प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड

रेशीम - रेशमाचें तार्तर देशांतील नांव शेर व कोरिया देशांतील सिर हींच नांवें निरनिराळ्या देशांतील भाषांत थोडयाशा फरकानें आढळतात; उदाहणार्थ, चिनी लोक कोसल्यास त्सौ व रेशमाच्या किडयास त्सि म्हण्तात तर ब्रह्मी लोक त्सा, ग्रीक लोक रेस, लॅटिन भाषेत सेरिकम, जर्मन लोक सीडेन, फ्रेंच लोक सोई, रशियन लोक शिओल्क, अँलो सॅक्सन लोक सिओल, आइसलंडचे लोक सिल्के, व इंग्रज लोक सिल्क म्हणतात. प्राचीन व अर्वाचीन हिंदुस्थानांतील रेशीम व रेशमाचे किडे यांच्या नांवांमध्यें व या शब्दांमध्यें मात्र कांही संबंध नाही. पट्ट या संस्कृत शब्दापासून रेशमास आसामी व बंगाली भाषांत पट व तामिळ भाषेंत पट्ट म्हणतात. हिंदुस्थानांत सर्वत्र व काश्मीरमध्यें देखील पट हा शब्द आढळतो. रेशीम बनविणार्‍या पुंडरीकाक्ष अथवा मुंड नांवाच्या लोकांचें नांव पुंडरीक (रेशमाचा किडा) ह्मा संस्कृत शब्दापासून आलें आहे. हिंदुस्थानांतील फार प्रचारांतील रेशीम हा शब्द इराणी भाषेंतील अबरेशम शब्दापासून बनला आहे, याप्रमाणें, मेशी व डेमेशेक या हिब्रू शब्दांशीं व डिमक्सो व कुस या अरबी शब्दांशीहि रेशीम या शब्दाचा निकट संबंध आहे.

पाळीव अथवा तुतीच्या (मबलेरि) झाडावरील राहणारे रेशमाचे किडे व जंगली अथवा तुतीच्या झाडाखेरीज इतर झाडांवरील रेशमी किडे अशा तुतीच्या झाडाखेरील इतर झाडांवरील रेशमी किडे अशा दोन सदराखली रेशीम व रेशमाचे उद्योगधंदे यांचें वर्णन दिले आहे.

पाळीव अथवा तुतीच्या झाडावरील रेशमाचे किडे.- पाळीव व जंगली या भेदांपेक्षा तुतीच्या झाडांवर उपजीविका करणारे व तदितर असे विभाग करण्यांचे कारण हिंदुस्थानांत व चीन देशांत बर्‍याच शताकंपासून कांहीं रानटी किडे कांहीशा पाळींव स्थितींत आढळतात तर उलटपक्षी तुतीच्या झाडावर उपजीविका करणारे सर्व किडे अवश्यमेव पाळींव नसतात. म्हणून ज्यास जंगली रेशीम म्हणतात तें तुतीच्या झाडांवर उपजीविका न करणार्‍या किडयांचे रेशीम होय.

मूळ व सतिस्थान व जोपासना.- तुतीच्या झाडांवरील रेशमाचे किडे मूळचे उत्तर चीन व त्याच्या लगतचे देश यांजमधील समशीतोष्ण प्रदेशांतील असावेत असें वाटतें. ब्रह्मदेशांतील मणिपूर संस्थानांत हे किडे कदाचित मूळचे असावेत व बर्‍याच काळापासून पाळलेले असावेत असें वाटतें. हिंदुस्थान हें यांचे मूळ स्थान नसलें तरी हिमालयपर्वताच्या अगदी पलीकडे, व विशेषत: अगदी पूर्वेच्या बाजूस हे किडे फार प्राचीन काळींहि आढळत; त्या काळी खोतान नांवाच्या काश्मीरच्या पश्चिमेच्या एका प्रदेशांतहि हे किडे पाळले गेले होते असे आढळतें.

बौद्धधर्मीय ब्रह्मदेशांत अहिंसा तत्त्व जरी प्रचलित आहे तरी ब्रह्मी लोकांस रेशमी वस्त्रें आवडतात. पुष्कळ शतकांपासून या देशांतील टेंकडयांवर हे किडे पाळलेले आहेत, व याबीन जातीचे लोक रेशीम तयार करण्याचा धंदाहि करता. ख्रि. पू. २०००-३००० कालापासून चीन देशांत रेशमाच्या किडयांची पैदास होत असल्याचे इतिहासावरून आढळून येतें. ही रेशमाची माहिती काळजीपूर्वक गुप्त ठेविली होती. खोतानच्या नायकाशीं लग्न लावलेल्या एक चिनी राजकन्येनें खोतान देशांत हे किडे व तुतीचें झाड नेलें, ही गोष्ट इ. स. ४१९ साली घडली व येणेंप्रमाणें मध्यआशिया खंडांत रेशमाचा धंदा उत्पन्न झाला. यानंतर दीड शतकानें खोतानहून रेशमासंबंधींचे ज्ञान इराण, ग्रीस व रोम या देशांत पसरलें. जस्टीनियन बादशहाच्या काळापर्यंत रेशमाची माहिती यूरोपांत नव्हती. जपानांत हे किडे पाळणें चीन इतकेंच प्राचीन काळापासून चालू आहे. बर्‍याच शतकांपासून हिंदुस्थानांत रेशमाचे किडे पद्धतशीररीतीनें पाळले जात आहेत. उत्तरहिंदुस्थान, मध्यआशिया (खोतान) आणि इराण या देशांत आणि आसाम व बंगालप्रांतांत, बहुधां चीन देशांतून (मणिपूर संस्थानामार्फत) रेशमाची माहिती आली. सारांश त्या काळी जेथें तुतीची झाडें लावणें शक्य होतें तेथें तेथें पाळीव रेशमाचे किडे नेण्यांत येत होते.

युरोपांत किडयांची वाढ करण्याचे रोमन लोकांनी केलेले प्रयत्‍न फारसे यशस्वी झाले नाहींत. तिकडील सध्यांचे किडे तेराव्या शतकांत नेकेल्या किडयांपासून झालेले आहेत असें समजतात. आतां हे किडे इटली (लांबर्डी), फा्रन्स (मध्य व दक्षिण), इराण, अफगाणिस्तान, काश्मीर, हिंदुस्थान, अमेरिका, ऑॅस्ट्रेलिया, ब्रह्मदेश, सयाम, चीन, जपान, कोरिया, इत्यादि देशांत आढळतात. जेथें जेथें समशीतोष्ण हवा आहे व तुतीचीं झाडें आहेत त्या ठिकाणी या किडयांची चांगली वाढ होऊन उत्तम रेशीम निघतें. यूरोपांत व जपानांत हे किडे व त्यांचें खाद्य तुतीचीं झाडें यांमध्यें कुशल तज्ज्ञांनी बरीच सुधारणा केल्यामुळे सांप्रत चीन व हिंदुस्थान या देशांतील रेशीम बाजारांत मध्यम प्रतीच्या रेशमाहूनहि हलक्या दर्ज्याचे ठरलें आहे असें म्हणतात.

किडयांच्या जाती:- पुढें दिलेल्या मुख्य जाती आहेत मोरी नांवाचा यूरोपांतील रेशमाचा किडा-हिंदुस्थानांतील रेशमाच्या पैदासीविषयीं लिहिणारे लोक यूरोपांतील किडयांच्या जातींचा हा एक वर्ग करतात. हिंदुस्थानांत कांही यूरोपीय जातीच्या किडयांची पैदास कशी करतां येईल याविषयी प्रयत्‍न चालू आहेत. या किडयांच्या अंडयांनां ३०० ते ४०० अंश उष्णमानांत देखील थंडीपासून बचावून ठेवावें लागतें. या किडयांच्या बाबतीत कित्येक तोटेहि आहेत, उदाहरणार्थ, एप्रिल त आगष्ट महिन्यांत वाढविलेले किडे रोगानें मरतात. बंगालच्या हलक्या तुतीच्या झाडांवर हे किडे पाळल्यास ते चांगले कोसले बनवीत नाहीत. यांनां भारी तुतीच्या झाडांचीं पानें खाऊं घालावी लागतात. म्हणून मोठीं तुतींची झाडें असलेल्या प्रांतांत यूरोपीय किडे वाढविणे किफायतशीर होईल. उलटपक्षी छोटापलु नांवाचे दुसर्‍या एका जातीचे किडे भारी तुतीच्या पानांवर वाढविल्यास चांगले कोसले बनवीत नाहीत. लॉरेन्स व वार्डले यांनी परिश्रम करून यूरोपीय किडयांनां काश्मीरच्या हवेंत पाळण्याच्या कामी बरेंच यश मिळविलें आहे. अलीकडे आसाम, बलुचिस्तान, व ह्मैसूर या देशांत असलेच प्रयत्‍न करण्यांत आले आहेत.

