विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लखनौ, जिल्हा.- संयुक्तप्रांत, लखनौ भागांतील मध्यजिल्हा. क्षेत्रफळ ९६७ चौ. मैल. ह्माच्या वायव्येस हर्दोई व सीतापूर: ईशान्ययेस बाराबंकी, आग्नेयीस रायबरेली व नेर्ऋत्येस उनाव जिल्हे आहेत. जिल्ह्मांतील बराच भाग सुंदर जंगल, सुपीक जमीन व उत्तम लागवडी यांनी युक्त असून गोमती व साई नद्या जिल्ह्मांतून वाहतात. जिल्ह्माची वनश्री म्हणजे गंगा नदीच्या थडीवरील सपाट प्रदेश होय. यांत आंबराया अतिशय असून आंबे, संत्री, डाळिबें, पेरू व सिताफळें विपुल होतात. वन्य पशू थोडे फार आहेत. हवा समशीतोष्ण असून धुकें क्कचित् ण्डतें. पाऊस दरसाल ३६ इंच पडतो.
इतिहास:- लखनौ जिल्ह्माचा इतिहास फार प्राचीन आहे. दंतकथा अशी आहे की, अयोध्येच्या श्रीरामचंद्र्राचा भाऊ लक्ष्मण यानें लखनौ शहर वसविलें. या जिल्ह्मांतील पुष्कळ ठिकाणांचा उल्लेख महाभारतांतील कथानकांत आढळतो. पूर्वी या प्रदेशांत भार लोकांची वस्ती असून कनोजच्या राजांनी त्यांनां जिंकण्याकरितां फार प्रयत्न केले परंतु व्यर्थ. रजपुतांचे असें म्हणणें कीं, त्यांचे पूर्वज लखनौप्रांतांत वस्तीला ११ व्या किंवा १२ शतकांत आले. व तेराव्या शतकापासून मुसुलमानांचा प्रवेश होण्यास आरंभ झाला. पंधराव्या शतकांत जोनपूरच्या राज्यांत लखनौ प्रांताचा समावेश होत होता. व स. १४७८ च्या सुमारास लखनौला कांही महत्त्व येंऊ लागलें. अकबर बादशहाच्या वेळेस अयोध्या सुभा असून त्यांत लखनौ सरकारी होती.
यापुढें, लखनौ शहराखेरीज इतर जिल्ह्माचा निराळा इतिहास नाहीं. अयोध्येचा पहिला नवाब सादतखान याला जो प्रदेश मिळाला, त्यांत लखनौ जिल्ह्माचा समावेश झाला होता. परंतु १७७५ सालीं अयोध्याप्रांत इंग्रज सरकानें आपल्या राज्यास जोडिला व पुढच्या वर्षी बंडाची धामधूम उडाली. त्यासंबंधी हकीकत लखनौ शहराखालीं येईल.
पुराणप्रसिद्ध टेकडया या जिल्ह्मांत बर्याच असून त्या भार लोकांच्या वेळीं तयार झालेल्या असाव्या अशी दंतकथा आहे. शिल्पकामाचे मुख्य अवशेष म्हणजे लखनौ शहरांतील जुन्या इमारती होत. लखनौ जिल्ह्मांत सहा शहरें आणि ९३२ खेडीं आहेत. लोकसंख्या १९२१ सालीं ७२४३४४ होती. जिल्ह्यांत ३ तहशिली आहेत. जिल्ह्माचें मुख्य ठिकाण लखनौ आहे. एकंदर लोकसंख्येत शेंकडा ७८ हिेदु, शेंकडा २० च्यावर मुसुलमान असून शिवाय पारशी लोक, लोधी, कुणबी, अहीर, ब्राह्मण, शेख, चांभार, रजपूत, पठाण, सय्यद, मोंगल, इत्यादि जातींचे लोक आहेत. शेतकीवर उदरनिर्वाह करणारे शेंकडा ५२ असून शेतकी रजपूत, ब्राह्मण, अहीर, पासी, चांभार, लोधी, मुसुलमान, कुणबी व मौराऊ लोक करतात. गोमती नदीला मोठमोठे पूर येऊन जमिनीवर पुष्कळ गाळ सांचतो, त्यायोगें बनलेल्या मळईच्या जमिनीवर उत्कृष्ट पीक येतें. सरासी जिल्ह्माचा चतुर्थांश भाग तालुकदारीकडे असून तेवढयाच भागांत जमीनदारी आहे. व राहिलेल्या भागांत पट्टेदार लोक येतात. गहूं मुख्य पीक असून शिवाय तांदूळ, कडधान्यें, बाजरी, जव,. व हरभराहि पेरतात. उत्तम गुरें उत्तर अयोध्येंतून आणितात. उत्तम घोडयांची पैदास जिल्ह्मांत मुळीच होत नसून शेळ्याबकर्यांचा मुबलक पुरवठा आहे.
