विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रायचूर, जिल्हा - हैदराबाद संस्थानच्या गुलबर्गाप्रांतांतील जिल्हा. क्षेत्रफळ ३६०४ चौरस मैल आहे; यांपैकी २३१९ चौरस मैल खालसा जमीन व बाकीची जहागिरीची व संस्थानची आहे. जिल्ह्याच्या आग्नेय दिशेस कृष्णा नदी व दक्षिणेस तुंगभद्रा ह्या दोन मुख्य नद्या वाहातात. भीमानदी रायचूरच्या उत्तरेस १६ मैलांवर कृष्णा नदीस जाऊन मिळते. जिल्ह्यांत साग, टेंभुर्णी, आंबे, चिंचा वगैरे झाडें फार आहेत. जंगल फारसे नसल्यामुळें शिकारीचे प्राणी फारसे सांपडत नाहींत. हवा साधारण आरोग्यकारक असून पाऊस २५ इंच पडतो. रायचूर हें मुसुलमानी अमलापूर्वी वारंगळ राज्याचा एक भाग होतें परंतु मुसुलमानी राज्य स्थापन झाल्यानंतर चवदाव्या शतकांत हें विजयानगरच्या ताब्यांत गेलें. महंमद तुल्लकाच्या मरणानंतर बहामनी राज्याच्या व त्यानंतर विजापूर येथील आदिलशाहीच्या ताब्यांत गेलें. औरंगझेबानें विजापूर जिंकल्यानंतर हा जिल्हा दिल्लीला जोडला होता परंतु हैदराबादचें संस्थान झाले तेव्हां हा जिल्हा पुन्हां निराळा करण्यांत आला. १८५३ सालच्या तहान्वयें हें ब्रिटिश सरकारच्या ताब्यांत गेंलें पण त्यांनी तें १८६० साली निजामास दिलें. या जिल्ह्यांत देवदुर्ग, यादगीर, अलमपूर आणि मल्लीयाबाद हे किल्ले आणि पुष्कळ देवळें व मशिदी आहेत.
जिल्ह्यांत ८९९ खेडीं आहेत. रायचूर, गढवाल, कोधल, मुद्रल, देवदुर्ग, काल्लुर व मानवि हीं मुख्य शहरें आहेत. येथें कापु नांवाची शेतकर्यांची जात आहे; तीपैकीं निम्यावर लिंगायत आहेत. येथें निरनिराळ्या प्रकारच्या जमिनी आहेत. रब्बी हें पीक रायचूर, मानवि व देवदुर्ग तालुक्यांत रीगार नांवाच्या जमिनींत व खरीफ पीके तांबूस आणि मीलवा जमिनींत होतें. ज्वारी व बाजरी हीं मुख्य पिकें होत. कांही ठिकाणी कापूस व तांदूळ हीहि होतात. मानवि व देवदुर्ग तालुक्यांत स्फटिक सांपडतें. धोतरजोडे व लुगडीं येथें उत्तम होतात. अलमपूर तालुक्यांत सतरंज्या व रंगवलेले पडदे आणि यादगीर तालुक्यांत लांकडी सामान व खेळणी बनवितात. रायचूर हें जी. आय. पी. रेल्वे व एम्.एस्.एस्. रेल्वेवर जंक्शन असून व्यापाराचें मुख्य ठिकाण आहे. या जिल्ह्यांत एकंदर १८२ मैल लांबीचे रस्ते आहेत; त्यांपैकी ८४ मैल पक्के आहेत. या जिल्ह्यांत पूर्वी फार दुष्काळ पडत असत; त्यांपैकीं १८७७.७८ सालचे दुष्काळ फारच कडक होते. शेंकडा २.१ लोकांनां लिहितांवाचतां येतें.
तालुका. - रायचूर जिल्ह्यांतील तालुका. क्षेत्रफळ ५२६ चौरस मैल आणि लोकसंख्या ९५०००. यांत १२८ खेडीं व रायचूर तालुका यांच्यामध्यें कृष्णा नदी वाहाते. ह्या तालुक्याच्या पूर्वेस व उत्तरेस गढवाल व अमरचिंत हीं दोन संस्थानें आहेत.
शहर. - रायचुर जिल्ह्याचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण. लोकसंख्या सुमारे २५००० रायचूरच्या भोंवतालचा प्रदेश हें हिंदु व जैन, मुसुलमान व गुलबर्गा व विजयानगराचे हिंदु राजे यांच्या लढायांचें ठिकाण होंतें. बहामनी राज्यानंतर पंधराव्या शतकांत हें विजापूर राज्याचा भाग झालें. औरंगझेब बादशहानें विजापूर व गोवळकोंडा घेतल्यानंतर, रायचूर हें मोंगल लोकांनीं घेतलें. किल्ल्याच्या पश्चिम दरवाज्यापासून जवळच मजबूत बांधलेला राजवाडयाचा कांही भाग अद्यापि अस्तित्वांत असून तो तुरूंगाच्या ऐवजी उपयोगांत आणतात. शहराभोंवती १२ फूट उंच व ३ फूट रूंद अशी तटबंदी आहे. याच्या दोन भिंती आहेत. किल्ल्याच्या तीन बाजूंनी खंदक आणि चवथ्या बाजूला टेंकडी आहे. ही तटबंदी व दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला वळसा असलेला जिना व ८० यार्ड उंच व १० यार्ड घेर असलेला एक मनोरा असलेली एक मशीद आहे. ही महंमदशाहा बहामनी यानें आपल्या कारकीदीत बांधली. १६१८ साली जामा मशीद बांधली. रायचूर हें व्यापाराचें ठिकाण असून ह्या ठिकाणीं कापसाच्या गिरण्या, एक कातडी कमविण्याचा व एक दारू गाळण्याचा कारखाना आहे.