आराकनी बाँबिक्स नांवाची एक जात आहे तिल ब्रह्मी लोक न्यापा असें म्हणतात. या जातीची मादी वर्षांतून दोनपेक्षां जास्त वेळां विते. यासंबंधी अगदी पहिली माहिती मेजर बोगलेच्या पत्रांत आढळते. या किडयाच्या स्थित्यंतरांनां लागणारा काल पुढें दिल्याप्रमाणें असतो:- अंडावस्था ८ दिवस, कमिअवस्था १५-२३ दिवस, रूपान्तर पूर्वावस्था ८-१० दिवस व पतंगावस्था २-३ दिवस. ब्रह्मदेशांत या किडयांची जोपासना करण्याची घरें वेगळी ठेवली नसल्यामुळे व विष्ठा व इतर घाण वेळच्यावेळी न काढली गेल्यामुळें हे किडे फार भरतात. या किडयांपासून काढलेलें रेशीम व रेशमी कपडा हींहि हलकीं असतात. थारवडी, प्रोम, थायेटयो व टौंगू ह्मा जिल्ह्यांत बहुधां या किडयांपासून रेशीम काढतात आणि पेगू व आराकान यांमधील उंचवटयाच्या प्रदेशांत या किडयांची पैदास करतात. केअर बाँबिक्स नांवाची याची तिसरी जात असून तिला निस्त्री, सुनामुखी, कृमी, निस्तारि व मद्रासी हीं नांवें आहेत. बंगाल व आसामप्रांतांत या किडयांची वीण मार्चमध्यें होते. या प्रांतांत हे किडे देशी किडयांहून हलके समजले गेले आहेत. देशी किडयांस हिंवाळा मानवतो. मद्रासी किडयांचे कोसले बहुधां पिंवळे असून देशीपेक्षां मोठे असतात परंतु याचे तंतू देशीपेक्षां अधिक चिवट व तेजस्वी नसतात. या जातीचा पतंग दुधासारखा पांढरा असतो. यांच्या कृमिअवस्थेंत याच्या दोन्ही बाजूंनां दोन काळे ठिपके असतात. उन्हाळ्यांत या किडयांच्या सर्व स्थित्यन्तराला २५ दिवस लागतात परंतु हिंवाळ्यांत ३५ दिवस लागतात. याची वीण वर्षांत फार होते. सुनामुखी व कृमी या जाती विशेषेंकरून कोर्इंबतूरकडे जास्त आढळतात. बंगाल्यांत मालडा भागांत या जाती आहेत. या जातींपैकीं सुनामुखी किडे सर्वांत उत्तम असून त्यांच्या खालोखाल मद्रासी किडे असतात. यांचे रेशीम हिरव्या रंगाचें व हलकें निघतें. याची जोपासना करण्यास फारशी काळजी घ्यावी लागत नाही. हा देशी किडा १ वर्षपर्यंतहि टिकूं शकतो. मद्रासी किडयाला चिनापलु हेंहि नांव आहे. देशी, उर्फ जोटो पोलो व पालु अथवा पाट या जातींचे किडे मूळचे बंगालमधील आहेत असें समजतात. हिंवाळ्यांतील व उन्हाळ्यांतील विणीचे किडे इतर महिन्यांतील किडयांहून जास्त चांगले असतात. हा किडा लहान असून वर्षातून ४० ते ११० दिवसांच्या अंतरानें पांचदां कोसले देतो. नोव्हेंबर महिन्यांतील किडे सर्वांत उत्तम ठरलेला आहे. एप्रिल महिन्यांत विणारे किडे हे बहुधां चीन देशांतले आहेत. सुनामुखीमध्यें १८१३ सालीं १०४० मण रेशीम या किडयापासून निघालें असें म्हणतात. देशी किडयाची पैदास करावयाची असल्यास भुरकट पतंग फार चांगले. मणिपूर येथील पाळलेले आणि रानटी किडे देशी वर्गाचे आहेत.

सिना अथवा चोंटापट जातीचा किडा लहान असून पुष्कळदां वितो; परंतु याचे कोसले देशी व मद्रासी किडयांहून हलके असतात. आसामामध्यें हे किडे फार होतात. या किडयांचे कोसले पांढरे, हिरवे, अशा निरनिराळ्या रंगांचे असतात. हे किडे आपलीं अंडी थोडी उबवत नसून, सगळीं एकदम उबवतात व त्यांतून सर्व पिल्लें एकाच वेळेस निघतात. हे किडे इतर रेशमी किडयांहून हलके आहेत. बोरो पोलो किंवा बारापल्लु, व लार्ज पॅट नांवाचा किडा मूळचा इटलीमधील असून तो सुमारें १७१९ सालीं हिंदुस्थानांत आणला गेला असावा. हा किडा देशी व मद्रासी या किडयांहून मोठा आहे. याची मादी देशी व मद्रासी या किडयांहून मोठा आहे. याची मादी मार्चमध्यें विते. १८१७ साली हरिपीलकडे हा किडा मोठया किंमतीचा समजला गेला होता पूर्वी बहार प्रांतांत या किडयाची पैदास भरपूर असून फायद्याची होती. जानेवारी महिन्याच्या शेवटीं या किडयाची अंडी उबवावी लागत असून ४०-४५ दिवसांत त्यांपासून कोसले तयार होतात. या किडयाची जोपासना फार त्रासदायक असून ती फार काळजीपूर्व करावी लागते. याचा तंतु बारीक असून मजबूत असतो. हल्ली आसाम व बंगाल प्रांतांत याची पैदास कधीं कधीं करतात. या किडयांपासून वर्षांतून एकदांच कोसले निघत असल्यामुळें या किडयांची पैदास जवळ जवळ नाहींशींच झालेली आहे, चोटापल्लु, बास्त्रिपल्लु या जातींची अंडी उबवावयास ८-१० दिवस लागतात. परंतु बारापल्लूची अंडी उबवायास १० महिने लागतात.

तुतीची लागवड:-हिंदुस्थानांतील समशीतोष्ण प्रदेशांत या झाडांची लागवड रेशमी किडयांकरितां करतात. उत्तर हिंदुस्थानांतील मैदानावरील प्रदेश, बलुचिस्तान, अफगाणिस्तान, काश्मीर व ११००० फूट उंचीपर्यंतचा हिमालयाचा प्रदेश यांमध्यें ही झाडें लागवडीस आणलेलीं आहेत. 'एम. इंडिका' नांवाची झाडेंहि रेशमी किडयांकरितां हिंदुस्थानांत पुष्कळ लावलेली आहेत. बंगाल, आसाम व निलगिरी प्रांत यांमध्ये हीं झाडें फार आहेत. या झाडांची लागवड 'बुश' पद्धतीनें केलेली असते. फक्त बंगाल प्रांतातच ही झाडें चांगलीं पद्धतशीर वाढतात. तिकडे या झाडांच्या लागवडीला बिघ्यामागें २०-२५ रू खर्च लागतो. युक्यानन हॅमिल्टन व वॉलिच यांनी या झाडांच्या लागवडीसंबंधी माहिती दिलेली आहे. बंगालच्या बोर्ड ऑफ ट्रेडनें या लागवडीसंबंधी १८१३-३६ पंर्यतची उपयुक्त माहिती दिलेली आहे. बागांतील तुतीचीं लागवड बहुधां हम् निप्रा या जातीची असते. याचीं पानें काळसर व मोठालीं असून फळें गोड असतात. परंतु हीं पानें रेशमाचे किडे पैदास करण्यास चांगली नसतात. चोटापल्लु किडयानें हीं पानें खाल्ल्यास त्याला एक प्रकारचा रोग होतो. रेशमाच्या किडयांच्या पैदाशीस 'एम् मल्टिकुलिस' ही तुतीची झाडें चांगली. हीं मूळची चीन देश आणि फिलिपाईन बेटांतील आहेत. यांची पानें मोठीं आणि नाजुक असतात. याच्या फांद्या लहान असून त्यांना पानें पुष्कळ येतात. तुतीच्या झाडांऐवजी अमेरिकन ऑसेज ऑरेंजचीहि लागवड करतात. रेशमी किडयांना ते लहान असतां पिंपळाची पानें खावयास देतात. बंगालमध्यें वसंतऋतूत तुनीचीं पानें लहान असल्याकारणानें पिंपळाचीं पानें किडयांनां देतात.

तुतीच्या झाडाचे रोग:-या झाडाच्या रोगांमध्ये भयंकर रोग म्हटला म्हणजे ''तक्र'' हा होय. हा रोग अंगावर खवले असलेल्या एका जातीच्या किडयांपासून होतो. झाडांनां हा रोग झाला म्हणजे त्यांचे कोंब फुगीर दिसतात व त्यांची पानें मुरडलेली असतात. हा रोग झालेल्या झाडावरील रेशमाचे किडे निघून जातात व या झाडाचीं पानें त्यांनी खाल्ली तर त्यांनां फ्लेचरिक अथवा ग्रेसरिक नांवाचा रोग होतो. जानेवारीपासून जूनपर्यंत या रोगाचा भर असतो, त्यामुळें रेशमाच्या व्यापाराचें फार नुकसान होतें. अल्कलीमिश्रित घासलेट इमल्शन हें झाडांवर फेंकल्यास रोग नाहींसा होतो. या झाडांचा ''नैचा'' म्हणून तक्राप्रमाणेंच एक दुसरा रोग आहे. मोठया झाडांपेक्षां लहान झाडांनां हा रोग फार होतो. काश्मीरमधील व विशेषेंकरून श्रीनगर संस्थानांतील झाडांवर एक प्रकारची बुरशी वाढते. ही बुरशी जुन्या झाडांवर आल्यास फारसें नुकसान होत नाही परंतु ती वाढीस लागलेल्या लहान रोपावर आल्यावर भयंकर नुकसान होतें. ही बहुधां दुसर्‍या वर्षीं किंवा त्यानंतर येते. ज्याठिकाणीं बुरशी लागली असेल त्याच्या खालून झाड छाटावें लागतें व त्यामुळें कित्येक वर्षांची वाढ फुकट जाते. जपानमधील तुतीच्या झाडांनां ही बुरशी पूर्वीपासून लागत होती व हिंदुस्थानांत पैदाशीची जपानी पद्धत स्वीकारल्यानें ही इकडे आली असावी.

तुतीचीं झाडें असलेल्या जमिनीवरील सारा:- बंगाल्यांत तुतीची झाडें लावण्याच्या जमिनीचा सारा इतर पिकांच्या जमिनीच्या सार्‍याहून फार जबर घेतात. त्यामुळें रेशमी किडयांची पैदास व व्यापार मंदावत चालला आहे. हीं झाडें ज्या जमिनीत लावतात तींत ऊंस, तंबाखू व बटाटेहि होतात व हीं पिकें काढल्यास सारा कमी घेतात.