लखनौ शहर खेरीजकरून इतर ठिकाणी उद्योगधंदे फार थोडे आहेत. जिल्ह्मांतील आयात मालधान्य, कापड, धातुसामान, साखर व मीठ हा होय. लखनौ शहरांत तयार होणारे जिन्नस बाहेर जातात. त्याखेरीज इतर निर्गत माल फारसा नाही. शहराखेरीज मलिहाबाद, गोसाईगंज, मोहनलागंज व चिनहत हीं जिल्ह्मांतील मुख्य व्यापाराची ठिकाणें आहेत. बंथर येथें गुरांचा मोठा बाजार भरतो.
लखनौ हें औध - रोहिलखंड रेल्वेचें मुख्य ठिकाण असून तिचा मुख्य फांटा जिल्ह्याच्या आग्नेयीकडून वायव्येकडे जातो. कानपूर येथें राजपुताना माळवा रेल्वेशी बंगाल व नॉर्थ वेस्टर्न रेल्वे जोडली जाऊन रजपुताना, उत्तर अयोध्या, व बंगाल यांच्या दरम्यान अखंड दळणवळण झालेलें आहे. लखनौ जिल्ह्मांत दुष्काळाचे आगमन वारंवार असतें व ज्या ज्या वेळेस दुष्काळ येतात त्या वेळेला त्याचें स्वरूप सौम्य नसते. बंड स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हां पहाणी केली तेव्हां काळीचें उत्पन्न ८ लक्षांपर्यंत वाढलेले आढळले. पुढें सन १८९३ पासून ९६ पर्यंत पुन्हां फेरपहाणी झाली तींत निरख दर एकरी एक पासून दीड रूपायापर्यंत होता.
लखनौ शहरांत फक्त म्युनिसिपालिटी स्थापन केली आहे. स्थानिक कामें जिल्हा सभेकडे सोंपविली आहेत. लखनौ येथें मोठा तुरूंग व छावणींत लष्करी तुरूंग आहे. शिक्षणप्रसार लखनौ जिल्ह्मांत फार वाढलेला आहे. १९०१ साली लोकसंख्येंत साक्षरांचें प्रमाण शें. ४.८ (पुरूष शें. ८.२ व स्त्रिया शें. ०.९) होतें. शिक्षणाच्या बाबतींत हिंदु (शें.३.४) मुसुलमानांपेक्षा (शें. ६) मागसलेले आहेत. या जिल्ह्मांत ६ कॉलेजें असून त्यांपैकी ५ लखनौ शहरांत आहेत.
तहशील.- संयुक्तप्रांत, लखनौ जिल्ह्मांतील एक तहशील. क्षेत्रफळ ३६० चौरस मैल; हींत काकोरी, बिजनोर व लखनौ असे तीन परगणे आहेत. लोकसंख्या सुमारें ४॥ लाख. हींत ३२० खेडीं व ३ मोठीं गावें आहेत. लखनौ (जिल्ह्माचें व तालुक्याचें ठिकाण) व काकोरी हीं सर्वांत मोठी गांवें होत. तहशिलीमधून गोमती नदी वाहत असून साई व नगवा या नद्या दक्षिणेकडून वाहातात.
