विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रायगड, संस्थान - मध्यप्रांतांतील एक मांडलिक संस्थान. याचें क्षेत्रफळ १४८६ चौरस मैल आहे. पश्चिमस व पूर्वेस बिलासपुर व संबलपुर जिल्हे आहेत. संस्थानचा उत्तरेकडील भाग छोटानागपूरमधील प्रदेशांत गेलेला आहे. दक्षिण बाजूला महानदी वाहाते. मुख्य ठिकाण रायगड शहर हें बंगाल नागपूर रेल्वेवर एक स्टेशन आहे. या ठिकाणीं गोंड राजे राज्य करतात. हे लोक वैरागड येथून येऊन जवळच कांहीं खेडीं घेऊन १८ व्या शतकाच्या आरंभाला तेथें राहिले. मंबळपूरच्या मराठयांनी हें संस्थान आपल्या राज्यास जोडल्यावर पांचवा राजा जुज्हारसिंग यानें १८०० त ईंस्टइंडिया कंपनीशीं तह केला. १८३३ त याचा मुलगा देवनाथसिंग यानें बारगडच्या राजानें उभारलेलें बंड मोडलें आणि त्याबद्दल बक्षिस म्हणून हल्लींचा बारगड परगणा त्यास मिळाला. हल्लींचा संस्थानिक भूपदेवसिंग ह्यास विशेष मर्यादित अधिकाराचे नियम घालून देऊन सन १८९४ त गादीवर बसविलें. येथील लोकसंख्या (१९२१) २४१६६४. संस्थानांत रायगड शहर आणि ७२१ खेडीं आहेत. हें रायगड, छत्तिसगड व ओरीसाच्या सरहद्दीवर असून या ठिकाणीं शेंकडा ८० लोक छत्तिसगडी व १५ उडिया भाषा बोलतात. बिलासपुरच्या बाजूला काळी जमीन आढळते परंतु सर्व संस्थानांत छत्तिसगडी पिवळ्या तांदुळाची जमीन आहे. शेंकडा ८० एकर जमिनींत तांदुळ पिकतो. तूर, तीळ व कोदोन हीं पिकें होतात. कालव्याकरितां १८०० च्यावर तळी खोदलेलीं आहेत व हें पाणी ७००० एकर जमिनीस पुरविलें जातें. सरासरी ५०० चौरस मैल जंगल आहे. ह्यात साल आणि बीजासाला ही झाडें मुख्य आहेत. संस्थानांत लोखंड व कोळसा सांपडतो. रायगड येथे टसर रेशमी कापड बनवितात. संस्थानच्या मध्यांतून बंगाल-नागपूरची मुख्य शाखा जाते. संस्थानचें १९०४ मधील एकंदर उत्पन्न दीड लाख होतें. संस्थानांत इंग्रजी व मराठी शाळा आहेत. रायगड हें रायगड संस्थानाचें मुख्य ठिकाण आहे. लोकसंख्या सुमारें १६०००. ह्मा ठिकाणी मराठयांनी स्वार्या केल्या त्यावेळीं बांधलेला एक किल्ला आहे.