किडयांचे रोग व शत्रू:- या किडयांनां होणारे रोग पुष्कळ आहेत. पाश्चूरनें त्यांचा अभ्यास करून उपाय सुचविले आहेत. एन्.जी. मुकर्जी व त्याचे मित्र यांनी सूक्ष्मदर्शक यंत्रानें बी पाहून घेण्याची पद्धत सुचविलेली सर्वत्र मान्य होत चालली आहे. पेब्राइन नामक रोगाला बंगालीत काटा किंवा ताली म्हणतात. या रोगानें किडयाच्या पेशिजालांत बारीक रक्तगोलक होतात. या रोगानें जरी फार नुकसान होत नाही तरी रेशमावर त्याचा परिणाम होतो. हा रोग चेंगट व पिढीजाद असतो, फक्त निरोगी माद्यांच्या अंडयांपासूनच पैदास करण्याची खबरदारी घेतल्यास व आरोग्याचे नियम पाळल्यास रोग हटतो. कालाशिरा अथवा शालफा या रोगामुळें, किडयाच्या पचनेन्द्रियांत एक प्रकारचा विपाक होतो. हाहि रोग थोडासा पिढीजाद आहे. निरोगी अंडयांपासून पैदास करणें हाच उपाय उत्तम. चुना अथवा चुनाकेटे या रोगानें मेलेल्या किडयांच्या अंगावर पांढरी बुरशी येते. हा रोगानें मेलेल्या किडयांच्या अंगावर पांढरी बुरशी येते. हा रोग पिढीजाद नाही. बंगालमध्यें या रोग नें फार नुकसान होतें. रासा हा रोग हवेंत उष्ण्ता फार झाल्यास, पुष्कळ पाऊस पडल्यास व त्याच सुमारास किडयांची पूर्ण वाढ झालेली असल्यास अवश्य उद्भवतो. किडयांनां पहिल्यानें पक्की पानें खावयास देऊन पुढें कोंवळीं पानें दिल्यास हा रोग ताबडतोब होतो. रोग उद्भवल्यावर तुतीच्या मोठया झाडांचें प्रजनन सुरू केल्यास हा रोग हटतो. ट्रायकोलिगा बॉबिकिस नांवाच्या रोगाचा किडा रेशमी किडयांच्या अंगावर आपलीं अंडीं टाकतो व त्यामुळें पुष्कळ रेशमाचे किडे मरतात.

हवेचा परिणाम:-हिंदुस्थानांतील रेशमाचे किडे हे यूरोप, अमेरिका व वसाहतीतील रेशमाच्या किडयांप्रमाणेंच असतात परंतु हिंदुस्थानांत या किडयांवर हवेचा परिणाम फार होतो. हवा उष्ण असल्यामुळें येथील माद्या यूरोपमधील माद्यापेक्षां जास्त वेळां वितात, व त्यामुळें ते अशक्त होतात. हिंदुस्थानांत कोसले टाकल्यावर, शें.६० किडे ताबडतोब मरतात त्यामुळें हिंदुस्थानांतील रेशमाचा व्यापार जोर धरीत नाही.

जंगली रेशमी किडे- जंगली किडयांच्या पुष्कळ जाती आहेत, परंतु त्यांपैकी हिंदुस्थानच्या तीन, एक चीनची व एक जपानची ह्मा जाती व्यापारदृष्टया महत्त्वाच्या आहेत. या जातींची नांवें येणेंप्रमाणें.- हिंदुस्थानी टसर, मुगा व एरी, चिनी टसर व जपानी मुगा. इंग्रजींत याला टसर व फ्रेंच भाषेंत टस्सोर म्हणतात.

१६९१ साली रंफियसनें बंगालमधील टस्सर किडयासंबंधी उल्लेख केलेला आहे. १७१८ साली पेटीव्हरनेंहि मद्रासमधील टसर किडयांचा उल्लेख करून चित्रहि दिलें आहे. ऐने-इ-अकबरीमध्येहि (१५९०) किडयासंबंधी निर्देश आहे. निरनिराळ्या प्रांतांत या किडयांची निरनिराळी नांवें आहेत; उदा:- बंगालमध्यें बघी, जाखो, डाझा, डाबा, लुमाम, लुमांग व जारू; संयुक्तप्रांतांत कुसवारी, टसर; आसाममध्यें काटकुरा आणि दक्षिणेंत कोलिसुरा.

वसतिस्थान व जाती:- हे किडे मूळचे चीन, हिंदुस्थान व सीलोन या देशांतील होत. हिंदुस्थानांतील यांचा प्रसार राजमहाल टेंकडयांपासून खडकपूर, छोटानागपूर, ओरिसा, मध्यप्रांत, उत्तरसरकारमधून हैद्राबादपर्यंत आहे. याखेरीज नेपाळ, सिकिम, आसाम, मणिपूर, चितागाँग व म्हैसूर इकडेहि हे किडे आढळतात. या किडयांचे पुष्कळ प्रकार आहेत; मिलिटा किडे पिंवळे जर्द असतात, फाफिया जे तपकिरी रंगाचे असतात, नेब्युलोसा हे हिरवट व पिंगट असतात व सिंगालेसा हे गर्द तपकिरी असतात. या किडयांची प्रजननाची मुख्य ठिकाणें भागलपूर, छोटानागपूर, ओरिसा, छत्तिसगड, नागपूर, नर्मदा व जबलपूर हा भाग होय. पश्चिम हिंदुस्थानांत व विशेषत: मुंबई इलाख्यांत या किडयांचे प्रजजन म्हणण्यासारखें चांगलें होत नाही. प्रजननाची पद्धति येणेंप्रमाणें: पहिल्यानें ज्या झाडावर यांची जोपासनला करावयाची असेल त्या झाडांची लागवड जास्त प्रमाणावर करतात. व नंतर जंगलांतून या किडयांचे अडंयुक्त कोसले आणून ते या झाडांवर बांधतात. पक्ष्यांपासून कोसल्यांचें रक्षण करावें लागतें. कोठें कोठें या कोसल्यामध्यें फक्त या किडयांच्या माद्यांनांच ठेवून झाडांवर अंडी असलेली टोपली बांधण्याची पद्धति आहे. किडयांचे नरमादी असे जोड ठेविल्यास त्याचें खाणेंपिणें हें उघडया हवेवर करावें लागतें. नाहीं तर हे किडे अन्न खात नाहींत व चांगले पुष्टहि होत नाहींत. ह्मांनां अन्न देण्याकरितां एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणीं नेल्यास किंवा त्यांनां खातांना प्रत्यवाय केल्यास, ते फार भित्रे असल्यानें चांगले कोसले देत नाहींत. यांची पैदास व व्यापार वाढविण्याचे प्रयत्‍न शंभर वर्षांपासून चाललेले आहेत. त्यावेळच्या लिहिलेल्या हकीकतीवरून यांच्या पैदाशीची व जोपासनेची पद्धति, आजपर्यंत पूर्वींप्रमाणेंच चालत आलेली आहे असें दिसतें.

टसर जातीचे किडे चांगले होत नाहींत व त्यांच्या पैदासीपासून व्यापारास विशेष फायदाहि होत नाही असे मुंबई प्रांतांत दिसतें. हे टसर किडे आगगाडीच्या व इतर वहिवाटीच्या रस्त्यापासून दूर जंगलांत रहातात व त्यामुळें त्यांची पैदास करून त्यांपासून काढलेल्या रेशमाचा व्यापार करणें हें फार त्रासदायक होतें. त्यासाठीं संताळ वगैरे लोक जंगलात बसवावे व त्यांकडून त्यांची जोपासना करवावी असें मुकर्जी सुचवितो. चीनचा टसर किडा माणसाळविण्यांत अडचणी फारशा नाहींत त्यामुळें त्याची पैदास व जोपासना करणें कठिण नाहीं. हा किडा ओक झाडाच्या पानांवर आपली उपजीविका करतो व वर्षांतून फक्त दोनदां मादी विते. हा किडा चांगल्या शुद्ध हवेंत रहात असल्यामुळें व चिनी लोक उद्योगी व उत्साही असल्याकारणानें या किडयांची कृत्रिम पैदास वाढत जाऊन त्यापासून चांगला फायदा होत आहे. हिंदुस्थानांतील टसर किडे हे जंगलांत रोगट हवेंत रहात असल्याकारणानें हिंदु लोकांस त्यापासून फायदा करून घेंणे फार कठिण जातें.

