विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रूपराम कटारी - हा हिंदुस्थानी ब्राह्मण मोठा विद्वान पंडीत व मुत्सद्दी असून हा सुरजमल जाटाचा पुरोहित व त्याचा मुख्य सल्लामसलतगार होता. शिंदे, होळकर व पेशवे ह्मांच्याबरोबर सुरजमल जाटाचीं जीं राजकारस्थानें होत, तीं ह्माच्यामार्फत होत असत. कुंभेरीच्या लढाईनंतरचा तह याच्याच मध्यस्थीनें ठरला. सुरजमल मराठयांनां जी खंडणी देत असे तीबद्दल रूपरामला पेशवे सरकारकडून शेंकडा दोन रू. देणगीदाखल मिळत. यानें पुष्कळ द्रव्य मिळविलें व तें दानधर्मांत आणि देवालयें, राजवाडे, बागा व तलाव वगैरे बांधण्यांत खर्च केलें. बरसाना येथील लाडलीचें (राधेचें) भव्य मंदिर यानेंच बांधिलें आहे. (ह. सं. जुन्या ऐ. गोष्टी, भा. २)