्तीप्रमाणें रामभक्तीची अवनति झाली नाहीं हें ध्यानांत ठेवण्याजोगें आहे.
वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण, रामगीता, भावार्थ-रामायण; रामचरित्रमानस इत्यादि रामासंबंधीं अनेक ग्रंथ आहेत. रामकथेवर संस्कृत कवींनीं बरींच नाटकेंहि रचिली आहेत, त्यांपैकी भवभूतीचें उत्तररामचरित प्रसिद्ध आहे.