विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रामदास (१६०८-१६८२) - एक महाराष्ट्रीय राजकारणी संत. यांचें मूळ नांव नारायण सूर्याजी ठोसर; यांचा जन्म शके १५३० च्या रामनवमीस झाला निजामाच्या राज्यांतील जांब गांवाचें कुळकर्ण सूर्याजीपंताकडे होतें. त्यांच्या स्त्रीचं नांव राणूबाई. रामदासांचा गंगाधर नांवाचा वडील भाऊ होता. यालाच पुढें ''श्रेष्ठ'' किंवा ''रामीरामदास'' असें टोपनांव मिळालें. रामदासांनांहि तत्कालीन सर्व संतमंडळींत ''समर्थ'' अशी पदवी मिळाली. ''नाना मंडळ्या स्थापून आणि 'नाना सामर्थ्ये उत्पन्न करून'' रामदासांनीं शिवाजीकडून म्लेंच्छांचें बंड मोडून देवाब्राह्मणांचें महाराष्ट्रराज्य स्थापन केल्यामुळें त्यानां समर्थ हें नामाभिधान प्राप्त झालें. समर्थांनां प्रत्यक्ष श्रीरामानेंच उपदेश केला असें म्हणतात. लग्नाच्या वेळीं सावधान शब्द ऐकून समर्थ लग्नमंडपांतून जे निघाले ते नाशीकजवळील टांकळी गांवी येऊन त्यांनीं गायत्रीपुरश्चरण व त्रयोदशाक्षरी मंत्राचा तेरा कोटी जप केला. याप्रमाणें १२ वर्षे आत्मिक शुद्धि केल्यावर समर्थांनीं सर्व हिंदुस्थानांत पर्यटण करून देशाच्या परिस्थितीचें सूक्ष्म निरीक्षण केलें. त्यावेळीं मुसुलमानांच्या जुलुमानें हिंदुस्थान नि:सत्त्व बनला होता. सार्या देशांत त्यानां अडथळा करण्याचा प्रयत्न (कांहीं थोडयाशा बाबतींत रजपुतांखेरीज) कोणीहि करीत नव्हते. ''बहुसाल कल्पांत लोकांसि आला, पदार्थमात्र तितुका गेला, नुस्ता देशचि उरला,'' ही स्थिति पाहून समर्थानां चिंता वाटली आणि ''केसी क्षेम राहील जगती, कैसी देवदेवालयें तगती,'' याचा उपाय त्यानीं शोधून काढला. यावेळीं समर्थांशिवाय इतर सर्व साधूसंतांच्या निवृत्तिपर शिकवणींच्यामुळें राजकारणाकडे लोकांचें लक्ष उत्कटत्वानें जात नव्हतें. देशांत नैराश्य पसरलें होतें. समर्थानी आपल्या कार्यास सर्व हिंदुस्थानांत महाराष्ट्र देशच
पसंत करून तेथें त्यानीं मुख्य मठ स्थापन केला. यापुढें ज्या ठिकाणीं कोणत्याहि निमित्तने लोकसमूह जमत असे अशा हिंदुस्थानांतील सर्व मुख्य मुख्य स्थानी व मुसुलमानी राजधान्यांच्या आसपास त्यानीं मठ स्थापिले आणि तेथें आपले महंत ठेवून लोकांत स्वराज्याबद्दल जागृति उत्पन्न केली. हें सर्व कृत्य त्यानीं अत्यंत गुप्तपणें केलें. त्यांच्या मठांची संख्या ११०० होती असें म्हणतात. महाराष्ट्रांत आल्यावर त्यांच्या विचारांनां अनुकुल असा एक पुरूष त्यानां आढळला; तो शिवाजी होय. शिवाजीराजा हा समर्थांहून २१ वर्षांनी लहान होता. समर्थ ज्यावेळी कृष्णेकांठी आले, त्या सुमारास १६ वर्षांच्या शिवाजीनें थोडीशी धामधूम चालविली होती व स्वत:च्या नांवाची स्वतंत्र मुद्र्र्रा तयार केली होती. हा स्वराज्याचा अंकुर पाहून समर्थांनी त्याला आपल्या विचाररूपी दीक्षेचें पाणी घालून त्याचा प्रचंड वृक्ष बनविला. त्याच वृक्षाच्या छायेंत महाराष्ट्रानें १५० वर्षें सुखानें काढली. समर्थ व शिवाजी हे दोघेहि पुरूष स्वतंत्र बुद्धीचे, श्रेष्ठ दर्जाचे मुत्सद्दी, देशाला स्वराज्य मिळवून देण्याकरितां अहर्निश खटपट करणारे व अनेक गुणांनीं युक्त असल्यानें, त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी परस्परांनां पोषक अशा क्रिया घडवून स्वराज्य स्थापन केलें. समर्थानीं निव्वळ निवृत्ति किंवा निव्वळ प्रवृत्ति यांचा उपदेश न करतां त्या दोहांचा योग्य मिलाफ करून महाराष्ट्रधर्म म्हणून एका धर्मांचा उपदेश त्यावेळी सर्वत्र केला. हा धर्म व गीतेंत सांगितलेला कर्मयोग हे एकच होत. कोणत्याहि परिस्थितींत प्राप्य कर्माचा कोणत्याहि सबबीवर त्याग न करतां, निष्कामबुद्धीनें कर्तव्य म्हणून तें कर्म करून आणि त्यामुळें प्रेयस व श्रेयस यांची प्राप्ति समाजास करून देऊन, त्याला उन्नतावस्थेस पोहोंचविणें हें या धर्माचें प्रमुख अंग होय. ''मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे तें राजकारण, तिसरें सावधपण सर्वविषयीं'' अशी या धर्माची व्याख्या खुद्द समर्थांनींच केला आहे. समर्थांचा दासबोध सूक्ष्मपणे वाचला म्हणजे या महाराष्ट्रधर्माचें स्वरूप व त्यानीं केलेल्या लोकजागृतीचें स्वरूप यांची योग्य कल्पना येते. लहान लहान निवडक, तीक्ष्ण, बुद्धीचीं व सखोल अशीं मुलें घेंऊन त्यांनां या धमाचें शिक्षण समर्थ देत; पुढें तीं त्यांच्या कसोटीस उतरल्यावर मग त्यांनां सर्व हिंदुस्थानांत लोकजागृतीस पाठविण्यांत येई. समर्थानीं अनेक ठिकाणीं मारूती स्थापून (त्यांत ११ मारूतींचीं स्थानें मुख्य आहेत) शारीरिक बळाची चळवळ सुरू केली. लोकजागृतीस गेलेल्या महंतानें आपल्या कामगिरीचा अहवाल समर्थांनां वेळोवेळी कळवावा लागे. तसेंच महाराष्ट्रांतील महंतानें निदान तीन वर्षातून व महाराष्ट्राबाहेरील महंताने निदान अकरा वर्षांतून एकदां समर्थांच्या भेटीस येऊन नवीन कार्य हातीं घ्यावें लागे. त्यांच्या संप्रदायांत शिस्त फार कडक असे. ती मोडल्यास वेताचा मार मिळे. महंतानें अत्यंत निस्पृहतेनें वागून व केवळ भिक्षेवर निर्वाह करून लाकजागृति करावी लागे. समर्थांचा निस्पृहपणा तर प्रख्यात आहे. शिवाजीराजानीं त्यांचा उपदेश घेतल्यावर, आणि अनेक वर्षें त्यांच्या मदतीनें राज्यसाधन करून स्वराज्य स्थापल्यावर जेव्हां सर्व राज्य त्यांच्या झोळींत भिक्षा म्हणून टाकलें, तेव्हां त्या महापुरूषानें तें शिवाजीलाच परत दिलें. यावेळींच आपली सत्तादर्शक खूण म्हणून भगवी छाटी त्यानीं छत्रपतीस दिली असें म्हणतात. हें खरें असल्यास सार्या महाराष्ट्रराज्याचें राष्ट्रीय निशाण म्हणजे एका गोसाव्याचें हुरमुजी रंगाचे कौपीन होतें असें ठरतें. खुद्द शिवछत्रपतीनीं समर्थांनां १६७८च्या सप्टेंबरच्या १५व्या तारखेस एक पत्र लिहिलें आहे, तें पत्र वाचण्यासारखें आहे. या दोघां गुरूशिष्यांचा कसा संबंध होता व समर्थानीं शिवाजीला राज्यस्थापनेंत कितपत व कसकशी मदत केली, याबद्दल ज्या कोण्ंस शंका असतील त्यांनी