विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रिचर्ड कॉबडेन, (१८०४-१८६५) - हा इंग्लंडांतील खुल्या व्यापाराचा प्रवर्तक व मुत्सद्दी होता. लहानपणींच लंडन येथील एका वखारींत काम धरून पुढे तो एका पेढीचा फिरता मुनीम झाला. सॅबडन व मँचेस्टर येथें स. १८३२ त त्यानें कापडावर छाप मारण्याचा स्वत:च्या मालकीचा धंदा सुरू केला. कॉबडेनच्या नांवाचे साहचर्य ज्या तीन मोठया राजकीय चळवळीशी सतत राहील, त्या चळवळी म्हणजे, संरक्षक कर रद्द करण्याची चळवळ; युद्ध व लष्करी खर्च याविरूद्ध हाकाटी; व व्यापारी तहासंबंधी अनुमति, अशा स्वरूपाच्या होत्या. आपले व्यापारी संबंध वाढविणे व राजकीय संबंध शक्यतोंवर कमी करणें, हाच नियम परराष्ट्राशीं वागतांना ध्यानांत ठेविला पाहिजे, हें कॉबडेनच्या धोरणाचें गमक होय. आपलें घर संभाळणें हेंच राष्ट्राचें पहिलें कर्तव्य होय; राजकीय व लष्करी भानगडीमुळें वरील कर्तव्याकडे साहजिकच दुर्लक्ष होतें असें त्यास वाटत असे. दुसर्यांच्या कारभारांत ढवळाढवळ न करण्याच्या राजनीतीचा अवलंब ब्राइटप्रमाणेंच करून, कॉबडेनने रशिया व चीन देशांवरील मोहिमेस विरोध केला. देशाचें वैभव लष्करी सत्ता व मुलुखगिरी. यांवरून ठरवावयाचें नसून, वाढती लोकसंख्या व व्यापार यांवरून ठरविलें पाहिजे अशा मताचा तो होता. व्यापारी व कामकरी यांचें कल्याण म्हणजेच अखिल राष्ट्राचें कल्याण असें तो मानीत असे. मोफत शिक्षणाकरितां कॉबडेननें पुष्कळ श्रम घेतले व मँचेस्टर विद्यामंदिर त्याच्याच श्रमाचें दृश्यफल होय. त्याच्या राजकीय चारित्र्यांतील अनेक गोष्टी सोडून दिल्या तरी या ठिकाणी त्यानें स्वदेशाचीच नव्हे तर अमेरकेंतील संयुक्त संस्थानांची जी बहुमोल सेवा केली तिचा उल्लेख करणें जरूर आहे. जेव्हां इंग्रजी आरमारानें किनारा सोडला, व अमेरिकन व्यापाराची लूट आरंभिली तेव्हां हाउस ऑफ कॉमन्स सभेपुढें यानें हा प्रश्न जोरानें मांडला. तेथें याच्यावर अनेक बाजूंनी शाब्दिक हल्ले झाले परंतु इभ्रत व उदार वागणूक या धोरणांचा पुरस्कार करण्याचे त्यानें सोडलें नाही. स्वत:च्या मताप्रमाणें ठरविलेल्या देशहितसाधनांवरील निष्ठा व स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीशीं नितांत इमानीपणा या दोन गुणांबद्दल सर्व दर्जाचे राजकारणी लोक त्याची एकमुखानें वाहवा करतात. कॉबडेन हा लंडन येथें १८६५ त मरण पावला.