विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
रोहटक, जिल्हा.- राजपुतान्याच्या सीमेवर अंबाला विभागांतील जिल्हा. क्षेत्रफळ १७९७ चौरस मैल. याच्या आग्नेय दिशेंनें साहिबी व इंदोरी अशा दोन नद्या वहातात. येथील हवा साधारण आरोग्यकारक आहे. पावसाचें मान १८-२१ इंचपर्यंत आहे.
इतिहास:- पूर्वी यांचे हरिआना असें नांव होतें. १३५५ त फिरोझशहानें प्रथम सतलज कालवा खणला. अकबरच्या वेळेस हा भाग दिल्लीच्या सुभ्यांत मोडत असे. दिल्लीच्या राज्यास उतरती कळा लागली त्यावेळेस हा भाग १७१८ त रूकनुद्दीन ताब्यांत आला. तो त्यानें १७३२ त फरूकनगरच्या नवाबास दिला. या नवाबाकडे हा भाग १७६० पर्यंत होता, १७७१ पर्यंत भरतपूरच्या राजाच्या ताब्यांत, व १७८२ पर्यंत नजफखानच्या ताब्यांत होता. १७८५-१८०३ त झिंदचे राजे येथें राज्य करीत होते. लॉर्ड लेकच्या स्वारीमुळे हा प्रदेश मग ब्रिटिशांच्या ताब्यांत आला. त्याच्या व्यवस्थेंत हा भाग नवाब लोकांत वांटला गेला परंतु १८२४ पर्यंत हा सर्व पुन्हां ब्रिटिशांच्या ताब्यांत आला. स. १८३२ पर्यंत या भागावर पोलिटिकल एजंट होता. व १८५७ पर्यंत हा भाग वायव्यभागास जोडलेला होता. स. १८५७ च्या बंडांत सामील असलेल्या नवाबांच्या जहागिर्या जप्त केल्या ; तेव्हांपासून रोहटक जिल्हा पंजाबांत मोडूं लागला.
येथील लोकसंख्या (१९२१) ७७२२७२ असून या जिल्ह्यांत चार तहशिली, अकरा शहरें व ४९५ खेडीं आहेत. शेंकडा ८५ लोक हिंदु आहेत व तितकेच खेडयांतून राहातात. जमीन सुपीक व चिकण आहे व पिकें कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असतात. गहूं हें मुख्य पीक आहे परंतु जवस, बाजरी, ऊंस व इतर कडधान्येहि होतात. कालवे खणणें सुरू झाल्यापासून पिकाचें प्रमाण वाढतें आहे. या जिल्ह्यांतील बैल उत्तम जातीचे असतात. बेरीच्या आसपासच्या बैलांची तर फारच ख्याति आहे. या जिल्ह्यांत जंगल नाही. गुरगांव व झज्जर तहशिलींत मिठागरें आहेत. झज्जर येथें भांडी तयार होतात; कलानोर येथें कातडयांचे सामान, रोहटक येथें पागोटी व तंझेब येथें मलमल होते. या जिल्ह्यांत ५ ठिकाणीं म्युनिसिपालिटया आहेत. शिक्षणाचें मान फारच कमी आहे.
तहसील. - क्षेत्रफळ ५९२ चौरस मैल. लोकसंख्या सुमारें २ लाख, मुख्य शहरें रोहटक, बेरी, कलानूर, कन्होर व माहम. यमुनेच्या कालव्याचें पाणी कांहीं भागांत दिलें जातें.
शहर. - रोहटक तहशिलीचें मुख्य शहर. लोकसंख्या २००००. कोणी म्हणतात. हें पूर्वींचे राजतंगिणींतील रोहिता शहर आहे. परंतु दंतकथेवरून असें दिसतें कीं, हें कोणी पोवार राजानें वसविलें असावें असें दिसतें. ११६० सालीं पृथ्वी राजानें हें पुन्हां वसविलें. मोंगलाईच्या काळानंतर १८५७ पर्यंत येथें कोणीहि लुटालूट करून जाई. १८६७ त येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. हें शहर महत्त्वाचें व्यापाराचें ठिकाण आहे. येथें तंजेब मलमल तयार होते.