विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रामशास्त्री प्रभुणे - हे सातारा जिल्ह्यांतील माहुलीचे राहणारे ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण. प्रथम सातार्याच्या अनगळ सावकाराच्या घरीं शागीर्दी करीत असतां उपरती होऊन काशीस जाऊन व प्रौढपणी विद्या शिकून हे नानासाहेब पेशव्यांच्या वेळी म्हणजे १७५१ सालीं सरकारी आश्रितांत शास्त्री म्हणून दाखल झाले. त्यावेळी त्यानां दीडमाही ४० रू. पगार मिळे व श्रावणमासची दक्षणा ५०० रू. आणि ५५१ रू. चे कापड सालीना मिळे. बाळकृष्ण शास्त्री न्यायाधीशाचें काम दिलें (१७५९). तें (मध्यें थोडा खंड शिवायकरून) यानीं १७८९ पर्यंत केलें. यानीं राघोबादादांस, नारायणराव पेशव्यांच्या खुनाबद्दल पूर्ण तपास धरून मग ''देहांत प्रायश्चित्ता'' ची शिक्षा दिली व लगेच नोकरी सोडून वाईजवळ पांडववाडीस जाऊन राहिले. सवाईमाधवरावांच्या जन्मानंतर व रघुनाथरावदादांच्या बंदोबस्तानंतर नाना फडणविसांनी यानां पुन्हां पुण्यास आणून न्यायाधीशाचें काम दिलें (१७७७). यावेळी त्यानां सालाची तीन हजारांची नेमणूक (पालखी, कापड वगैरे मिळून) मिळत असे. त्यांच्या दुसर्या लग्नास सरकारनें ३ हजार रूपये देऊन शिवाय त्यांचें १५ हजार रू. कर्जहि वारलें. हे इ.स.१७८९ च्या नोव्हेंबरांत ६०-६५ वर्षांचे होऊन वारले. तेव्हां त्यांच्या उत्तरक्रियेस सरकारनें ३२०० रू. खर्च केला. हे सत्यप्रिय, स्पष्टवक्ते, निस्पृह व बाणेदार न्यायाधीश होते. त्यांची मराठी राज्याविषयीं अनुपम निष्ठा व अभिमान होता. सारस्वत ब्राह्मणांस इतर ब्राह्मणांप्रमाणें वागविणें, माधवराव पेशव्यांस कर्मनिष्ठेपासून परावृत करणें, कायस्थांच्या तक्रारी उदारपणें तोडणें, विधवापुनर्विवाहास उत्तेजन देणें, अविद्वान अशा प्रत्यक्ष स्वत:च्या मुलाचीहि तरफदारी न करणें, न्याय व राजकारण यांचा योग्य मिलाफ ठेवणें या गोष्टी ध्यानांत घेतल्यास शास्त्रीबुवा ही एक मराठेशाहींतील प्रचंड शक्ति होती असें ठरतें. ग्रँट डफनेंहि त्यांची स्तुति केली आहे. त्यांची रहाणी अगदी साधी असे. संचय असा त्यानीं कधींच केलां नाहीं.यांच्या मागें यांचे चिरंजीव गोपाळशास्त्री होते, यांस पेशव्यांकडून सालीना ३२०० रू मिळत असत. (इ. सं. ऐति गोष्टी पृ. २७; पेशव्यांची बखर; म. रि. वि. ४; थोरले माधवराव, रोजनिशी २. ६३२; पेशवे दफ्तर १८६)