विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
राक्षस - दैत्य, दानव इत्यादि अनार्य जातींच्या नांवाप्रमाणेंच हें एक अनार्य लोकसमाजाचें नांव असावें. ऋग्वेद, अथर्ववेद, तैत्तिरीय संहिता इत्यादि ग्रंथांत 'रक्षस्' हा शब्द असुरवाचक म्हणून आलेला आहे. तैत्तिरीय संहितेंतील (२.४, १) एका आख्यायिकेंत देवांनी राक्षसांनां असुरापासून फोडून मग असुरांचा पराभव केला व नंतर राक्षसांनांहि हांकलून लावलें असा उल्लेख आहे. देवांचे शत्रू या नात्यानें दैत्यांप्रमाणेंच यांचा उल्लेख करण्यांत येतो. रामायणामध्ये या राक्षसांचे बरेंच विस्तृत वर्णन आढळतें. या जातीचा रावण हा राजा असून तो महाप्रतापी होता. रावणाप्रमाणेंच राक्षसजातीची उत्पत्ति पौलस्त्य ऋषीपासून झाली असावी असें कांहींचें म्हणणें आहे. विष्णुपुराणांत, राक्षस हे कश्यप व दक्षकन्या स्वसा यांच्यापासून राक्षस नांवाचा जो मुलगा झाला त्याचे हे वंशज होत असें म्हटलें आहे. ब्रह्मदेवानें उदकें निर्माण केलीं त्यावेळीं त्यांचें रक्षण करण्याकरितां जे प्राणी निर्माण केले ते हे राक्षस (रक्ष्-रक्षणें) होत असे रामायणांत म्हटलें आहे. रामायणांत राक्षसांसंबंधी जीं वर्णनें आढळतात, त्यांमध्यें मारूती हा लंकेमध्यें गेला असतां त्याला कांही सुंदर, तर कांही कुरूप, कांही अगदीं खुजे तर कांही भयंकर उंच, कांही कृश तर कांही बरेच लठ्ठ असे राक्षस आढळल्याचें वर्णन आहे. राक्षसांनां, हनूषस्, इष्टिपचस्, नक्तंचरस्, रक्तप, दंदशूक इत्यादि विशेषणें जोडण्यांत येतात, व त्यांपैकी बरींच नांवे त्यांच्या स्वभावाची दर्शक म्हणून पडलेली दिसतात.