टसर किडयांची वीण.-हे किडे बहुधां वर्षांतून दोनदां वितात. जंगली किडे तर चारदां वितात. पहिले कोसले सप्टेंबर महिन्यांत, दुसरे जानेवारींत व तिसरे जूनमध्यें निघतात. टसर रेशीम रिळावर गुंडाळणें, ओपविणें व रंगविणें याची माहिती एस. कॉटननें आपल्या पुस्तकांत दिली आहे. टॉमस वॉरडलनें टसरचें रेशीम रंगविण्याची जी पद्धति काढली, तिनें या रेशमाचा रंग चीनच्या रेशमाइतका तेजदार वठतो. या किडयांनी दिलेले तंतू सरळ नसून ते नागमोडी असतात व ते बाहेरच्या बाजूनें किडयापासून निघालेल्या चिकानें चिकटलेले असतात. या रेशमाच्या अंगी असलेला चिवटपणा त्या तंतुच्या विशिष्ट रचनेमुळें आलेला असतो. हे तंतू सरळ करावयाचे असल्यास वाफेचा उपयोग करतात. जपानी व चिनी टसरसंबंधी विशेष माहिती मुकर्जीने दिलेली आहे. मध्यप्रांतांत चांदा जिल्ह्यांत हे किडे पहिल्यानें आढळले; व १७७५ सालीं मराठयांनीं या किडयांपासून रेशीम काढण्याचे कारखाने काढले. संबळपूर व चांदा ही गांवें या किडयांच्या निपजीचीं मुख्य ठिकाणें होत. याच्या खालोखालचीं ठिकाणें रायपूर व बिलासपूर ही होत. मध्यप्रांत सरकारनें या किडयांच्या पैदासीबद्दल जे प्रयत्‍न केले त्यांची हकीकत देवरनें दिलेली आहे. भंडारा जिल्ह्यांतील यांची माहिती रा. परांजपे यांनी दिलेली आहे. यांच्या कोसल्यांना पुढील व्यापारी नांवें आहेत: (१) जपानचे यामामाई कोसले, (२) चीनचें टसर, (३) आसामचे मुगा कोसले, (४) बंगालचें टसर, इत्यादि. इतर सर्व जंगली कोसले बंगालप्रांतांत असून भारूअस हें त्यांचे जातिवाचक नांव आहे. बंगाली टसरचे तंतू सर्वांत लांब असतात परंतु इतर जातींच्या तंतूंहून हे हलके असतात. जपानमध्यें ''यामामाई'' या रेशमाची किंमत फार असते व त्याचे कोसले किंवा अंडी परदेशांत पाठविणारास देहांत शिक्षा केली जाते. यामामाई रेशीम जवळ जवळ मलबारी रेशमाइतकेंच चांगलें असतें. चीनच्या टसरचे कोसले बंगालच्या कोसल्यांहून लहान असतात. त्या तंतूंची सर्वसाधारण लांबी ५५० मीटर व बंगाली तंतूची लांबी ७०० मीटर असते. चीनपेक्षा बंगाली टसरमध्यें खराबी फार होते. मात्र त्यांतील रेशमाचें प्रमाण शेंकडा ८ व चिनीचें प्रमाण शेंकडा ५ असतें. बंगालीचा चिवटपणा २८॥ ग्रॅम व चीनचा १८ ग्रॅम असतो. तसेच बंगालीचें चिकटपणाचे प्रमाण शेंकडां २१॥ व चिनीचें शेंकडा १९ असतें. उन्हांत ओपविल्यावर बंगालीचे वनज शेंकडा ११ नें कमी होतें व चिनीचें शेंकडा २१ ने कमी होतें. चिनीपेक्षां बंगाली टसरला रंग चढविणे फार कठिण जातें.

बंगालमध्यें हे रेशीम तयार करण्याचे कारखाने बरेच उघडल्यामुळें टसरच्या कपडयांची मागणी जास्त वाढत आहे. बंगालमध्यें हें रेशीम विणून अथवा विकून उपजीविका करणारे दोन लाख लोक आहेत. मध्यप्रांतांत, संबलपूर व विलासपूर यांखेरीज इतर सर्व ठिकाणचे या रेशमाचे कारखाने खेडयांत आहेत. हें रेशीम विणणार्‍यांची संख्या वीस हजार आहे. हें रेशीम कोष्टी लोकांप्रमाणे शेतकरी लोकांच्याहि उपजीविकेचें साधन आहे. कारण खेडयांतील शेतकरी लोक टसरचे कोसले गोळा करून कोष्टयांना विकतात.

टसरचे कारखाने:- जंगलांतील कोसल्यांपासून रेशीम काढून तें रिळावर गुंडाळण्याचे कारखाने बंगल्यांत मुर्शिदाबादेस असल्यामुळे तेथें रेशीम आणावे लागते; याकरितां टसर पैदास होणार्‍या जिल्ह्यांतच हे कारखाने काढल्यास जास्त सोईचें होतें. यूरोपियन पद्धतीने हे कारखाने चालविल्यास फार फायंदा होण्याजोगा आहे. बांकुरा जिल्हा यां रेशमाच्या व्यापाराबद्दल पूर्वीपासून फार प्रसिद्ध आहे. परंतु तेथें कारखाने फार थोडे आहेत. या कारखान्यांत 'केथे' नांवाचा कपडा सर्वांत चांगला होतो. भागलपूर येथें होणारा 'बाफटा' कपडा 'केथे' पेक्षा जास्त प्रसिद्ध आहे. या कपडयाची आडवी वीण बहुधां सुती व उभी वीण बहुधां रेशमी असते. हजारीबाग, रांची व पलामऊ येथें या किडयांची पैदास मोठया प्रमाणावर होते व तेथून परगावीं पुष्कळ माल जातो. सिंधभूम येथेंहि या किडयाची पैदास मोठया प्रमाणात होत असून येथील धोतरें व लुगडी डाक्का व दक्षिण बंगाल्यांत जातात. मानभुम येथील कापडाचे कारखाने महत्त्वाचे आहेत. बालासोर, पुरी व कटक येथील कारखाने मोठे नाहीत तरी तेथें या किडयांची व त्यांच्या कोसल्यांची पैदासव पुष्कळ करतात.

जंगली रेशमी किडयांच्या मुख्य जातीपैकी दुसरी मुख्य जात म्हटली म्हणजे ''मुगा'' नांवाची होय. मुगा किडे आसामप्रांतांत असून त्यांच्या तंतूचा रंग अंबरासारखा असतो. मुगा हें जातिवाचक नांव असून त्यांत एरेमुगा, टसरमुगा व कातकरीमुगा या किडयांचा समावेश होतो. हे किडे असामखेरीज नागा टेंकडया, सिलहट, काचार, टिप्पेरा, ब्रह्मदेशांतील डोंगराळ प्रदेश, पांडिचेरी, कुमाऊन आणि कांग्रा या भागांतहि हे किडे बरेच आहेत. यांचा जुना उल्लेख १६६२ साली मीर जुम्लाच्या इतिहासांत केलेला आढळतो; परंतु टॅव्हरनियरच्या हकीकतीवरून यांची माहिती हिंदुस्थानच्या लोकांनां यापूर्वीचीच असावी असें दिसतें. टसरपेक्षां मुगांची कृत्रिम पैदास व जोपासना जास्त चांगली होते. यांचें खाणें झाल्यावर यांनां झाल्यावर यांनां कोसले टाकण्याकरितां एका विशिष्ट घरटयांत नेऊन ठेवितात. हा किडा वर्षांतून पांच वेळां वितो परंतु त्यापैकी फक्त दोन किंवा तीन विणीच उपयोगी पडतात. उत्तर आसामचे लोक विणीला उपयोगी पडणारे कोसले कामरूपहून आणतात. हे किडे सूम, लारेल, सौलु वगैरे झाडांच्या पानांवर वाढतात. विणीकरितां आणलेले कोसले एका उथळ व मोकळ्या भांडयांत, एक पंधरवडाभर, किंवा कधीं कधीं, तीन आठवडयांपर्यंत ठेवितात. या अवधींत कोसले परिपक्क होऊन त्यांपासून किडे होतात. मादी नराहून जास्त स्थूल असते. मादीच्या गळ्याभोवती एक दोरा बांधून तो दोरा तिच्या पंखाखालून दुसर्‍या एका दोरीला अडकविलेल्या गवताला बांधून ठेवितात. नरांनां मोकळे सोडतात. व एक मादी तीन दिवसांत सुमारें २५० अंडी घालते. हीं अंडी एका टोपलीत गवत आंथरून त्यावर ठेवून तीं कपडयाने आच्छादून ठेवितात. हिंवाळ्यांत ज्या खोलीत हीं अंडी ठेवितात ती खोली गरम ठेवून तींत शक्य तितका अंधार करतात. उन्हाळ्यांत हीं अंडीं घरांत न ठेवितां झाडावर ठेवितात. कडक ऊन, दंव, पाऊस यांपासून यांचा बचाव अवश्य करावा लागतो. अंडी बहुधां घरांत उबवितात. या अंडयांची चार स्थित्यंतरें होऊन किडयांची वाढ पूर्ण झाल्यावर हे किडे सुमारें ५ इंच लांब होतात. किडयांनीं झांडांचीं सर्व पानें खाल्ल्यावर हे किडे दुसर्‍या झाडांवर नेतात, व त्यांचे खाणें झाल्यावर कोसले तयार करण्याकरिता वेगळ्या जागीं नेतात. किडे पोसणारी झाडें ३ पासून १२ वर्षांच्या आंतली असावी लागतात. जास्त जुनी झाल्यास त्यांवर बुरशी व मुंग्या येतात. कावळे, घुबडें, वटवागळें इत्यादि पक्ष्यांपासून या किडयांचा बचाव करावा लागतो. मुगा किडयांचे कोसले सोनेरी रंगाचे, १।।। इंच लांबीचे असून त्यांचा व्यास १ इंच असतो. यांची कोशावस्था टसरपेक्षां कमी असल्यामुळें यांची जोपासना व पैदास करणें सोपें जातें. यांचें रेशीम रिळावर गुंडाळणें सोपें असतें. रेशीम काढण्याच्या अगोदर कोसल्यांत असलेले किडे उन्हानें किंवा विस्तवानें भाजून मारतात; व नंतर कोसले अल्कलीच्या द्रावणांत उकळतात. वीण ज्याप्रमाणें कमी जास्त चांगली किंवा वाईट असेल त्याप्रमाणें कोसल्यापासून कमीजास्त रेशीम निघतें. हिवाळ्यांतील विणीपासून सर्वांत कमी रेशीम निघतें. चांगलें रेशीम काढून घेतल्यावर राहिलेल्या अवशिष्ट भागापासून हलकें रेशीम काढतात. या हलक्या रेशमाला 'एरा' असें नांव आहे. चांगलें मुगा रेशीम ८ ते १२ रू. शेराप्रमाणें विकलें जातें. एराचा भाव ४ ते ६ रू. शेर असतो. मुगा रेशमापासून काढलेलें कापड चकचकीत पिवळ्या रंगाचें असून हें धुतलें असतां मुळींच विटत नाहीं. या कापडाचा भाव १॥ किंवा २ रूपयास १ चौरस यार्ड असतो. आसामकडील सिबसागर, गोलाघाट व जोरघाट या प्रांतांत या कापडाचे कारखाने आहेत. इराणंतहि हें रेशीम जातें. यूरोपच्या बाजांरांत हें रेशीम जात नाहीं. कारण तें त्यांनां फार महाग पडतें. या रेशमाच्या वार्षिक निर्गतीचे सरासरी प्रमाण २८० मण आहे. चंपा व मेझांकुरी हेहि मुगा रेशमाचेच दोन प्रकार आहेत. चंपा रेशमाचे कपडे पूर्वी अहोमचे राजे व आसामप्रांतांतील सरदार लोक घालीत असत; हल्ली तें कापड जवळ जवळ नाहींसें झालें आहे.
जंगली रेशमी किडयांची तिसरी जात एरि उर्फ एन्डी, एरिंडी किडयांची आहे. यांचे रेशीम आसाम व पूर्व बंगाल्यामधून येतें, नेपाळ व उत्तर हिंदुस्थानांतहि यांची पैदास करण्याचे प्रयत्‍न चालू आहेत. पूर्वी एरि रेशमी कपउे बहुतकरून आसाम प्रांतांतील गरीब लोक घालीत असत. एरि किडयांचे कोसले फार मऊ, पांढर्‍या किंवा पिवळ्या रंगाचे असून यांचे तंतू इतेक नाजूक असतात की, ते कापसाप्रमाणें पिंजल्याशिवाय त्यांचे सूत काढतां येत नाहीं. कोसले मऊ करण्याकरितां कोणी ते काहीं झांडाच्या राखेच्या द्रावणांत टाकतात. ऊन पाण्यानें यांचा तंतू बिघडतो; याकरितां थंड पाणी उपयोगांत आणितात.
एरंडीच्या झाडावर एरि किडे बहुधां चांगले पोसले जातात. या झाडांच्या दोन जाती आहेत; हिरवी पानें असलेलें व तांबडया पानांचें. हा किडा वर्षांतून दोनपेक्षा जास्त वेळां वितो. कधीं कधीं हा १२ विणी देतो असे म्हणतात. परंतु या विणीचे कोसले उपयोगी पडत नाहीत. फक्त पहिल्या सहा विणींचे कोसले उपयोगी पडतात. आसाममध्यें यांची पैदास व जोपसना घरांत करतात. किडे पोसणारी एरंडीची झाडे बहुधां परसांत लावितात. जोपासना करण्याचें काम बायका करतात; नोव्हेंबर, फेब्रुवारी आणि मे या महिन्यांतील विणी फार महत्त्वाच्या असतात. या किडयांच्या स्थित्यन्तरांचें कोष्टक येणेंप्रमाणें- उबविणें ७ ते १५ दिवस; किडयाचें संगोपन १५ ते ३२ दिवस; कोसलें विणणें ३ ते ६ दिवस; कोसल्यांत राहण्याचा काल १४ ते ३० दिवस; आणि किडयाचें आयुष्य ३ दिवस. ऋतूप्रमाणें या स्थित्यंतरांच्या कालांत फार होतो.

