विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रूसो, जीन जॅक्स (१७१२-१७७८) - एक फ्रेंच तत्त्ववेत्ता व शिक्षणशास्त्रपुरस्कर्ता. आई लहानपणीच वारल्यामुळें व बाप दुवर्तनी, तामसी व मूर्ख असल्यामुळें रूसोच्या शिक्षणाची फार हयगय झाली. दहाव्या वर्षी रूसो आपल्या आजोळी राहूं लागला. दोन वर्षे शाळेंत शिकल्यानंतर त्यानें बर्याच ठिकाणीं खाजगी नोकरी केली. अॅनेसी येथें मॅडम डी वॉरेन्स बाईच्या नोकरींत असतां तिनें रूसोला ग्रीक, लॅटिन, व संगीत या विषयांच्या शिक्षणाकरितां शाळेत पाठविण्यास सुरवात केली. पण या सुस्थितीतूनहि लहर येतांच तो बाहेर पडला व इकडेतिकडे भटकूं लागला. तथापि पुढे तो पुन्हां मॅडम डी वॉरेन्सजवळ नोकरीस राहिला (१८३२-१८३८). हा काळ त्याचा बराच सुखांत गेला व त्यानें विविध विषयाची पुस्तकें वाचली. पण तेथे प्रकृति नीट न राहिल्यामुळें त्यानें वॉरेन्सची नोकरी सोडून पॅरिस, व्हेनीस इत्यादि ठिकाणी खासगी नोकरी केली. पॅरिस येथें असतां डिडेरो (फ्रेंच सायक्लोपीडियाचा-ज्ञानकोशाचा-आद्य कर्ता) याच्याशीं व त्याच्या इतर लेखक मित्रांशी त्याची ओळख झाली होती, व १७४१ सालीं डिडेरोनें आपल्या सायक्लोपीडियाकरितां रूसोचे लेख घेण्याचें कबूल केले. शिवाय रूसोनें स्वत:च्या नव्या नव्या संगीतविषयक कल्पना पुढें मांडून पॅरिसमधील चांगल्या वजनदार लोकांशी परिचय केला. डि जॉनच्या अकेडमीनें (विद्यालय) 'सुधारणेचा नीतिमत्तवर परिणाम'. या विषयावरील निबंधाला एक बक्षीस ठेविलें, व तो निबंध लिहून रूसोनें तें मिळविलें. या निबंधांत रूसोनें 'नैसर्गिक स्थितीची श्रेष्ठता' (सुपिरिऑरिटी ऑफ दि सॅव्हेज स्टेट) ह स्वत:चें रूढमतविरोधी मत सोपपत्तिक रीत्या पुढें मांडलें होतें. त्या काळांतल्या लहरी समाजांत रूसोच्या निबंधानें एकदम भयंकर खळबळ उडवून दिली. व तो एकदम प्रसिद्धीस आला. १७५२ सालीं रूसोच्या एका संगीत नाटकाचा प्रयोग होऊं लागला, तोहि फार लोकप्रिय झाला; अनेकांची कृपादृष्टि त्याच्याकडे वळल्यामुळें त्याची सांपत्तिक स्थिति बरीच सुधारली.
यापुढील चार वर्षे ही लेखनदृष्टया रूसोच्या आयुष्यांतील अत्यंत महत्त्वाचीं होत, कारण या काळांत त्यानें आपले सर्वांत श्रेष्ठ ग्रंथ प्रसिद्ध केले. १७६० साली 'नॉव्हेली हीलौसी' ही कादंबरी, आणि १७६२ साली अनुक्रमें 'सोशल कॉन्ट्रॅक्ट' (सामाजिक करार) व एमीली हे दोन नीतिशास्त्रविषय व शिक्षणशास्त्रविषयक ग्रंथ बाहेर पडले. या ग्रंथांच्या प्रसिद्धीनें रूसोची कीर्ति अगदी कळसास पोहोंचली, पण येथूनच त्याच्या अपकर्षास सुरवात झाली. त्याचा 'सोशल कॉन्ट्रक्ट' हा ग्रंथ राजसत्ताविरोधी होता, आणि 'नॉव्हेली हीलौसी' ही कादंबरी अनीत्याचरणोत्तेजक होती, आणि 'एमील' हा ग्रंथ तत्त्ववेत्ता व धर्मोपदेशक या दोन्ही वर्गांनां चीड आणणारा होता. त्यामुळें ओरड होऊन १७६२ साली पॅरिसच्या पार्लमेंटनें रूसोचा एमीली ग्रंथ दोषी ठरविला. रूसोला पकडून शिक्षा करण्याचा हुकून झाला. पण ही बातमी रूसोला देऊन त्याची पळून जाण्याची सोय त्याच्या हितचिंतकांनी केली तेव्हां रूसो प्रथम बर्नप्रांतांत व नंतर प्रशियाच्या अमलाखालील हद्दींत