विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रामचंद्र विनाक टिकेकर (धनर्धारी) (१८६२-१९०७)-एक मराठी लेखक. यांचें जन्मस्थान धारवाड होय. हे इ. स. १८८९ मध्यें हे केसरीं पत्रांतून ''वाग्बाण'' आणि ''तूणीर भरती'' या सदरांखाली टीकात्मक लेख प्रसिद्ध करीत असत. इंदुप्रकाश, ज्ञानप्रकाश, आणि जगद्धितेच्छु या पत्रांतूनहि त्यांचे राजकारण, व्यापार, शेतकी, अर्थशास्त्र, विणकाम इत्यादि अनेक विषयांवर पुष्कळ लेख प्रसिद्ध होत असत. सामाजिक, औद्योगिक, राजकीय, नैतिक इत्यादि कोणत्याहि प्रश्नासंबंधानें 'धनुर्धारी' यांचें कांहीतरीं म्हणणें असावयाचेंच. धनुर्धारीसारखे अनेक विषयांवर इतक्या कुशलतेनें लेखणी चालविणारे लेखक क्चवितच आढळतात. धनुर्धारीचीं भाषा शुद्ध, सांप्रदायिक, अभिमानोत्तेजक व आपलेपणा उत्पन्न करणारी असे. 'शेत शेतकी आणि शेतकरी' या नांवाचें कानडी आणि मराठी भाषेंतील पाक्षिक व व्यापार-उदीम हें मराठी मासिक ते काढीत असत. बडोद्याच्या 'सयाजी ज्ञानमंजूषा' पुस्तकमालेपैकीं हिंदुस्थानचा व्यापारी भूगोल व इंदूर-प्रकरणीं '' इंदूर प्रकरणाची दुसरी आणि खरी बाजू'' हीं पुस्तकें त्यानीं लिहिलीं होती. त्यांनीं लिहिलेल्या ''महाराष्ट्र कुटुंबसंग्राह्य पुस्तकावलीं'' तील 'जवानमर्द ब्राह्मणभाई,' 'जवानमर्द मराठेगडी,' 'देवी अहिल्याबाई होळकरीण,' इत्यादि पुस्तकांच्याद्वारें ऐतिहासिक स्त्रीपुरुषांचीं पंधरा चरित्रें प्रसिद्ध केलीं आहेत. शिवाय 'स्वधर्मज्ञानप्रसार पुस्तकमाला' लहान मुलांचें चिमुकलें वाचनालय' या नांवाखालीं अठरा व इतर पंधरा अशीं त्यांची एकंदर ४८ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांपैकी ''पिराजी पाटील'' व ''पश्चात्ताप्यांचा पांजरपोळ'' हीं विशेष असून ''वाईकर भटजी'' (गोल्ड स्मिथच्या विकार ऑफ वेकफीलडचें रूपांतर) ही कादंबरी उत्कृष्ट वाङ्मयांत गणिली जात आहे. त्यांची ''मृतांची मुलाखत'' ही अप्रसिद्ध कादंबरी असून ती लवकरच प्रसिद्ध होईल. धनुर्धारी १९०७ सालीं आक्टोबर महिन्यांत सोलापूर मुक्कामीं वारलें.