एक एकर जमिनींतील एरंडीच्या झाडांवर वर्षाच्या कांठी ६० ते ९० शेर कोसले तयार होतात. या कोसल्यांची किंमत सुमारें ६० रू. पर्यंत असते. म्हणजे हें पीक दुय्यम पीक म्हणून काढल्यास चांगला फायदा होतो. तुतीच्या झाडावरील किडयांपेक्षां या किडयांच्या पैदाशीस खर्च व श्रम कमी पडतात कोसल्यांतून किडे बाहेर पडले म्हणजे कोसल्यांचे वजन फार कमी होतें. एका शेरांत, किडे आंत, असलेले कोसले ५०० ते ८०० बसतात व किडे बाहेर पडलेले कोसले ३००० ते ७००० बसतात. किडे बाहेर पडलेल्या १ मण कोसल्यांची किंमत १००रू. पर्यंत व किडे असलेल्या कोसल्यांची किंमत २० रू. पर्यंत असते. इटलीमध्यें हे कोसले तसेच रिळावर गुंढाळण्याचे कारखाने आहेत. परंतु हिंदुस्थानांत ते पहिल्यानें उलगडून नंतर त्यांचे सूत काढतात. या रेशमाचें काढलेले सून जाडेभरडें असलें तरी त्याचें कापड फार मजबून निघतें. पूर्वी आसाम व काचार प्रांतभर या रेशमाचा व कापडाचा व्यापार चाले. हें कापड ल्हासा येथें जाई. मीकिर, कुकी, गारी, खासी व सानटेंग हे लोक या किडयांची पैदास करतात. अलीकडे यूरोपीयन लोकहि या रेशमाचे कपडे वापरू लागले आहेत, व त्यामुळें या रेशमाचा खप दिवसेंदिवस जास्त होत आहे. बंगाल्यांत बोग्रा, रंगपूर, जलपैगुरी व मैमनसिंग येथें या कापडाचे कारखाने आहेत.

केळीपासून निघणारें रेशीम:-या रेशमाला एरी सिल्क असें म्हणतात, याचें जाडें व बारीक सूत निघतें. कंठारी, कांच, दोर, वगैरे केळीच्या जातींपासून सूत काढतां येतं. उत्तमप्रकारचा धागा काढण्यास केळीचें झाड मोठें असून त्यांत रस कमी असावा लागतो. साधारण दीड ते दोन टक्के तयार धाग्याचा माल निरनिराळ्या केळींच्या जातीपासून मिळतो म्हणजे दर झाडामागे ३/४ रत्तल धागा निघतो. उत्तरहिंदुस्थान व बंगाल इकडे हा धंदा विशेष आहे. हा केळीचा धागा तेल व इतर द्रव्यें वाशिंग सोडयाच्या पाण्यांत घालून उकळला म्हणजे त्याला मऊपणा येतो. अशा नरम सुतापासून धावत्या धोटयाच्या मागावर उंची कापड विणतां येतें. कापसाच्या सुताला चकाकी आणावी लागते तशी केळीच्या सुताला आणावी लागत नाहीं त्यास ती मुळचीच असते. हें सूत एका दिवसांत चातीनें २ शेर व चरख्यानें ६ शेर काढतां येतें व अनुक्रमें २ रू. आणि ६ रू. किंमतीचा त्याचा वळीव धागा तयार होतो. धागे पिंजून तयार झाल्यावर गांवठी चरख्यानें दोन पासून सहा धागे एकत्र पिळून काढावेत नंतर त्यांनां लांकडी किंवा लोखंडी लहान रूळाखालीं दाबून काढावेत. या धाग्यावर सर्व प्रकारचे अनिलाईन रंग चढवितां येतात. केळ तोडल्यानंतर त्याच्या सोपटाचे निरनिराळे थर करतात. प्रत्येक सोपट लांकडाच्या फळीवर आंतील बाजूवर ठेवून लोखंडाच्या पट्टीनें त्याच्या आंतला गीर ओरबडून काढतात. नंतर सोपट पाण्यांत धुतात. म्हणजे गीर व धागे निरनिराळे होतात. उसाच्या चरकांत सोपटें दाबून गीर काढण्याचीही दुसरी रीत आहे. हे धागे सावलीत दोन तीन दिवस वाळवावेत. त्यास ऊन लागू देऊ नये. यांत्रिक साधनानें धागा काढल्यास शे.१० टक्के माल ज्यास्त निघतो. ही यंत्रें अमेरिकेंत तयार होतात. सोडयामध्यें उकळलेले धागे एक तासभर, तेल व अमानियम कार्बोनेट यांच्या मिश्रणांत उकळावेत. १०० रत्तल धाग्यास ६ रत्तल खोबरेल तेल, कापशीचें किंवा एरंडेल व दोन रत्तल अमो. कार्बो. पुरतें यांनी धाग्याला रेशमासारखी चकाकी व मऊपणा येतो. जाडया धाग्याला दर टनी ३०० रू. तर रेशमासारख्या धाग्याला ९००रू. भाव येतो. याचा खप हिंदुस्थानपेक्षां यूरोपांत ज्यास्त आहे. हिंदुस्थानांत कृत्रिम रेशमापेक्षां दोर व कागद करण्याकडेच याचा उपयोग ज्यास्त होतो. धाग्यास चकाकी आणण्यास १० ग्यालन दारू (लिकर) मध्यें २ रत्तल जिलेटिन ग्ल्यू व २ रत्तल साबूच्या मिश्रणांत धागे ठेवतात.
कृत्रिम रेशीम:- (मर्स राइज्ड यार्न) हें रेशीम सुतावर कास्टिक सोडयाची क्रिया करून तयार करतात. लॅकॅशायरच्या जॉन मर्सन नांवाच्या माणसानें याचा शोध १८४४ सालीं लावल्यामुळें यास मर्सराइज्ड हें नांव मिळाले. रसायनशास्त्रांत कापसाला सेल्युलोज म्हणतात (कर्ब६, उज्ज१०, व प्राण५). या कापसावर कॅस्टिकसोडयाच्या द्रवाचा पुढील प्रमाणें परिणाम होतो. कापसाच्या प्राकृतिक व रासायनिक गुणधर्मांत फरक पडून तो मऊ व तुळतुळीत होतो. त्याची रंगग्राहक शक्ति वाढते व त्यावर रेशमासारखें तेज व चकाकी कायमची टिकते. हलक्या सुतापेक्षां भारी नंबरच्या सुताची चकाकी जास्त टिकते. रेशमासारखा स्वाभाविक रंग सुतास चढतो, सुताची वजन धारण करण्याचीहि शक्ति या प्रयोगानें वाढते. साध्या सुताची लड जर १३ शेर वजन सहन करील तर कृत्रिम रेशमाची लड २२ शेरांचे वजन सहन करील. सुताचें रेशीम तयार करण्याच्या बर्‍याच रीती आहेत. वर सांगितल्याप्रमाणें कास्टिक सोडयाची रीत सर्वसाधारण आहे. तींत कास्टिक सोडयाच्या द्रावणांत सूत ५ अगर १० सेकंद पर्यतच बुडवून सोडयाची क्रिया निर्बल करण्याकरिता सौम्य अशा गंधकाम्लांत तें सूत बुडवितात. का. सोडयाचें द्रावण ५०० ते ८०० पर्यंत घेतात ही क्रिया यंत्राच्या साहाय्यानेंच करावी; कारण त्यामुळें सुताचा ताण कायम राहतो. कृत्रिम रेशीम ओळखावयाचें असल्यास दोन तीन धागे घेऊन त्यांस आगकाडी लावावी म्हणजे ते जळून त्यांची राख होते. खरें रेशीम असलें तर जळतांना त्याची गुंडाळी होऊन कोळसा होतो. हें कृत्रिम रेशीम तयार करणें फार खर्चाचे असल्यामुळे हिंदुस्थानांत त्याचा प्रसार फारसा झाला नाही. चार्डोनेठ नांवाचा दुसरा एक प्रकार आहे. कापसावर नत्राम्लाची क्रिया केली म्हणजे (नायट्रो सेल्युलोज) पायराग्झिलिन पदार्थ तयार होतो. त्यापैकी पेट्रोनायट्रो सेल्युलोज पदार्थ मद्यार्क व ईथर यांच्या मिश्रणांत विरघळवून हें मिश्रण यांत्रिक साहाय्यानें एक बारीक भोंकावाटें पाण्यांत सोडलें तर तें ताबडतोब थिजतें, व त्यापासून वाटेल तितका लांब, बारीक व एकसारखा दोरा काढतां येतो. यालाच चार्डोनेट रेशीम म्हणतात. हें चार्डोनेट नांवाच्या फ्रेंच माणसानें १८८९ साली प्रथम तयार केलें.

