विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रेडमंड, जॉन एडवर्ड (१८५१-१९१८) - एक आयरिश देशभक्त. ट्रिनिटी कॉलेज (डब्लिन) मध्यें शिक्षण झाल्यावर १८८६ सालीं त्याला वकिलीची सनद मिळाली पण त्यानें वकिलीचा धंदा मात्र कधींच केला नाहीं. १८८१ सालीं तो पार्लमेंटचा सभासद झाला. तो सतत दहा वर्षे पार्लमेंटमध्यें होता व त्यावेळी आयरिश पक्षातर्फे त्याच्याकडे प्रतीदाचें काम होतें. पार्नेलनंतर पार्लमेंटमध्यें आयरिश पक्षाचें पुढारीपण रेडमंडकडे आलें. व १९०० सालीं त्यानें आपल्या मुत्सद्दीगिरीनें आयर्लंडमध्येंज जे राष्ट्रीय पक्षामध्यें दोन तट होते त्यांच्यामध्यें एकी घडवून आणली. तथापि पार्लमेंटमध्यें यूनियनिस्ट आयरिश सभासदांचे बहुमत असल्यामुळें १९१० पर्यंत त्याला पार्लमेंटमध्ये महत्त्वाची कामगिरी करतां आली नाही. १९१० सालीं ऑस्क्किथ पक्षाला रेडमंडच्या पक्षाचें साहाय्य घ्यावें लागल्यामुळें पार्लमेंटमध्यें रेडमंडला महत्त्व प्राप्त झालें व त्याचा फायदा घेऊन त्यानें आयर्लंडला होमरूल मिळवण्याची जोरानें खटपट सुरू केली. ओब्रायन व हीली हे सीनफीन पक्षाचे अध्वर्यू त्याला तुच्छ लेखीत असत व त्याच्याविषयी संशय घेत असत, तथापि त्यानें पार्लमेंटमध्यें आपल्या अविश्रांत परिश्रमानें १९१२ सालीं होमरूल बिल पास करून घेतलें. तथापि अल्स्टरनें या बिलाला मान्यता देण्याचें नाकारलें, तेव्हां या बिलामध्यें पुन्हा दुरूस्ती करण्याबद्दल वाटाघाट सुरू झाली. पण रेडमंडनें आयर्लंड हे एकसंधी राखण्यांत आलें पाहिजे व अल्स्टरला आयर्लंडपासून निराळें करणें अत्यंत गैरमुत्सद्दीपणाचें आहे असें स्पष्टपणें जाहीर केलें. महायुद्धामध्यें इंग्लंडला आयर्लंडांतून सैन्य व द्रव्य मिळवून देण्याची रेडमंडने पुष्कळ खटपट केली पण सीनफीनच्या विरोधामुळें त्याला फारसें यश आलें नाहीं. १९१५ च्या संयुक्त मंत्रिमंडळामध्यें जागा घेण्याचें त्यानें नाकारलें. होमरूल बिल अंमलांत आणण्याचें लाइड जॉर्ज लांबणीवर टाकीत आहे असें पाहतांच रेडमंडनें त्याच्यावर जाहीर रीतीनें टिका करण्यास सुरूवात केली. त्याचा परिणाम असा झाला कीं, लाइड जॉर्जनें आयरिश कन्व्हेन्शन भरविण्याची सूचना केली. त्याप्रमाणें परिषदेचें काम चालू असतां रेडमंडची प्रकृति एकाएकीं बिघडून तो मरण पावला.