विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रावळपिंडी, जिल्हा.- पंजाब, रावळपिंडी विभागांतील उत्तरेकडील जिल्हा. क्षेत्रफळ २०१० चौरस मैल. उत्तरेस वायव्य सरहद्दीतील हझारा जिल्हा; पूर्वेस झेलमनदी; दक्षिणेस झेलंम जिल्हा; आणि पश्चिमेस अटक जिल्हा. मूरी व काहुत टेकडयांच्या नैर्ऋत्येस समुद्रसपाटीपासून १८०० फूट उंच असें एक विस्तीर्ण सपाट मैदान आहे. या मैदानाच्या उत्तरभागांत रावळपिंडी तहशील व काहुत तहशिलीपैकी कलार भाग हे मोडतात. या भागांतून सोहान नदी वाहाते. दक्षिण भागांत गुजरखान तहशील असून तीत कानशी नदी वाहाते. सर्व जमीन लागवडीस उत्तम आहे. डुंगागाली ठिकाणापासून खालीं झेलम नदीतून जहाजानें व्यापार चालू शकतो. ही नदी रावळपिंडी जिल्ह्याच्या पूर्व बाजूनें वाहाते. पंजाब इलाख्यांतील इतर भागांपेक्षा हा प्रांत फारच थंड आहे. येथें उन्हाळा तीनच महिने असतो पण हिवाळा मात्र फार कडक असतो. एकंदर प्रांत आरोग्यदायक असून लोक फारच सशक्त निरोगी असतात. पाऊस २९ पासून ४० इंचांपर्यंत पडतो; पहाडावर ५३ इंच पडतो.
सिंधू व झेलम यांमधील प्रदेश प्राचीन काळी तक्षकांच्या अमलाखाली असावा असें दिसतें. हाच प्रदेश पूर्वी शाहधेरी या नांवानें प्रसिद्ध होता असें म्हणतात. शिकंदर बादशहाच्या स्वारीच्या वेळेस हें शहर फार भरभराटींत होतें असें एरियन म्हणतो. त्याचप्रमाणें स्ट्रॅबो व प्लिनी हे या व याच्या आसपासच्या प्रदेशाच्या सुपीकपणाची फार तारीफ करतात. ख्रिस्तपूर्व १९५ या साली हें शहर ग्रीक राजांच्या अमलाखाली आलें. नंतर शक राजे येथें राज्य करूं लागले. ह्मुएनत्संगच्या वेळेस हा प्रदेश काश्मीरच्या अमलाखाली होता. या प्रदेशांत महमद गझनीच्या वेळेस गखर लोक रहात होते. १७६५ सालीं लाहोरचा सरदार गुजरसिंग भंजी यानें मुकबरखानाचा पराभव करून हा प्रदेश आपल्या अमलाखालीं आणला. १८१४ साली रणजितसिंगाने हा जिल्हा आपल्या राज्यास जोडला. इतर टेंकडयांवरील प्रदेश गखर लोकांच्या अमलाखाली स्वतंत्र होते. परंतु १८३० साली जम्मूच्या गुलाबसिगाने हा सर्व प्रदेश आपल्या अमलाखली आणला व आपल्या जुलमी राज्यपद्धतीनें लोकांस त्रासवून सोडलें. १८४९ साली रावळपिंडी व इतर शीख प्रदेश ब्रिटिश अमलाखाली आला. तेव्हांपासून १८५७ सालपर्यंत येथील कारभार साधारण शांततेनें चालला होता. मूरीच्या धुंडी लोकांनी मध्यंतरी बंड केलें पण तें ब्रिटिशांनी मोडलें. १९०४ साली अटक, फत्तोजंग व पिंडीघेब या तहशिली अटक प्रांतास जोडल्या गेल्या. शाहधेरी भागांत पूर्वीचे अवशेष पुष्कळ आहेत, त्यांतील बालार स्तूप फार प्रसिद्ध आहे.
जिल्ह्यांतील लोकसंख्या (१९२१) ५६९२२४ असून या जिल्ह्यांत रावळपिंडी, काहुता, मूरी व गुजरखान अशा ४ तहशिली आहेत. यांतील लोंकसंखत मुसुलमान सुमारें ४८००००, हिंदु ६०००००, व शीख २८००००.आहेत. यांतील गखर, जंजुया व रजपूत लोक यांची भरती विशेषत: सैन्यांत होते. सती, धनीभल, ब्राह्मण व क्षत्रिय लोकहि सैन्यांत घेतले जातात. शेंकडा ९८ शेती पावसाळ्यावर अवलंबून असते. पावसाळ्यांत ३/४ धान्य पिकतें व पाऊसहि मुबलक पडतो. २०४६ चौरस मैल जमिनीपैकी ९३९ चौरस मैल वहीत जमीन आहे. रब्बीधान्य गहूं व जव; खरीफ धान्य ज्यारी, बाजरी व कडधान्य. गहूं व मका पेरतांना बियांची निवड फार काळजीनें करतात. येथील गुरें फार खुजीं असून दूधहि फारसें देत नाहीत. उंट चांगले असतात व घोडेहि पुष्कळ निपजतात. या जिल्ह्यांतील जंगल १५२ चौरस मैल आहे. त्यांतील मूरी व काहुत टेंकडयांतीलच जंगल चांगलें असून बाकीचें गवताळ आहे. जिल्ह्यांत व्यापारी महत्त्वाचे खनिज पदार्थ किंवा कारखानेहि नाहींत. कापूस सगळीकडे पिकतो व रावळपिंडी येथें रेशमाच्या फुलकारी तयार होतात. याशिवाय तेथें ग्यास, दारू व तंबू यांचे कारखाने आहेत. दळणवळणाचा मुख्य मार्ग नॉर्थ वेस्टर्न रेल्वे आहे. याशिवाय काश्मीर-रस्ता व खुशालगड-रस्ते आहेत. जिल्ह्यांत रावळपिंडी व मूरी या ठिकाणीं म्युनिसिपालिटया आहेत. स्थानिक कारभाराची व्यवस्था जिल्हा बोर्डाकडे आहे. शिक्षणाच्या बाबतींत पंजाब प्रांतांतील २८ जिल्ह्यांपैकी या जिल्ह्याचा नंबर दुसरा येईल.
तहशील.- ही तहशील रावळपिंडी जिल्ह्याच्या ईशान्य दिशेस आहे. क्षेत्रफळ ७६४ चौरस मैल. लोकसंख्या सुमारें २॥ लाख आहे. या तहशिलीचे सोहान नदीनें दोन भाग होतात. उत्तर भागांत सुपीक जमीन हिमालयापर्यंत पसरलेली आहे. दक्षिण भागांत पुष्कळशां नद्या आहेत व जमिनींतहि पुष्कळ फरक आहे.
शहर.- हें शहर रावळपिंडी जिल्ह्याची राजधानी असून नॉर्थ वेस्टर्न रेल्वेवर आहे. कलकत्त, मुंबई व कराचीपासून हें शहर अनुक्रमें १४४३, १४७९, व ९०८ मैल लांब आहे. येथील लोकसंख्या सुमारें एक लाख आहे. हल्लीचें शहर नवीनच वसलेलें आहे. कनिंगहेंमच्या मतें येथें ख्रिस्ती शकापूर्वी गजनीपूर नांवाचे शहर होतें. चवदाव्या शतकांत मोंगलांच्या स्वारीत हे शहर नामशेष झालें परंतु झंडाखानाने लवकरच ते उर्जितावस्थेत आणलें. एकोणिसाव्या शतकांत येथें शहासुजा लपून राहिला होता. व येथेंच १८४९ सालीं गुजराथची लढाई झाली. ब्रिटिश अमलाखाली आल्यापासून रावळपिंडी हें मुख्य लष्करी ठाणें बनलें आहे व नॉर्थ वेस्टर्न रेल्वेमुळें हें एक मुख्य व्यापाराचे ठिकाण झालें. येथें गॉर्डन कॉलेज व ५ हायस्कुलें आहेत. येथें नॉर्थ वेस्टर्न रेल्वेचा मुख्य कारखान आहे. याशिवाय गँस, तंबू, लोखंड वगैरेंचेहि कारखाने आहेत.