विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रूपद - ही एक अनाम्लिक धातु असून तिचा भारांक ८५.४५ आहे. बुन्झेन व किरचॉफ हे खनिज पाण्याचा विच्छिन्नकिरणदर्शकाच्या योगानें प्रकाशपट्टा पहात असतां त्यांत नवीनच अशी एक रक्तरेषा त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आल्यामुळें त्यांनी ही कोणत्या तरी नवीन मूलद्रव्याची आहे असें ठरविलें. या मूलद्रव्यास त्यांनी रूपद (रूबिडीयम) असें नांव दिले. लिथियमच्या लिपिलोडाइट नांवाच्या कच्च्या धातूपासून लिथियम वेगळा करून खाली राहिलेल्या सांक्यांतून धातु वेगळी करतां येते. ही धातु वेगळी करण्याकरितां त्या कच्च्या धातूंत असणार्‍या निरनिराळ्या धातूंच्या प्लातिनीहरिदांच्या निरनिराळ्या प्रमाणांत असणार्‍या विद्राव्यतेचा फायदा घेतात. प्रत्यक्ष धातु मात्र तिच्या कर्बिताचें कर्बद्रिप्राणिदाच्या वातावरणामध्यें ऊर्ध्वपातन करून तयार करतात (हें ऊर्ध्वपातन चालू असतांनां पालाश व कर्ब-एक-प्राणिद हें तप्त करीत असतांना होणार्‍या स्फोटक द्रव्याप्रमाणें एखादें द्रव्य तयार होण्याचा संभव असतो). त्याच्या उत्प्राणिदाचें स्फटोच्या सान्निध्यांत उज्जीकरण केल्यासहि शुद्ध धातु मिळते. ह्याच उत्प्राणिदाचें तें द्रवस्थितींत असतांना विद्युद्विच्छेदन करून मिळालेली धातु थंड केलेल्या पिरिडीनमध्यें उघडल्यास ती शुद्ध स्वरूपांत मिळते. ही धातु रजतासारखी पांढरी असून हवेंत उघडी राहिल्यास तिचें प्राणिद बनते, शिवाय ह्याच्यायोगानें अनाम्लिक धातूप्रमाणे पाणीहि विघटित होतें. तिची बरींच प्राणिदें व गंधकिदें माहीत आहेत.