विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राहू - ज्योति:शास्त्रांत वरच्या पातबिंदूला राहू अशी संज्ञा आहे. ग्रहणाचें मुख्य कारण राहू होय; व कधी कधी ग्रहण या अर्थीहि राहू शब्द वापरण्यात येतो. नवग्रहांमध्यें राहूचा अंतर्भाव करण्यांत येतो. पुराणांतरी, राहूचें वर्णन म्हणजे तो सूर्यचंद्रांनां गिळणारा एक दैत्य होय असें आढळतें. विप्रचित्ति व सिंहिका यांच्यापासून तो झाला असून त्याला चार हात व शेंपूट होतें असें वर्णन आहे. देवांनी समुद्रांतून अमृत काढलें त्यावेळी त्यानें ते प्रच्छन्न रीतीनं प्राशन केलें. पण सूर्य व चंद्र यांनां समजल्यामुळे त्यांनी ही हकीकत विष्णूला कळविली. त्यावेळी त्याचें शिर व दोन हात छाटून टाकण्यांत आले; तथापि तो अमृत प्याला असल्यामुळें मेला नाही; त्यामुळें त्याचें कबंध अंतरिक्षांत ठेवण्यांत आले. सूर्यचंद्रानीं याचें कृत्य उघडकीस आणल्यामुळे याचा त्या दोघांवर फार कोप आहे व वेळ येतांच त्यांनां तो गिळून टाकतो अशी कल्पना आहे. राहूच्या मलिन रथाला आठ घोडे असून त्यांनां कधींहि विश्रांति नाही. पर्व अगर ग्रहणदिवशी राहू हा सूर्यापासून चंद्राकडे व चंद्रापासून सूर्याकडे परत येतो असें विष्णुपुराणांत म्हटलें आहे. राहूला अग्रपिशाच्च, भरणी, भू, कबंध, इत्यादि विशेषणे लावण्यांत येतात.