विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
लखिमपूर, जिल्हा.- आसाम, हा जिल्हा ब्रह्मपुत्रा नदीच्या अगदीं पूर्वेस आहे. याचें क्षेत्रफळ ४५२९ चौरस मैल असून पश्चिमेस दरंग व सिबसागर; उत्तरेस मिशमी, मिरी वगैरे टेंकडया; पूर्वेस खमटी टेंकडी व दक्षिणेस नाग लोकांनीं वसाहत केलेला भाग. ब्रह्मपुत्रानदीच्या दक्षिणेस सपाट प्रदेश असून त्या ठिकाणी चहाचे मळे आहेत. उत्तर भागांत चहाचे लहान लहान मळे असून जंगली झाडें व हत्तीचे खाण्याचें गवत मुबलक आहे. जंगली दलदली प्रदेश व ब्रह्मपुत्रा उपनद्यांसह वहात जाते. जिल्ह्मामधील सपाट प्रदेश सुपीक असून लागवडीखालीं आहे. येथील हवा थंड व आनंददायक आहे. फक्त जून, जुलै व आगस्ट या तीन महिन्यांत मात्र उष्णता अतिशय भासते. उलट मार्च महिन्यांत थंडी फार कडक असते. जिल्ह्माच्या तिन्हीं बाजूंनी टेंकडया असल्यामुळें व जंगल मुबलक असल्यामुळें पाऊस फार पडतो.
इतिहास:- लखिमपूरचा इतिहास दंतकथामय आहे. ११ व्या शतकांत तिबेटकडून छुटिया लोकांनी हिंदु, व पाल लोकांनां हांकलून देऊन ब्रह्ममुत्रा नदीच्या उत्तरकांठी ते वसाहत करून राहिले. अहोम नांवाच्या शान जातीनें या छुटिया लोकांचा पराभर करून तेथील सत्त आपल्याकडे घेतली. नंतर ब्रह्मी लोक आसाममध्यें शिरून त्यांनी अहोम राजापासून लखिमपूर काबीज केलें. ब्रह्मी लोकांनी भंयकर कृत्यें करून तेथील लोकांनां फार त्रास दिला. पुढें सदर प्रदेशाची व्यवस्था इंग्रजांकडे आली.
१९२१ सालीं येथील लोकसंख्या ५८८२९५ होती. लखिमपूर जिल्ह्माचे २ पोटविभाग केले आहेत; डिब्रुगड व उत्तर लखिमपूर जिल्ह्मांत. डिब्रूगड हें मोठें शहर आहे. व ११२३ खेडीं आहेत. लोकांच्या मुख्य जाती अहोम, छुटिया, काचार, मिरी, परकीय, मुडा, संताळ वगैरे होत, तांदूळ व त्याच्या खालोखाल चहा जास्त पिकतो. दुसरी पिकें कडधान्यें, राई व ऊस होत. १९०४ सालीं चहाचे मळे १४३ व ७०५९१ एकरांत लागवड असून ३ कोटी पौड चहा झाला. पाऊस पुरेसा पडत असल्याकारणानें पाटबंधार्यांचें कारण नाही. डिब्रू नदीवरील राखीव जंगल सर्वांत मोठें आहे. जंगलांत रबराचें उत्पन्न बरेंच असतें. माकम व जैपूर गांवी २ मोठया कोळशाच्या खाणी असून डिगबोई येथें पेट्रोलियम् सापडतें अहोम राजांच्या वेळीं सोनें धुऊन काढण्याचे धंदे बहुधां सर्व नद्यांतून चालत असत. चहा, तेल, लांकूड कापणें, मातकाम व रेल्वेचे कारखाने खेरीजकरून दुसरे उद्योगधंदे जिल्ह्मांत नाहीत. आसामी लोक जाडीं वस्त्रें विणतात; हीं बाजारांत विकीत नसून त्यांचा घरगुती उपयोग करतात. मुसुलमान पितळेची भांडी करतात. बाहेरील व्यापार कलकत्त्याशीं चालतो. बाहेर जाणारे जिन्नस चहा, राकेल, दगड कोळसा, मेण, मेणबत्तया, चामडीं, वेत आणि रबर हीं असून आंत येणार्या जिनसांत तांदूळ, हरभरा व कडधान्यें, साखर, तूप, तंबाखू, मीठ, कापड, मोहरीचें व इतर तेल, लोखंडी पत्रें, यंत्रे वगैरे होत. डिब्रूगड, सदिया, डुमडुमा, मार्गेरिता, जैपूर, खतांग व उत्तर लखिमपूर ही व्यापारी ठिकाणें होत. शिक्षणबाबतींत लखिमपूर फारसें पुढें गेलेले नाही.
(२) संयुक्तप्रांत, खेरी जिल्ह्मांतील एक तालुका यांत थूर, श्रीनगर, कुक्रा मैलानी, पैला व खेरी परगण्यांचा समावेश होतो. क्षेत्रफळ १०७५ चौरस मैल. लोकसंख्या सुमारें ३॥ लाख. तालुक्यांत मोठीं गांवें २ (लखिमपूर व खेरी) असून ५०० खेडीं वर आहे.
गांव.- संयुक्तप्रांत, खेरी जिल्ह्मांतील, लखिमपूर तालुक्यांचें मुख्य ठिकाण. हें लखनौ-बरेली रेल्वेवर एक स्टेशन आहे. लोकसंख्या सुमारें १००००. येथें साखर व धान्यें येऊन ती बाहेरदेशी पाठविलीं जातात. येथें १८६८ सालीं म्युनिसिपालिटींची स्थापन झाली. या ठिकाणीं बर्याच मुलामुलींच्या शाळा आहेत.