विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रिठा - या झाडास संस्कृतांत फेनिल किंवा अरिव्ह; गुजराथेंत अरिठा; मराठींत रिठा वगैरे नांवें आहेत. रिठयाचें झाड आंब्याच्या झाडाइतकें मोठें वाढतें. ज्या देशांत ही झाडें होतात त्या देशाला साबणाची कांही जरूरी नाही. रिठयाचें झाड हिंदुस्थानांत बहुतेक सर्वं ठिकाणी होतें. याची पानें उंबराच्या पानाहून मोठीं असतात. रिठयाच्या रसांत पारा घोटल्यास त्याची गोळी होऊं शकते. स्वच्छ केलेल्या भांडयावर हा घट्ट झालेला पारा चोळला तर त्या भांडयावर त्याचा चांगला मुलामा बसतो. रिठा अंगास व केंसास लाऊन स्नान केल्यास अंग स्वच्छ होऊन केंसहि निर्मळ व तुळतुळीत होतात. सुती व व विशेषेंकरून रेशमी कपडे रिठयानें स्वच्छ निघतात. रिठयाचे औषधी उपयोग बरेच आहेत. सर्पदंश झाल्यास रिठयाचें पाणी करून त्याचें डोळ्यांस अंजन करावे. विषाचा फारच जोर असल्यास रिठयाचें पाणी करून प्यावयास द्यावें, म्हणजे उलटी होऊन त्वरित विष उतरतें.