हें पत्र वाचावें. त्यांतला फक्त महत्त्वाचा उतारा पुढें देतो: ''मजवर कृपा करूनु सनाथ केलें. आज्ञा केली की, तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करूनु, धर्मस्थापना, देवाब्राह्मणांची सेवा, प्रजेची पीडा दूर करूनु पाळण रक्षण करावे हें व्रत संपादून त्यांत परमार्थं करावा. तुम्ही जें मनी धराल तें श्री सिद्धीस पाववील. त्याजवरून जो जो उद्योग केला व दुष्ट तुरूक लोकांचा नाश करावा, विपुल द्रव्य करूनु, राज्यपरंपरा अक्षई चालेल ऐशीं स्थळें दुर्घट करावी, ऐसें जें जें मनी धरिलें, तें तें स्वामींनीं आशिर्वादप्रतापें मनोरथ पूर्ण केले. या उपरी, राज्य सर्व संपादिलें, तें चरणी अर्पण करूनु, सर्व काळ सेवा घडावी ऐसा विचार मनी आणिला. तेव्हां आज्ञा जाहली कीं, तुम्हांस पूवीं धर्म सांगितले तेच करावेस, तीच सेवा होय, ऐसें आज्ञापिलें.'' (समर्थांचीं दोन जुनीं चरित्रें-सत्कार्योत्तेजक सभा धुळे-प्रस्तावना, पृ. ३८) . या उतार्यांत समर्थांचें व शिवछत्रपतींचें एक प्रकारें चरित्रच आलें आहे.
समर्थ रंगानें सांवळे व मध्यम उंचीचे, आजन्म नैष्ठिक ब्रह्मचारी होते. त्यांच्या कपाळावर एक आवाळूं होतें. त्यांची त्यांच्या उंचीइतकीच लांबीची एक कुबडी असून, तींत तरवार (गुप्ती) असे. ते फार सशक्त असल्यानें मोठमोठया मजली मारीत. ते नेहमीं खाली पहात, फळाफळावळें खात, जमिनीवर घोंगडी हांतरून तीवर निजत; त्यांची वृत्ति उदासीन असे, ''कैसी वांचतील जनें'' हीच त्यानां नेहमीं विवंचना असे. ते सदां सर्वदां पर्वतांत, घळीत रहात. शिवाजी हा स्वराज्य स्थापून छत्रपति झाल्यावर समर्थानां मोठा आनंद झाला आणि त्यानीं प्रतापगडच्या रामवरदायिनी देवीजवळ ''तुझा तूं वाढवी राजा, शीघ्र आम्हांचि देखता'' हें ''येकचि मागणें'' मागितलें. त्यानीं स्वराज्यांतील देशाला आनंदवनभुवन असें नांव देऊन ''बुडाला औरंग्या पापी। म्लेंच्छ संव्हार जाहला॥ बुडाले सर्वहि पापी। हिंदुस्थान बळावलें। अभक्तांचा क्षयो जाला॥ आनंदवनभूवनी॥ येथून वाढला धर्मु।'' याप्रमाणें आनंदानें उद्गार काढले आहेत. या सुमारास शिवाजीच्या विनंतीवरून गिरिगव्हरांतील वास सोडून समर्थ हे परळी किल्ल्यावर रहावयास आले. त्यांच्या अनेक नांवांपैकी एक नांव सज्जन असें असल्यानें, पुंढें या किल्लयास सज्जनगड हें नांव मिळाळें शिवाजीच्या पश्चात समर्थ फारसे कोठें जात नसत. संभाजीला त्यानीं एक उपदेशपर पत्र पाठविलें होतें त्यानंतर ते पुन्हां उदास वृत्तीनेंच वागूं लागले. अखेर शके १६०३ माघ वद्य नवमी रोजी दुपारी त्यानीं देह ठेवला. त्यांची समाधि गडावरच आहे. त्यांचें काव्य पुष्कळ आहे. त्यांत दासबोध, आत्माराम, चौदाशतकें, रामगीता, रामायण, मनाचे श्लोक, सत्पसमासी, दासगीता इत्यादि ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
(दासबोध; समर्थ प्रताप; समर्थाची दोन जुनी चरित्रें; हनुमंत स्वामीची बखर; समर्थांची कविता व इतर रामदासी वा वाङ्मय)