विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रामपाल - बंगाल, डाक्का जिल्ह्याच्या मुनशीगंज पोटविभागांतील खेडे. हे उत्तर अक्षांश २३० ३३' आणि पूर्वरेखांश ९०० २०' यांवर वसलेलें आहे. रामपाल दीघी या तळ्याजवळच विक्रमपुर ह्या जुन्या राजधानीचे स्थान आहे. या तळ्याच्या उत्तरेस बल्लाळवारी अथवा बल्लाळसेनाचा राजवाडा आहे. कांही इमारतींचे पायथे व इतर कांही भाग पुष्कळ मैलपावेतों सांपडतात आणि १९व्या शतकांत एका शेतकर्यास जमीन नांगरीत असतांना या ठिकाणी ७०००० रू किंमतीचा हिरा सांपडला. बल्लाळवारीच्या आंत अग्निकुंड नांवाचा एक खंदक आहे. या खंदकांत विक्रमपूरचा राजपुत्र आणि त्याच्या कुटुंबांतील माणसें यांनी मुसुलमान आले तेव्हां स्वत:स जाळून घेतलें. बल्लाळवारीच्या जवळच बाबा अदम अथवा अदम शाहीद याचें थडगें आहे.