विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रूरकी - संयुक्तप्रांतांत साहराणपूर जिल्ह्यांतील पूर्वेकेडील तहशील. क्षेत्रफळ ७९६ चौ. मैल. लोकसंख्या सुमारें तीन लाख. हरिद्वारजवळ गंगेचा कालवा आहे परंतु त्याचा या तहशिलीस फारसा उपयोग होत नाहीं. तालुक्याचें मुख्य शहर रूरकी. लोकसंख्या ५७०००. ऐने.ई-अकबरींत रूरकी एका परगण्याचें मुख्य शहर होतें असें लिहिलें आहे. जेव्हां रूरकी हें कालव्याच्या कारखान्याचें मुख्य ठिकाण (१८४५-४६त) झालें तेव्हा त्याला महत्त्व आलें. १८४५ सालीं येथें प्रसिद्ध थॉमसन इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन झालें. हल्ली तेथें रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, विद्युत् व यांत्रिक वगैरे शाखा आहेत. येथें स. १८६८ त म्युनिसिपालिटी स्थापन झाली.