विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रामनाद जहागिरी - मद्रास, मदुरा जिल्ह्याच्या दक्षिण आणि पूर्वेकडील जमीनदारी जहागीर. हिच्यांत रामनाद, तिरूवादानाइ, परमगादि, तिरूचुली आणि मुदुकुलुत्तुर अशा पांच जमीनदारी तहशिली आहेत. क्षेत्रफळ २१०४ चौरस मैल आहे. जिल्ह्याचा सर्व समुद्रकिनारा हिच्यांत येतो. येथील संस्थानिक मरबन जातीचे असून यांस सेतुपति अशी पदवी आहे. हा सेतु म्हणजे रामनाद जहागिरीपासून पांवन बेटापावेतों असलेली खडकाची ओळ होय. पांवन बेटांत रामेश्वराचें देऊळ आहे. रावणावर मिळविलेल्या विजयाची खूण म्हणून रामानें रामेश्वराचें देऊळ बांधून ह्या सेतूवर यात्रेकरूंच्या संरक्षणार्थं एक सेंतुपति नेंमिला अशी कथा सांगतात. रामनाद संस्थानिकांस ही पदवी चवदाव्या व पंधराव्या शतकापासून आहे असें कोणी म्हणतात. या संस्थानिकांपैकी रघुनाथ किलवन हा फार प्रख्यात आहे. यानें पोगालुरहूर रामनादच्या पलीकडे पूर्वेस १० मैलावर राजधानी बदलली. स. १७२५ त येथील संस्था निकास हांकून दुसर्यानेंच गादी बळकावली व सेतुपति ही पदवी धारण केली. यानें आपल्या सरदारांस इतक्या वाईट रीतीने वागविलें की त्यांपैकीं एका सरदारानें हांकून दिलेल्या संस्थानिकास जाऊन मिळून तंजावरच्या राजाच्या मदतीनें या उपर्यास हांकून लाविलें. नंतर यानें त्या प्रदेशाचे भाग केले; पैकीं तंजावरच्या राजांनी पांबर नदीच्या उत्तरेकडील भाग आपल्या राज्यास जोडला. बाकीच्या भागांपैकी दोन पंचमांश त्या सरदारानें घेऊन शिवगंगा जमीनदारी स्थापन केली. आणि राहिलेला तीनपंचमांश भाग जो खरा वारस होता त्यास परत दिला. याच भागास आज रामनादची जहागीर म्हणतात. येथील जमीन ओसाड असून नापिक आहे. जहागिरीत मदुर्यापासून तों रामनाद आणि तिरूचुलीपावेतों असे दोन रस्ते आहेत. जहागिरीत रामनाद व रामेश्वर हीं दोन मुख्य शहरे आहेत. कीलकरै हें मुख्य बंदर आहे व कमुदि आणि अभिरामम् हीं दोन शहरें भरभराटीस येत चालली आहेत. मदुर्याच्या रस्त्यावरील परमगुडि हें रंगीत कापडाकरितां प्रसिद्ध आहे. जहागिरींत अरूपुकोट्टइ हें शहर तिनेवेल्ली जिल्ह्याच्या व्यापारामुळें फार भरभराटीस आलें आहे. साउथ इंडियन रेल्वे ही मदुरेपासून रामनादमधून मंडपमपावेतों गेली आहे. पांबना आणि इतर मानारच्या आखातांतील प्रवाळाची बेटें असून ती पाहण्यासारखी आहेत. ह्या बेटांत कांसव व कालव जातीचे मासे सांपडतात.