गेला. रूसोच्या ग्रंथांवर टीकात्मक लेख प्रसिद्ध होऊं लागले, त्यामुळें तो लोकांत इतका अप्रिय झाला की, त्याच्या जिवाला धोका होण्याची भीति उत्पन्न झाली. म्हणून १७६५ सालीं इंग्लंडमध्ये तो डेव्हिड ह्मूम या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याच्या आश्रयास जाऊन राहिला. येथें त्यानें आपला 'कन्फेशन्स' हा ग्रंथ लिहिण्यास सुरवात केली. पण लंडन येथेंहि त्याला जॉनसन, वगैरे कित्येक प्रतिकूल इसम असल्यामुळें व विशेषत: त्याच्याच लहरी व विचित्र स्वभावामुळें ह्मूमशीं त्याचा तंटा होऊन १७६७ सालीं तो फ्रान्सला परत गेला, व अनेक ठिकाणीं पूर्ववयांतल्याप्रमाणें भटकत हिंडला. त्याचा 'कन्फेशन्स' लिहिण्याचा क्रम चालू होताच. १७७० सालीं तो पॅरिसला परत आला. या सुमारास त्यानें थेरेसी ली वेसूर या बाईशी विवाहाचा धार्मिक विधि उरकला. या दोघांचा नवराबायकोप्रमाणें संबंध १७४३ पासूनच सुरू असून त्यांनां चारपांच मुलें या विवाहाविधीपूर्वीच झालीं होतीं. १७६५ सालीं लंडनमध्यें असल्यापासूनच्या रूसोच्या लेखनांत वेडेपणाची छटा दिसूं लागले; 'कन्फेशन्स' संपल्यावर त्यानें 'डायलॉगज' (संभाषणें) लिहिले, पण या सर्व लेखानावरून, व अनेक इसमांबरोबरच्या वागणुकीवरून त्याचा मेंदु कांहीसा बिघडला होता व तो अर्धवेडा बनला होता असें स्पष्ट दिसतें. उत्तर वयांत त्याचा छळ करण्यास कांही इसम प्रवृत्त झाले होते या गोष्टींमुळें त्याचें मन सतत भीतिग्रस्त असे. ही गोष्टहि त्याच्या वेडेपणास अंशत: कारण झाली. अशा स्थितींत तो ता. २ जुलै, १८७८ रोजीं मरण पावला.
रूसोची बुद्धि फार चांगली व तीक्ष्ण होती यांत शंका नाही; पण तिला वळण मात्र चांगलें मिळालें नव्हतें. त्याची नीतिमत्ता अगदी हलक्या दर्जाची होती. तथापि मरणोत्तर रूसोचे दोष विसरले जाऊन त्याच्या ग्रंथांतले गुणच लोकांनां विशेष रीतीनें दिसूं लागले; ते इतके कीं, १७८९ सालीं फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी लोक त्याला देवतातुल्य मान देऊं लागले. इंग्रज कवि बायरन यानेंहि रूसोची इतकी ओतप्रोत स्तुति केली कीं, १८२० ते १८५० या काळांतल्या पिढींतले सर्व यूरोपमधील बहुतेक स्त्रीपुरूष त्याच्या पुस्तकांवर अनुरक्त झाले होते. रूसोचीं धार्मिक मतें आस्तिकपणाचीं पण धर्म ईश्वरप्रणी आहे असें न मानणारी (डीइस्टिक) आहेत. व्यवस्थित शिक्षण नसल्यामुळें केवळ मानवी आयुष्यक्रम व तत्कालीन लोकमन पाहून बनलेलें असें रूसोचें मत असल्यामुळें त्यांत विचारप्राधान्यापेक्षां भावनाप्राधान्य अधिक दिसतें.
शासनाशास्त्राच्या बाबतीत रूसो लोकसत्तावादी होता, व त्याच्या मतप्रतिपादनांत प्रामाणिकपणाहि होता. पण या विषयासंबंधीहि त्याची विद्वत्ता अल्प होती, तर्कशास्त्रांत तो मुरलेला नव्हता; त्यामुळें याहि विषयावरील त्याचीं मतें भावनाप्रधानच आहेत.
मानवी हृदयांतील मनोविकारांचा व नैसर्गिक सौदर्याचा वर्णनकार या सदरांत त्याला घालतां येईल. भावनाप्रधान लेखनांत आढळणारे सर्व दोष त्याच्या ग्रंथांत आहेत. पण प्रामाणिकपणा व कळकळ हे गुण त्याच्या ग्रंथांत पूर्ण असल्यामुळें वरील दोष वाचकांच्या चटकन नजरेस येत नाहींत.