विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लंका - जंबुद्वीपाच्या आसमंतात क्षारसुद्रांत जीं आठ उपद्वीपें आहेत त्यातील आठवें. हें कन्याकुमारीच्या दक्षिणेस आहे. त्रिकूट अगर लंब नांवाचा पर्वत आहे.
नगरी. -सुकेश राक्षसाच्या माल्यवान इत्यादि तीन पुत्रांनी देवांस पीडा दिली असतां विश्वकर्म्यानं भिऊन त्यांच्या संतोषार्थ त्रिकूट पर्वताच्या शिरोभागी शतयोजनें लांब, तीन योजनें रूंद अशी एक नगरी निर्माण करून दिली होती ती. येथें बंधूसहवर्तमान माल्यवान बहुत काळपर्यंत रहात असतां विष्णूच्या भयानें त्यास ती जागा सोडून पाताळांत जाऊन राहणें भाग पडलें. तेव्हांपासून ती जागा कांही काळपर्यंत ओस पडली. पुढें विश्रवा ऋषीच्या आज्ञेनें येथें त्याचा मुलगा वैश्रवण (कुबेर) राहूं लागला. पुढें रावण पराक्रमी झाल्यानंतर त्यानें ती नगरी वैश्रवणापासून युक्तीनेंच घेतली. रावणाच्या मृत्यूनंतर तेथें बिभीषण राज्य करूं लागला. तो चिरंजीव असल्यामुळें अजून तींत असून चालू कल्प समाप्त होईपर्यंत तेथें राहणार अशी समजूत आहे. अल्बेरूणीनें लंकेस ''पृथ्वीचा पेला'' असें म्हटलें आहें. महानामनच्या बुद्धगया येथील शिलालेखांत लंका बेटाचा उल्लेख आहे.