विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राममोहन राय (१७७४-१८३३) - एक प्रमुख बंगाली धर्मसुधारक व ब्राह्म समाजाचा आद्य संस्थापक. हा बंगालमधील हुगळी जिल्ह्यांतील राधानगर येथें जन्मला. याचा बाप रामकांत हा सुखवस्तु असल्यानें त्यानें राममोहनला योग्य शिक्षण देण्याची काळजी घेतली होती. त्या काळी फारसी ही दरबारभाषा असल्यानें राममोहनला बंगालीबरोबरच फारसी व अरबी भाषा शिकविण्याचीहि त्यानें व्यवस्था केली. तेराव्या वर्षी त्याला काशी येथें संस्कृतचे अध्ययन करण्यासाटी पाठविण्यांत आलें. तेथें असतांना राममोहननें संस्कृतमधील सर्व धर्मग्रंथ वाचून टाकले. वेदांत व उपनिषदें यांच्या अध्ययनानें तो एकेश्वरी मताचा बनला व अवघ्या १६ व्या वर्षी तुहफतुल मुवहिद्दिन या नांवाचा फारसी भाषेंत ग्रंथ लिहून त्यानें मूर्तिपूजेवर झणझणीत टीका लिहिली. त्यामुळें बापाचा व त्याचा खटका उडून राममोहननें आपल्या घराला रामराम ठोकला. पुढें तीन चा वर्षे त्यानें इंग्लिश भाषेचा व इतर यूरोपीय भाषांचा अभ्यास करण्यास सुरवात केली. व थोडक्याच दिवसांत त्यानें या भाषांची चांगली माहिती करून घेतली. १८०० साली रंगपूर येथील कलेक्टरच्या कचेरींत त्यानें कारकुनाची नोकरी धरिली; पण पुढें कांहीं वर्षांनंतर तो आपल्या कर्तबागारीमुळें जिल्ह्याचा दिवाणहि झाला. १८१४ सालीं नोकरीचा राजीनामा देऊन तो कलकत्त येथें राहण्यास गेला. कलकत्त्यास आल्यावर त्यानें, आपला काळ धर्मसुधारणा व समाजसुधारणा करण्याकडे घालविण्याचें ठरविलें. त्यानें वेदान्त व उपनिषदें यांची बंगाली व इंग्लिशमध्यें भाषांतरे करण्यास सुरवात केली. एकेश्वरोपासनेनिमित्त एक आत्मीय सभा नांवाची सभा त्यानें स्थापन केली. याशिवाय जुन्या शास्त्रीमंडळीबरोबर अगर खिस्ती मिशनर्यांबरोबरहि तो जाहीर वादविवाद करीत असे. १८३० साली त्यानें सुप्रसिद्ध ब्राह्म समाजाची स्थापना केली (ब्राह्म समाज पहा). धर्मसुधारणेप्रमाणेच सामाजिक सुधारणेच्या बाबतींतहि त्यानें सर्व तर्हेनें चळवळ केली व त्यांत त्याला यशहि आले. शिक्षणप्रसाराच्या बाबतींतहि त्यानें अत्यंत परिश्रम केले. १८३० साली दिल्लीच्या बादशहानें त्याला 'राजा' ही पदवी दिली आणि आपला वकील या नात्यानें इंग्लंडच्या राजापाशी आपली गार्हाणीं निवेदन करण्यासाठी त्याला इंग्लंडला जाण्यास सांगितलें. इंग्लंडमध्यें राममोहनचें थाटानें स्वागत करण्यांत आलें. तेथें असतांना त्यानें हिंदुस्थानच्या न्याय व जमाबंदी पद्धतीसंबंधी हॉऊस ऑफ कॉमन्सच्या सिलेक्ट कमिटीपुढें साक्ष दिली. इंग्लंड मधून तो फ्रान्स येथें गेला. पण तेथें असतांना त्याची प्रकृति बिघडल्यामुळे तो परत ब्रिस्टल येथें आला. पण तेथेंहि त्याची प्रकृति सुधारली नाही. १८३३ साली ती ब्रिस्टल येथें मरण पावला.