शहर.- अयोध्या प्रांताची पूर्वीची राजधानी; ही गोमती नदीच्या कांठी आहे. औध-रोहिलखंड रेल्वेच्या कित्येक शाखा येथें मिळालेल्या असून येथून आसपासच्या जिल्ह्मांकडे मोठमोठे रस्ते गेलेले आहेत. संयुक्तप्रांतांत लखनौ हें सर्वांत मोठें शहर असून ब्रिटिश हिंदुस्थानांत याचा ४ था नंबर लागतो. लोकसंख्या २४०५६६. लखनौ हें लक्ष्मणनें वसविले असें म्हणतात. लखनौसंबंधी पूर्वींची माहिती फारशी नाहीं. पहिल्या मुसुलमानांच्या स्वार्यांनंतर लखनौ शहर शेख व पठाण यांच्या ताब्यांत होतें. शेख लोकांनी येथें एक किल्ला बांधला होता व त्या किल्ल्याचा शिल्पकार लिखन याच्या नांवावरून या शहराचें नांव पडलें अशी दंतकथा आहे. पंधराव्या शतकांत शहा मीना नांवाचा एक सांई लखनौस होऊन गेला. त्याच्या थडग्याच्या दर्शनार्थ पुष्कळ लोक जातात. १५२८ सालीं बाबरनें लखनौ शहर घेऊन या गांवाजवळ लोदी घराण्यांतील शेवटच्या राजाचा भाऊ मंहमद याचा पराभव केला. सुरी राजांच्या वेळी लखनौ शहराला महत्त्व येंऊ लागलें होतें. अकबरानें लखनौ हें एका सरकारीचें मुख्य ठाणें केलें होतें. परंतु १८ व १९ व्या शतकांत याची वाढ जलद झाली. अयोध्येचा पहिला नवाब सादतखान यानें लखनौ ही आपली राजधानी केली. त्याचा जांवई सफदरजंग यांनें शहराच्या दक्षिणेस ३ मैलांवर जलालाबाद येथें किल्ला बांधला व गोमती नदीवर दगडी पूल बांधण्यास सुरवात केली व त्यानें जुना लक्ष्मणतीला हा किल्ला पुन्हां बांधला. तिसरा नवाब, सुजाउद्दौला हा फैजाबादेस राहत असे. अयोध्येच्या पहिल्या तीन नवाबांच्या कारकीर्दीत लखनौ शहर आकारानें वाढलें; परंतु त्यांत शोभिवंत अशा इमारती फारच थोडया झाल्या होत्या. अयोध्येचा चवथा नवाब असफउद्दौला गादीवर असतां ही उणीव भरून निघाली व लखनौची भरभराट झाली असें म्हणण्यास हरकत नाहीं. नाना प्रकारच्या इमारती, पूल व मशिदी बांधण्यांत आल्या. शहराच्या बाहेरील बिबियापूर (शिकारखाना व आरामस्थान) हेंहि त्यानेंच बांधलेले आहे. सादतअल्लीखानाचा मुलगा गाजिउद्दीन हैदर हा आपणांस राजा म्हणवीत असे. त्यानें मोतीमहाल, मुबारकमंझील, शहामंझील वगैरे लखनौ येथील प्रसिद्ध इमारती बांधल्या. गंगेला कालवा करण्याबद्दल त्याची फार खटपट होती पण ती सपशेल फसली. १८२७ साली नासिरूद्दीन हैदरनें तारावली कोठी नांवाची वेधशाळा बांधून ती विलकॉक्स नांवाच्या यूरोपयिन अधिकार्याच्या व्यवस्थेंत ठेविली. तो मेल्यावर सर्व अव्यवस्था झाली. अहंमदअल्ली शहानें हुसेनाबाद इमामवाडा नांवाची इमारत बांधली. नंतर अमजातअल्लीशहा राज्यपदावर आरूढ होऊन त्यानें गोमती नदीवर एक लोखंडी पूल बांधला. वाजिदअल्ली शहानें ८० लक्ष रूपये खर्च करून कैसरबाग नांवाची सर्वांत मोठी अशी इमारत बांधली. १८५७ साली बंड उत्पन्न झालें तेव्हां तेथील रेसिडेंट जनरल औटराम नांवाचा होता. त्यावेळेस लखनौला ३२ वी गोरी पलटण व ७ वी काळी पलटण होती. पलटणींतल्या शिपायांनी काडतुसें उपयोगांत आणण्याची नाकारलीं. नंतर लारेन्सनें दरबार भरवून