विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रोबक (१७१८-१७९४) - हा इंग्रज रसायनशास्त्रज्ञ व संशोधक शेफील्ड येथें जन्मला. शेफील्ड, नार्थहम्टन, एडिंबरो इत्यादि ठिकाणीं शिकून लीडन येथें त्यानें एम्.डी. ची पदवी मिळविली तो पुढें बर्मिंगहॅम येथें वैद्यकी करूं लागला परंतु त्याचें लक्ष रसायनशास्त्राकडे फार असे. १७४६ त गंधकिकाम्लाच्या कारखान्यांत शिशाच्या टांक्यांचा उपयोग केल्यास त्या कोठया अम्ल ठेवण्यास सोयीस्कर होतील असें त्यास आढळलें व त्याचा त्यानें उपयोगहि करून पाहिला. परंतु या युक्तींचे पेटंट घेण्यास तो विसरल्यामुळें तीपासून त्यास आर्थिक फायदा झाला नाही. ओतीव लोखंडापासून लवचिक लोखंड करण्याची युक्तीहि त्यानेंच काढली व जेम्स वॉटला वाफेचें एंजीन तयार करण्यासहि त्यानेंच मदत केली होती.