हिंदुस्थानांतील रेशमाचें उत्पन्न व तयार माल.- सन १९१८ मध्यें हिंदुस्थानांत, रिळावर रेशीम गुंडळण्याचे कारखाने ३१ होते व ते बहुतेक सर्व बंगालमध्यें होते. १९१८ सालीं हिंदुस्थानांतील रेशमाच्या गिरण्यांची संख्या ३ असून, त्यामध्यें १२८३ लोक काम करीत होते. या ३ गिरण्यांपैकी १ बंगालमध्यें २ मुंबईमध्यें होत्या. १९०४ सालीं रिळांवर रेशीम गुंडाळण्याचे कारखाने ७५ व गिरण्या ११ होत्या. गिरण्यांखेरीज हिंदुस्थानांत पुष्कळसे हातमाग असून त्यांवरहि रेशमी कापड विणतात. बंगाल हा प्रांत रेशमाचें सूत काढून तें गुंडाळण्याचें मुख्य ठिकाण होय. पूर्वी या प्रांतांत साधे, कोरें व बिन रंगविलेलें ''कोरा'' नांवाचे रेशीम निघत होतें; परंतु जपानी व चिनी रेशमामुळें ह्मा रेशमाचा व्यापार मंदावला.

मुंबई इलाखा:- अहमदाबाद हें रेशीम व कलाबूतच्या कामाबद्दल पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. मराठयांच्या वेळेस कच्च्या व पक्क्या रेशमावर फार कर होता. त्यामुळें रेशमाचा व्यापार परदेशाशी होत नसे. इ.स. १६७९ सालापर्यंत अहमदाबादेस परदेशातून रेशीम येत होतें. १९ व्या शतकापर्यंत पश्चिम हिंदुस्थानांत रेशमाचा व्यापार पसरला गेला नव्हता, तेथें मध्यआशियांतून रेशीम येते होतें. मुंबईइलाख्यांत रेशमाच्या किडयांचें संवर्धन पहिल्यानें धारवाड येथें झालें (१८२३). येथें म्हैसूरहून किडे आणविले होते. पुढें धुळें येथें (१८२७) आणि पुणें येथें (१८२९) या किडयांचे संवर्धन करण्यांत आले. सन १८४७ सालपर्यंत अहमदाबादेस बाहेरून १०९ टन रेशीम आले.

अहमदाबादमध्यें होणार्‍या रेशमी कपडयाचे तीन प्रकार आहेत: (१) साधा, (२) भरजरी व (३) चीट, साधा रेशमी कपडा सुरतेसहि पुष्कळ होतो व तो काठेवाड, राजपुताना, मध्यहिंदुस्थान, मुंबई, दख्खन, मध्यप्रांत व निझामचा मुलुख इकडे खपतो. भरजरी रेशमाचे आंगरखे करण्याची चाल आतां प्रचलित नसून, हल्ली हा कपडा अंबारी व इतर मौल्यवान सामान तयार करण्याकडे उपयोगांत आणितात. सुरतेचें रेशीम ब्रह्मदेशांत पूर्वीपासून जात असतें. सांप्रत माल हलका निघाल्यानें फारसा जात नाही.

ह्मैसूर:- ह्मैसूर व त्रावणकोर या प्रांतांत रेशमाच्या निपजेंत व व्यापारांत मद्रासपेक्षां जास्त यश आलें. ह्मैसूरमधील रेशमाची निपज टिप्पू सुलतानच्या वेळेपासून झाली. १८९७ साली जें. एम् टाटा यानीं बंगलोरकडें तुतीच्या झाडांची लागवड करून रेशमाच्या किडयांकरितां संवर्धनगृहें बांधिली व जपानहून ह्मा किडयांची माहिती असलेले तज्ज्ञ लोक बोलवून रेशमी किडयांची पैदास केली; त्यांत त्यांस चांगलें यश आले. या यशामुळें ह्मैसूरसरकारनें वार्षिक ३००० रूपयांची देणगी टाटांच्या या कंपनीला दिली व या कंपनीनें जपानी पद्धतीनें केलेल्या रेशमी किडयांच्या जोपासनेसंबंधी लोकांनां शिक्षण द्यावें असें ठरले. त्याप्रमाणें तें दिलें जातें. 'बंगलोरमधील टाटाच्या कारखान्यांत सर्वांत उत्तम तर्‍हेचें रेशीम तयार होतें' असा मेजर शॉवर्सचा अभिप्राय आहे.

हिंदुस्थानचा रेशमाचा व्यापार.-पूर्वी बंगालमधून मक्का येथें रेशीम जाई, खंबायतच्या आखातांतहि रेशीम तयार होई व मच्छलीपट्टण हीं पूर्वीची हिंदुस्थानांतील रेशमाच्या व्यापाराचीं मुख्य ठिकाणें होतीं. इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या पत्रव्यवहारांत मच्छलीपट्टण, खंबायत, पाटणा, मुर्शिदाबाद, कासीमबझार येथील रेशमाचे वेळोवेळी उल्लेख आलेले आहेत. टॅव्हर्निअर म्हणतो कीं, ''डच लोक कासिमबझारहून प्रतिवर्षी ६००० ते ७००० रेशमाच्या गांठी हॉलंडला किंवा जपानला नेत होते. यापेक्षां जास्त माल नेण्याचाहि त्यांनी प्रयत्‍न केला होता; परंतु तार्तरी येथील व्यापारी व इतर मोंगल व्यापारी यांनी डच लोकांनां मनाई केली; त्यामुळें हिंदुस्थानांतील रेशमाचा व्यापार बहुधां हिंदुस्थानच्याच लोकांच्या हाती राहिला.''

यूरोपीयन लोक येण्याच्या पूर्वीच हिंदी लोकांनां कोसले पोसणें व त्यांपासून रेशीम व त्याचा कपडा काढणें ह्मा कला अवगत होत्या इतकेंच नव्हे तर त्यांचा रेशमाचा व्यापारहि बराच मोठा होता असें वरील उल्लेखावरून दिसतें. रेशमाचा व्यापार हिंदुस्थानांत करणार्‍या यूरोपीयंपैकी डच लोक हे पहिले होत. इंग्रजांनी रेशमाचा व्यापार हातीं घेतलयावर तो नांवारूपास आणण्यास त्यांनां जवळ जवळ १०० वर्षे लागली. त्यांच्या व्यापाराचें मुख्य ठिकाण सुरत होतें. तेथें सर्व रेशीम बंगालप्रांतांतून येई. ईस्ट इंडिया कंपनीची कासिमबझार येथील रेशमाच्या व्यापाराची वसाहत १६५८ साली स्थापिली गेली. तिकडे या कंपनीनें तुतीच्या झाडांची लागवड केली. त्यावेळीं ही कंपनी फक्त कच्चा रेशमाचाच व्यापार करीत होती. कच्च्या रेशमाला तेव्हा ''कंट्री वुंड'' हें नांव होतें. हें रेशीम सारखें नसून कोठें बारीक, कोठें जाड असें असे. ह्मा रेशमाची सुधारणा विल्डर व पौचन यांनी करून हिंदुस्थानांतील रेशीम इटलीमधील रेशमाइतकें चांगलें केलें. त्यावेळीं एतद्देशीय जोपासनापद्धतीऐवजी इटालियन जोपासनापद्धतीचें अवलंबन करण्यांत आलें. पुढें १७७१ सालीं रेशमाचे किडे व तुतीची रोपें हीं चीनमधून आणवून त्यांची लागवड ईस्ट इंडिया कंपनीनें केली. १७७४ सालीं सूत पिळवटण्याची इटालियन पद्धतीहि अमलांत आली ह्मामुळें हिंदुस्थानचा रेशमाचा व्यापार उत्तरोत्तर जास्त भरभराटीस येऊं लागला. पहिल्यानें या कंपनीशी रेशमाच्या व्यापारांत स्पर्धा करणारी राष्ट्रें तुर्कस्तान, चीन व जपान इतकींच होतीं. पुढें ही संख्या वाढत जाऊन हा व्यापार दिवसेंदिवस खालावला. एरंडीच्या झाडावरील किडयांचे रेशीम कांतून काढण्याचा प्रघात १८५८ पर्यंत चालू होता; परंतु ह्मा सालीं यूरोपमध्यें, कांतल्याशिवाय रेशीम काढण्याचा शोध लागला; त्याचप्रमाणें चांगलें रेशीम काढून घेतल्यावर राहणार्‍या हलक्या रेशमाचा कपडा याच वेळेस विणण्याचाहि शोध लागला; त्यामुळें हिंदुस्थानच्या हलक्या रेशमाला भाव येऊं लागला व तें जास्त खपूं लागलें.

