विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रायगड - मुंबई, कुलाबा जिल्ह्याच्या महाड तालुक्यांतील एका टेंकडीवरील किल्ला. हा पुण्यापासून नैऋत्येस ३२ मैलांवर उत्तर अक्षांश १८० १४' आणि पूर्वरेखांश ७३० २७' यांवर वसलेला आहे. हा पश्चिमघाटांत असून मागील शतकांत हिंदुस्थानांतील एक मोठा किल्ला म्हणून मानलेला होता. टेंकडीचा माथा समुद्रसपाटीपासून २८५१ फूट असून सरासरी पूर्वपश्चिम दीड मैल व दक्षिण उत्तर एक मैल विस्तराचा आहे. पूर्व, पश्चिम व दक्षिणेकडील टेंकडीच्या बाजू इतक्या उंच आहेत कीं, त्या ठिकाणी कृत्रिम तटबंदी बांधणे शक्य नाही. या किल्ल्यास, त्याचें आकारमान, मजबुती व दक्षिण भाग आणि समुंद्र ह्यातील सुलभ दळणवळण यांच्यामुळें महत्त्वच आलें आहे. परंतु याचें महत्त्व शिवाजीच्या शेंवटच्या १६ वर्षांत म्हणजे १६६४ पासून १६८० पर्यंत त्याची राजधानी असल्यामुळें विषेश होतें. १२ व्या शतकांत लहान लहान मराठे सरदारांच्या कुटुंबाचें हें निवास स्थान होतें. यांनी चवदाव्या शतकांत विजयानगरच्या राजांनां अधिराज मानलें. पंधराव्या शतकांत दुसरा अल्लाउद्दीन शाह वली यानें किल्ल्यांतील लोकांना खंडणी देण्यास भाग पाडलें. त्यानंतर १४७९ त हा रायरी (रायगड) किल्ला अहमदनगरच्या निजामशाही सुलतानांच्या ताब्यांत जाऊन स.१६३६ पावेतों तो त्यांच्या हातीं होता. अहमदनगर जिंकल्यानंतर मोंगल लोकांनी तो विजापूरच्या आदिलशाही सुलतानांच्या हवाली केला. १६४८ त रायरी किल्ला शिवाजीनें हस्तगत करून १६६२ त तेथें आपली राजधानी केली व त्याचें नांव रायगड असें ठेविले. त्यावेळी तेथें ३०० दगडी इमारती, राजवाडे, बंगले, कचेर्या, टांकसाळ, धान्याचीं कोठारें, दारूखाने, २००० मनुष्यांनां राहण्याकरितां जागा, एक मैल लांबीचा बाजार व कांही टांकी होतीं. स. १६६४ त शिवाजीनें सुरतची लूट रायगड येथें ठेवून राज्यकारभाराचें मुख्य स्थान केलें. रायगड येथें १६७४ त शिवाजीस राज्याभिषेक होऊन ६ वर्षांनंतर तो येथेंच मरण पावला. यानंतर १६९० त रायगड औरंगझेबानें घेतला परंतु मुसलमानी अंमलानंतर पुन्हां मराठयांच्या ताब्यांत गेला. १८१८ च्या एप्रिलमध्यें हा किल्ला ब्रिटिशांच्या सैन्याने घेतला.
आजपर्यंत हा किल्ला ओसाड असून त्यावरील शिवाजीची समाधीहि भंगलेली होती. पण सध्या रायगड-छत्रीस्मारक फंड व पुराणवस्तुसंशोधनखातें यांच्या प्रयत्नाने समाधीवर एक सुंदर इमारत झाली आहे. कुलाबा डि. बोर्डानें वर एक धर्मशाळा बांधिली आहे.