विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर (१८१०-१८७८) - एक फ्रेंच रसायनज्ञ. घरची गरिबी असल्यामुळें लहानपणींच तो पॅरिस शहरीं एका दुकानांत नोकरीस राहिला. फावल्या वेळीं तो अभ्यास करीत असे. अशा रीतीनें २० वर्षांचा झाल्यावर तो शिकण्यास शाळेत गेला व पुढे लवकरच लिआन्स येथें रसायनशास्त्राचा अध्यापक झाला. तो पुढें पुष्कळ विद्यालयांत अध्यापक होता व कांही कारखान्यांची व्यवस्थाहि पहात असे. शेवटीं फ्रॅको-जर्मन युद्धांत त्यानें कित्येक वर्षे खपून लावलेल्या शोधांच्या टांचणाचे कागद नष्ट झालें.
असंपृक्त (अन्सॅच्युरेटेड) उज्जकर्बांची त्यानें हरिदें आणि इतर द्रव्यांनी युक्त असे पदार्थ तयार केले. जगांतील कित्येक ठिकाणच्या हवेचे नमुने घेऊन तिची रसायनिक घटना त्यानें तपासली. कित्येक मूलद्रव्ये व संयुक्त पदार्थ यांची विशिष्ट उष्णता त्यानें मोजून पाहिली. अनेक वायूंचे प्रसरण गुणक मोजून त्यानें असें ठरविलें की, बोंइलचा नियम सर्व वायूंस स्थूलमानानें लागू आहे. सूक्ष्ममानानें प्रत्येक वायूच्या गुणकांत फरक पडतों. विशेषत: ज्या वायूचें द्रवरूप लवकर होतें ते वायू या नियमास अनुसरून कचितच वागतात. रेझाल्टनें पार्याच्या ऐवजी हवेचा उपयोग करून उष्णमापन यंत्र तयार केलें शिवाय क्लेदमापन यंत्रहि यानें तयार केलेलें आहे.