परदेशाशीं व्यापार:- हिंदुस्थानचा परदेशाशी चाललेला रेशमाचा व्यापार सन १७७२ मध्यें सुरू झाला. त्यावेळीं हा व्यापार फक्त कच्च्या रेशमाचाच होता. तो १८५७ सालपर्यंत थोडा थोडा वाढत गेला. परंतु ह्मा साली इटली व फ्रान्समध्यें बंगालच्या रेशमी किडयांची निपज होऊ लागल्यामुळें, यूरोपांतील रेशमाची मागणी जरी वाढली, तरी हिंदुस्थानांत होणार्‍या रेशमाचा व्यापार ताबडतोब मंदावला. त्यानंतर हिंदुस्थानांतील हलकें रेशीम परदेशांत पुष्कळ खपूं लागलें व ह्मा हलक्या रेशमाचे कोसले परदेशांत जाऊ लागले. सन १९०० मध्यें हिंदुस्थानांत कोसलें, कच्चे व गुंडाळलेलें रेशीम मिळून एकंदर ५१२२०५७ रू. ची निर्गत झाली; १९०५ मध्यें ४९६९९७५ रू. निर्गत झाली.

परदेशास जाणार्‍या गुंडाळलेल्या रेशमापैकी बहुतेक सर्व माल बंगालमधून जातो. कोसल्यांपैकीं २/३ कोसले बंगालप्रांतांतून व १/३ मद्रास प्रांतांतून जातात. सारांश, परदेशास रेशीम पाठविणार्‍या प्रांतांमध्यें बंगाल व मद्रासप्रांत मुख्य आहेत. मद्रासप्रांतांतून जाणार्‍या रेशमापैकी पुष्कळसा भाग म्हैसूरप्रांतांतून येतो. अलीकडे मुंबई इलाख्यांतील रेशमाच्या निर्गतीचें प्रमाण वाढत चाललें आहे. मुबईहून परदेशास जाणार्‍या रेशमांत पुष्कळसा माल पंजाबमधून जातो.

हिंदुस्थानांत येणार्‍या परदेशी रेशीम कपडयापैकीं ३/४ कपडा मुंबईमध्यें येतो. व बाकीचा १/४ इतर प्रांतांत व मुख्यत्वेंकरून ब्रह्मदेशांत येतो. या रेशमी कपडयाची पुनर्निर्गतहि वाढत आहे. ती मुख्यत्येंकरून मुंबईहून होते. पुनर्निर्गत ज्या देशांत होते त्या देशांची नांवें-नाताळ, अरबस्तान ब्रिटिश, ईस्ट आफ्रिका, केपकॉलनी व इराण इत्यादि.

मुर्शिदाबाद येथील रेशमी कापडांत मुख्य प्रकार कोरा, मलमल, हातरूमाल, माथा व नकली रेशमी कपडा हे आहेत. कोरा कापड परदेशांत पुष्कळ जातें; हें अस्तराकरितां उपयोगांत आणितात. कोरा कापड हें फार स्वस्त असून बिन ओपलेल्या व बिन पिळलेल्या रेशमाचें असतें.

अलीकडील माहिती:-हिंदुस्थानांतील मुक्तिफौजेनें या धंद्यात बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. तिनें निरनिराळ्या (या धंद्यातील) संस्थांनां आर्थिक मदत केली असून सिमला येथें एक मोठी शिक्षणसंस्था स्थापण्याचे तिनें ठरविलें आहे. संस्थेस पंजाबसरकारकडून सालीना २ हजारांची मदत मिळणार आहे. बंगालसिल्ककमिटीनें कांही फ्रेंच तज्ज्ञांच्या देखरेखीखाली किडयाची (हिंदी व यूरोपीय) मिश्र निपज चालविली आहे. बर्‍हामपूरच्या व पुसाच्या सरकारी फार्मवर या धंद्याचे निरनिराळे प्रयोग होत असतात. त्यांचा हेतु किडयांची मिश्र निपज व उत्तम दर्जाचें रेशीम पुरविणें, तसेंच देशांत ठिकठिकाणीं किडयांची संगोपनगृहें स्थापून धंद्याच्या लोकांनां उत्तम कोसले पुरविणें हा आहे. स. १९१५ मध्यें पुसाच्या शेतकी अधिकार्‍यानें या धद्याच्या माहितीचे एक चोपडें प्रसिद्ध केलें असून त्यांत धंद्याच्या सुलभ उपकरणांची माहिती दिली आहे. हल्ली सरकारनें या विषयाचें एक स्वंतत्र खातें बनवून त्यावर इंपीरियल सिल्क स्पेशालिस्ट नांवाचा अधिकारी नेमला आहे.
महायुद्धामुळे हिंदुस्थानांतील रेशमाचा व्यापार वाढूं लागला आहे. महायुद्धापूर्वी रेशमाची निर्गत १२ लाख रू. पर्यंत असे ती १९१५ मध्यें २७॥ लाखांपर्यत झाली (यांत २४ लाखांचे नुसतें कच्चें रेशीम आहे), तर १९१६ त ५४॥। लाखांची झाली. स. १९२३ मध्यें कच्चें रेशीम ३८ लाखांचें व रेशीम कापड २॥ लाखांचे परदेशी गेलें. (वॅट-कमर्शिअल प्रॉडक्ट्स ऑफ इंडिया; उद्यम-एप्रिल १९१९ व एप्रिल १९२०; ऑग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिटयूट पुसा बुलेटिन्स; टाईम्स इयर बुक १९२५) .

   

खंड १९ : मूर - व-हाड  

 

 

 

  मूर्तिजापूर
  मूलद्रव्य
  मूल्यत्व
  मूळव्याध
  मृतसमुद्र
  मृत्तिका
  मृदुकाय

  मेकॉले, थॉमस बॅबिंग्टन

  मेक्सिको
  मेगॅस्थेनीस
  मेघतडिद्वाहक
  मेट्कॉफ, सर चार्लस
  मेंडेलिफ
  मेणकापड
  मेणबत्ती
  मेथी
  मेदक
  मेदोरोग
  मेन
  मेन, सर हेनरी
  मेयो, लॉर्ड
  मेरगुई
  मेरिडिथ, जॉर्ज
  मेलघाट

  मेसुकोट

  मेव
  मेवाड
  मेसापोटेमिया
  मेस्तक
  मेहकर
  मेहता, सर फेरोजशहा
  मेहेंदळे
  मेळघाट
  मैनपुरी
  मैना
  मैमनसिंग
  मैहर
  मोकासा
  मोंगल घराणें
  मोगा
  मोगॉक
  मोंगीर
  मोझँबिक
  मोटार
  मोडी लिपि
  मोतीं
  मोन-ख्मेर भाषावर्ग
  मोंबासा
  मोरवी संस्थान
  मोरे
  मोरोक्को
  मोरो त्रिमल पिंगळे
  मोरोपंत
  मोलें, जॉन
  मोसें, सॅम्युएल फिन्ले ब्रीझ
  मोर्सी तालुका
  मोलीयर
  मोसल
  मोह
  मोहगांव, जमीनदारी
  मोहनलालगंज
  मोहमंद प्रदेश
  मोहरी
  मोहोळ
  मोक्ष
  मौ
  मौत्रक
  मौबिन
  मौ-राणीपूर
  मौर्य घराणें
  मौलमेन
  म्यिंग्यन
  म्यितक्यिन
  म्यूनिच
  म्यौंगमय
  म्लेच्छ
  म्हापसें
  म्हौसाणा
  म्हैसुर
 
  यंग थामस
  यजुर्वेद
  यंत्रशास्त्र
  यदु
  यंदून
  यम
  यमुना नदी
  यमेयिन जिल्हा
  ययाति
  यवतमाळ
  यवन
  यशवंत महादेव
  यशवंतराव होळकर
  यहुदी
  यक्ष
  यज्ञ
  याकुटस्क
  याकूत
  याकोबी, फ्रेडरिक हेनरिच
  याकोहामा
  यादववंश
  यादवाड
  यानान
  यापान
  यार्कंद
  यावल
  यास्क
  याज्ञवल्क्य
  यिप्रेस
  युक्रेन
  युगांडा
  युगें
  युट्रेक्ट
  युद्ध
  युधिष्ठिर
  युधिष्ठिर शक
  युराग्वे
  युरेनस
  यूटिका
  यूथावस्था
  यूरोपखंड
  येज्द
  येर्नागुडम्
  येल्लंदलपाद
  येल्लापूर
  येवलें
  योग
  योगिनी
  योगी
 