लोकांची मनें वळविण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांनीं मिरतेस दंगा झाल्याची बातमी आली, तेव्हां लारेन्सनें किल्ल्यावर शिबंदीचा बंदोबस्त करून बायकामुलांनां सुरक्षित जागीं ठेविलें. इतक्यांत बंडखोर लखनौवर चालून गेले. लॉरेन्सनें त्यांशी सामना दिला परंतु त्याचें कांही चाललें नाहीं. पुढें लॉरेन्स बिछान्यावर पडला असतां त्याला गोळी लागून तो ५ दिवसानंतर वारला. इकडे किल्ल्यांत बाया-मुलें होतीच. त्यांच्या सरंक्षाकरितां औटराम व हॅवलाक नांवाचे २ सरदार आले. परंतु बंडवाल्यापुढें इंग्रज सैन्याचें कांही चालेना व कानपूर अगर कलकत्त्याहून जास्त कुमक येईपर्यंत किल्ल्यावरील लोकांनां वाट पहाणें भाग पडलें. किल्ल्यावरील लोकांच्या हालांची परमावधी झालेली होती. इतक्यांत सर कॉलीन क्यांबेल कलकत्त्याहून आला. त्यानें दिलखुषराजवाडा हस्तगत करून सिकंद्राबागेकडे रोंख धरला. तरी सर कॉलीनला एकदम चाल करणें सुरक्षित वाटेना. इतक्यात हॅवलाक साहेब मरण पावला. लखनौस बंडवाल्यांची संख्या ३०००० होती. स. १८५८ त सरकॉलीनला धीर येऊन औटरामच्या कुमकेसहित ६००० गुरखा आघाडीस ठेवून त्यानें लखनौस मोर्चा लाविला. उभयपक्षी एक आठवडा झटापट चालली होती. अखेर बंडवाल्यांनी पळ काढिला व लखनौ इंग्रजांनी सर केला. पुढें सं १८७७ पर्यंत लखनौ येथें मुख्य ठाणें होतें परंतु पुढें लखनौ वायव्यप्रांतास जोडिलें. या शहरांत, अयोध्याप्रांताचें मुख्य अधिकार्याचें मुख्य ठिकाण लखनौच आहे. गांवांतील रुग्णालयें व दवाखाने यांपैकी बलरामपूरच्या महाराजांनी स्थापन केलेल्या रुग्णालयांत साधनसामग्री सर्वांत चांगली आहे. येथें स. १८६२ त म्युनिसिपालिटी स्थापन झाली.
लखनौची छावणी संयुक्तप्रांतांत सर्वांत मोठी असून येथें ब्रिटिश व एतद्देशीय फौज ठेवलेली असतें. हें शहर व्यापारापेक्षां कारखान्यांकरितां प्रसिद्ध आहे; परंतु ब्रिटिश राज्यांतील बदलेल्या परिस्थितीमुळें येथील उद्योगधंदे बरेच खालावले आहेत. पूर्वी हें शहर मौल्यवान कपडा व जवाहिरी काम तयार करण्याचें केंद्र होतें. अद्यापहि येथें अगदी जाडयाभरडया कापडापासून अत्युत्तम मलमलीपर्यंत सर्व तर्हेचे कापड विणलें जातें. येथील काशद्याचें जरतारी कामहि प्रसिद्ध आहे. रूपें, पितळ व तांबें यांची भांडीहि येथें होतात; व लांकडी आणि हस्तीदंती कांतकामहि केलें जातें. लखनौचे कुंभार निरनिराळ्या प्रकारची भांडी बनवितात, त्यांपैकी कांही फारच उत्तम असतात. व येथील मातीच्या निरनिराळ्या वस्तू (फळें वगैरे) सर्व हिंदुस्थानांत प्रख्यात असून कलकत्त, मुंबई, वगैरे शहरीं रवाना होतात. शिवाय अर्वाचीन तर्हेचे कारखानेहि आहेत; पैकीं चार मोठे कारखाने, कागदाचा व लोखंड गाळण्याचा कारखाना हे मुख्य होत. शिक्षणाच्या बाबतींत लखनौ हें महत्त्वाचें ठिकाण आहे. येथील प्रमुख शिक्षणसंस्था म्हणजे कॅनिग कॉलेज. तालुकादारांच्या मुलांकरिता कोल्हिन शाळा, अमेरिकन मिशनचें राइड ख्रिश्चन कॉलेज ह्मा होत.