विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रूमोलिआ - बाल्कनद्वीपकल्पाचा जो भाग तुर्कस्तानच्या ताब्यात होता त्या भागाला साधारणपणें १५ व्या शतकापासून पुढें रूमेलिआ या नांवानें संबोधीत असत. याच्या उत्तरेस बल्गेरिया; पश्चिमेस अल्बेनिआ; आणि दक्षिणेस मोरिया हे देश होते. रूमेलिआ हें नांव विशेषेंकरून मध्यअल्बेनिया आणि पश्चिम मॅसिडोनिया मिळून बनलेल्या प्रांताला लांवण्यांत येत होतें व ह्मा प्रांताचें मोनॅस्टिर हें मुख्य शहर होतें. १८७०-१८७५ सालांमधील काळांत राज्यकारभारांत फेरबदल झाल्यामुळें हें नांव कोणत्याहि राजकीय विभागास यथार्थ लावतां येत नव्हतें. सन १८७८ च्या बर्लिनच्या तहानें पूर्वरूमेलिया हा तुर्की साम्राज्याचा स्वसत्ताक प्रांत बनविण्यांत आला, परंतु सन १८८५ मध्यें रक्तपात न होतां क्रांति घडून आली व त्यावेळी हा प्रांत बल्गेरियाला जोडण्यांत आला.