  रक्तचंदन
  रक्तपित्त रोग
  रंगकाम
  रंगद्रव्यें
  रंगनाथस्वामी निगडीकर
  रंगपुर
  रंगरेझ किंवा रंगारी
  रंगून
  रघवी
  रघु
  रघुनाथ पंडित
  रघुनाथ बाजीराव पेशवे
  रजपुत
  रझोली जमीनदारी
  रट्ट घराणें
  रॅड्क्लिक
  रड्डी
  रण
  रणजितसिंग
  रतनगड
  रतनपुर
  रतनपुरचे कल्चुरी राजे
  रतलाम संस्थान
  रताळें
  रंतिदेव
  रत्नाकरस्वामी
  रत्नागिरी
  रत्नें
  रबडी
  रबर
  रम्फोर्ड, बेंजामिन थामसन
  रम्रीबेट
  रविवर्मा
  रॅव्हेना
  रशिया
  रसकापुर
  रसवैद्यक
  रसायनशास्त्र
  रसेलकोंडा
  रस्त्रा, तहशील
  रहिमतपूर
  राउतिया
  राकाकुंभार
  राकेल तेल
  राग व ताल
  रांगामाती
  रांगी जमीनदारी
  राघुगड
  राची
  रॉचेस्टर
  राजकोट
  राजगड
  राजगड किल्ला
  राजगड संस्थान
  राजगिर
  राजगिरी
  रांजणगांव
  राजनगर
  राजनपूर
  राजनांदगांव
  राजपालेयम्
  राजपिप्ला संस्थान
  राजपुताना
  राजबन्सी
  राजमपेट
  राजमहाल
  राजमाची किल्ला
  राजबार
  राजशाही
  राजशेखर
  राजाखेडा
  राजापूर
  राजाराम छत्रपति
  राजाज्ञा
  राजिम
  राजुला
  राटोडेरो
  राट्टीहळ्ळी
  राठी
  राणाघाट
  राणापुर
  राणीखेत
  राणीगंज
  राणीबेन्नूर
  राथ
  रांदर
  राधनपुर
  राधा
  राधास्वामीपंथ
  रानडे, माधव गोविंद
  रापूर
  राप्री
  रॉबटेंगज
  रॉबर्ट्स, फ्रेड्रिक स्ले
  राभा जात
  राम
  रामगड
  रामगिरि
  रामचंद्र गणेश कानडे
  रामचंद्रपुरम्
  रामचंद्रबाबा
  रामचंद्र विनायक टिकेकर
  राम जोशी
  रामटेक
  रामदास
  रामदुर्ग संस्थान
  रामनगर
  रामनाद जहागिरी
  रामपाल
  रामपुर
  रामपुर बोवालिया
  राममोहन राय
  रामराजा
 
  रामशास्त्री प्रभुणे
  रामसनेही घाट
  रामानंद
  रामानुज
  रामायण
  रामेश्वरम्
  रामेश्वराचा सेतू
  रामोशी
  रायकोट
  रायगड
  रायगड, संस्थान
  रायचूर
  रायदुर्ग
  रायपूर
  रायबरेली
  रायबाग
  रायमल्ल
  रायराखोल
  रायसेन
  राया
  रायाचोटी
  रायो डी ओरो
  रायो डी जानीरो
  रॉलिन्सन, सर हेनरी क्रेस्विक
  रावण
  रावळ
  रावळपिंडी
  रावी
  रावेर
  रावेरी
  राष्ट्रकूट राजघराणें
  रासपुटीन ग्रेगरी एफीमोव्हिच
  रासायनिक क्रिया
  रास्ते घराणें
  राहुरी
  राहु
  राहोन
  राक्षस
  राक्षसतळ
  राक्षान
  रिअन
  रिगा
  रिचमंड
  रिचर्ड कॉबडेन
  रिठा
  रिपन, लॉर्ड
  रिशेलू, कार्डिनल आर्मंड
  रिसिना
  रिस्ले, सर हर्बर्ट होप
  रीड, थॉमस
  रीडिंग
  रुक्मिणी
  रुखरस्वामी
  रुग्बी
  रुडोल्फ
  रुथेन
  रुद्र
  रुद्रट
  रुद्रप्रयोग
  रुदाक्ष
  रुपद
  रुपर
  रुपबास
  रुपें
  रुबी माईन्स
  रुमानिया
  रुमी जलालुद्दीन
  रुमेलिआ
  रुरकी
  रुस्ताक
  रुझवेल्ट थीओडोर
  रुपनगर
  रुपमती
  रुपराम कटारी
  रुसो, जीन जॅक्स
  रेखांश
  रेग्नॉल्ट, हेनरी व्हिक्टर
  रेडमंड, जॉन एडवर्ड
  रेडियम
  रेड्डी राजघराणें
  रेम्युसाट, चार्लस फ्रॅंकाइस
  रेवदंडा
  रेवाकांठा
  रेवाचिनी
  रेवारी
  रेशीम
  रेहली
  रोगनिदान
  रोण
  रोबक
  रोम
  रोमन कायदा
  रोर
  रोवेन
  रोहटक
  रोहटस
  रोहरी
  रोहिणी
  रोहिलखंड
  रोहिले
  रोहें
  -हाद
  -हाइन नदी
  -होडेशिया
 
  लॅंकेस्टर
  लंका
  लक्कुंडी
  लक्झेंबर्ग
  लखदिव बेटें
  लखनादोन
  लखनौ
  लखमसी
  लखिमपूर
  लखेरा
  लगो-या
  लघुलेखनपद्धति
  लछमनगड
  लंडन
 
  लंडनडेरी
  लंडीकोटल
  लदख
  लॅपलॅंड
  लॅपसाकस
  लबदर्या
  लंबन
  लबना
  लॅंबर्ट, जोहान हेन्रिच
  लंबाग्राम
  ललितपूर
  लल्लु
  लल्लूजी लाल
  लवंग
  लवंगल
  लवणासुर
  लवसक
  लष्कर
  लष्करी कायदा
  लसूण
  लळिंग किल्ला
  लक्ष्मण
  लक्ष्मण कवि
  लक्ष्मी
  लक्ष्मेश्वर
  लॉ, अॅंड्रयू बोनर
  लाइपझिंग
  लॉक जॉन
  लाख
  लाखधान्य
  लाखापादर
  लांगांग
  लाट
  लाटव्हिया
  लाटिन वाड्मय
  लाठी संस्थान
  लाड
  लातूर
  लापाझ
  ला प्लाटा
  लाँबॉक
  लाबॉन
  लामा
  लायकर्गस
  लायबेरिया
  लायलपूर
  लारखाना
  लॉरेन्स, लॉर्ड
  लालसोट
  लाली, काउंट
  लालुंग
  लावा
  लावार
  लावो
  लाव्हाझिए
  लॉस बेटें
  लासबेला
  लासवारी
  लासूर
  लाहरपूर
  लाहूल
  लाहोर
  लिआँ
  लिंकन
  लिंकन, अब्राहाम
  लिकाओनिया
  लिक्यो
  लिखी
  लिंगपुराण
  लिंगायत
  लिची
  लिच्छिवी वंश
  लिटन, एडवर्ड जॉर्ज
  लिटन, लॉर्ड
  लिडिया
  लिंडेन
  लिथुआनिया
  लिथियम
  लिपि
  लिबिया
  लिंबे
  लिमडा
  लिबो
  लिमडी
  लिमा
  लिव्हरपूल
  लिव्ही
  लिस्ट, फ्रेडरिक
  लिस्बन
  लीच टेनस्टीन
  लीज
  लीड्स
  लिबिग, जस्टस व्हॉन बॅरन
  लीवर्ड बेटें
  लुई राजे
  लुगासी
  लुधियाना
  लुनावाड
  लुनी
  लुशाई हिल्स, जिल्हा
  लुसियाना
  लुथर, मार्टिन
  लेफिश
  लेगहॉर्न
  लेतपदन
  लेनिन, औलिनोव्ह
  लेप्टिस
  लेबानान पर्वत
  लेम्येथ्ना
  लेले, काशीनाथ वामन
  लेले, विसाजी रघुनाथ
  लेवे
  लेह, तपशील
  लेसिंग गॉटहोल्ड एफ्रवाम
  लैख
  लोआंगो
  लोइमॉ
  लोइलोंग
  लोई
  लोंकर
  लोकाट
  लोकालोक
  लोखंड
  लोणार
  लोणारी
  लोणावळें
  लोणी
  लोदी घराणें
  लोधरान
  लोध्रा
  लोधिक
  लोपामुद्रा
  लोमश
  लोरलई
  लो-हा
  लोव्हेन
  लोहगड किल्ला
  लोहाणा उर्फ लुहाणा
  लोहार
  लोहारडागा
  लोहारु संस्थान
  लौर
  ल्युना
  ल्युसर्न
  ल्वांग प्रबंग
  ल्हासा
 
  वक्कलिग
  वक्रपाद
  वक्रीभवन
  वखटापूर
  वंग
  वंजारी
  वजिरीस्तान
  वजीराबाद
  वजारिया
  वज्रकडूर
  वज्राबाई
  वटेविन
  वड
  वडगांव
  वडनगर
  वडाल

  वडाली

  वडिया विरमापूर
  वड्डर
  वढवाण संस्थान
  वणी, जिल्हा
  वतन आणि वतनदार
  वत्सला
  वंथली
  वंन
  वनपरणी
  वनमाला
  वनयिन्
  वनवासी उर्फ बनवासी
  वनस्पतिशास्त्र
  वनस्पतिशास्त्र भाग १
  वनस्पतिशास्त्र भाग २
  वनस्पतिशास्त्र भाग ३
  वनस्पतिशास्त्र भाग ४
  वनस्पतिशास्त्र भाग ५
  वनस्पतिशास्त्र भाग ६
  वनस्पतिशास्त्र भाग ७
  वनस्पतिशास्त्र भाग ८
  वनस्पतिशास्त्र भाग ९
  वनस्पतिशास्त्र भाग १०
  वनस्पतिशास्त्र भाग ११
  वनस्पतिशास्त्र भाग १२
  वनस्पतिशास्त्र भाग १३
  वनस्पतिशास्त्र भाग १४
  वनस्पतिशास्त्र भाग १५
  वनस्पतिशास्त्र भाग १६
  वनस्पतिशास्त्र भाग १७
  वनस्पतिशास्त्र भाग १८
  वनस्पतिशास्त्र भाग २०
  वनस्पतिशास्त्र भाग २१
  वनाल
  वनोद
  वरंगळ
  वरड जमीनदारी
  वरणगांव
  वरदाचार्य
  वररुचि
  वरवाल राजूरें
  वराह
  वराहपुराण
  वराहमिहीर
  वरी
  वरुण
  वरोडा
  वर्णब्राह्मण
  वर्धा
  वर्म्स
  व-हाड

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .