विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रास्ते घराणें - पेशवार्इंतील महत्त्वाचें व पेशव्यांचें संबंधी असें हें घराणें होतें. यांचें मूळचे आडनांव गोखले, कोंकणांतील (रत्नागिरी जिल्हा) वेळपेश्वरचे हे रहाणारे. मूळपुरूष गंगाधरपंत हा आदिलशाहीत वेळपेश्वरचा महाजन असून जाफराबाद महालांचा रसदभरणा दाभोळास करीत असे. त्याचा नातु हरि नारायण हा दाभोळसुभ्याचा रसदभरणा विजापुरास करी म्हणून त्याला रसदा असा किताब देऊन आदिलशहानें त्याच्याकडे आणखी दुसर्या सुभ्यांच्या रसदा भरण्याचें काम दिलें. हरिपंताचा नातू श्यामजी हा शाहाच्या पदरीं सातार्यास राहिला. त्याचा मुलगा भिकाजीपंत यानें महालचा पोतेभरणा व व्यापार आणि सावकारी करून सातार्यास शनिवारांत वाडा बांधला. त्याची सचोटीची व रास्त वागणूक व हुशारी पाहून शाहूनें रसदे याबद्दल रास्ते ही पदवी त्यास दिली, शामजीच्या नाशिकच्या तीर्थोपाध्यायाच्या लेखांत रसदे असेंच नांव आहे. शाहूनें भिकाजीस ५२००रू. चा सरंजाम दिला. थोरल्या बाजीरावानें भिकाजी नाईकाची सर्वांत वडील कन्या आपला पुत्र नानासाहेब यास केली. तिचे नांव गोपिकाबाई. हें लग्न वांईस शाहूच्या देखरेखीखाली झालें. या विवाहापासून रास्त्यांचा उदय पुढें झपाटयानें झाला. भिकाजी नाईकास मल्हार, गणपती, आनंद, लक्ष्मण, गंगाधर (हा गंगापुरी गोपिकाबाईजवळ रहात असे), रामचंद्र व जीवन असे ७ पुत्र होते, गोपिकाबाईला सगुणबाई नांवाची एक बहीण होती. ही आपाजी राम गाडगीळ याला दिली होती. आपाजीस नानासाहेबानीं अक्कलकोटकरांची दिवाणगिरी दिली. वरील सात भावांत मल्हार व रामचंद्र हे निपुत्रिक होते, बाकींच्यांचा वंश वाढला. या भावांनां पेशव्यांनी माळव्यांत व कर्नाटकांत अनेक कामगिर्या सांगितल्या होत्या; त्या त्यांनी यशस्वी रीतीसे पार पाडल्यानें त्यांनां तिकडेच जहागिरी दिल्या. पहिली सरदारी तीन हजार स्वारांची मल्हाररावास बागलकोट व बदामी हे किल्ले घेतल्यामुळे मिळाली. त्यानंतर मल्हाररावास २१ हजारांची तैनात मिळाली. लक्ष्मणराव यांस प्रत्येकी १०।१० हजारांची तैनात मिळाली. मल्हाररावाच्या मागें सरदारी आनंदरावास मिळाली व त्याबद्दल ११२९१५० रूपयांचा सरंजाम मिळाला. गणपतराव यास १९३२५०रू. लक्ष्मणरावास २०८००, गंगाधररावास २५००० व रामचंद्ररावास १००००, जीवनरावास ५२००रू. अशा तैनाती होत्या; शिवाय ५ हत्तींच्या खर्चास ५ हजार रू. मिळत. आनंदरावाच्या मुलीच्या मुलासहि ५३५० रू. ची तैनात होती. शिवाय ११४४० रू धार्मिक इनामखर्चांसाठी पेशव्यानीं यांनां नेमणूक करून दिली होती. याप्रमाणें पेशवार्इंत सर्व सरदारांत मोठी तैनात रास्त्यांचीच होती. आनंदराव १७९९ त वारला. त्याचा दत्तक पुत्र माधवराव हा खडर्याच्या लढार्इंत होता. हा परशुरामभाऊस सामील आहे या संशयानें रावबाजीनें याला १८०० त कैदेंत ठेविलें व सरंजाम जप्त केले. पण पुढें १८०२ त सोडून जप्तीहि मोकळी केली. माधवरावाच्या सल्ल्यामुळें रावबाजीनें वसईचा तह केला. माधवराव हा इंग्रजांचा पक्षपाती म्हणून पेशव्यानी त्याचा सर्व फौजसंरंजाम जप्त केला (१८१४). परंतु एलफिन्स्टनच्या आग्रहानें १८१७ त जप्ती खुली केली. पुढें १८१८ त माधवरावानें पेशव्यानीं इंग्रजांस शरण जाण्याबद्दल इंग्रजांतर्फे खटपट केली. पंरतु पेशव्यानी ती ऐकली नाही. माधवराव प्रथमपासून इंग्रजांस मिळाला होता. इंग्रजांनी त्याचा १३०५२५८ रूपये सरंजामापैकी ६० हजारांचाच सरंजाम कायम केला व बाकीचा काढून घेतला. माधवराव १८२६ त वारला. त्याचा पुत्र बळवंतराव १८५१ त निपुत्रिक वारला तेव्हा त्याचा पुतण्या खंडेराव गंगाधर यास सरदारी मिळाली. यानें नानागर्दीत इंग्रजांनां मदत केली. हा १८६० त निपुत्रिक वारला. खंडेरावाची स्त्री उमाबाई ही मोठी हुशार स्त्री होती. तिचा दत्तकपुत्र गंगाधरराव हा १८६६ त वारला. म्हणून तिनें दुसरा दत्तक धेऊन त्यांचे नांव आनंदराव ठेविलें. यास दोन मुलें झाली. मुलगी गंगूबाई या कै. भाऊसाहेब जमखिडीकर यानां दिल्या होत्या. मुलगा माधवराव, हेच विद्याप्रात असून फर्स्टक्लास सरदार आहेत.
रास्त्यांनी पुणें, वांई, तालीकोट वगैरे गांवी मोठमोठे पहाण्यासारखे वाडे बाधले आहेत; पुण्याच्या एका वाडयांत इंग्रजांनी १८१८-१९ पर्यंत आपलें लष्कर ठेविलें होतें. पुण्यास यांच्या नांवाची एक पेठ आहे. रास्त्यांनी घाट, देवळें, विहिरी वगैरे बांधल्या व कांही पेठाहि बसविल्या. वाईस यांनी बांधलेल्या देवळांची कामें शिल्पशास्त्रदृष्टया प्रेक्षणीय आहेत. यांनी ३०।४० लाख रूपयांची धार्मिक कृत्ये केली. (वाड-कैफियती; महाराष्ट्रमंडळाची बखर; म. रि. ३; आपटे-गोखले घराण्याचा इतिहास.)